अकोला : सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला व जागतिक बँक प्रकल्प अकोला या यंत्रणामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी ९९ लाख ४० हजारांच्या एकूण २५ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांना पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सोमवारी स्थगिती दिली. ही स्थगिती म्हणजे नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या भ्रष्टाचाराचा सबळ पुरावा असल्याने त्यांच्या विरुद्ध आता तरी पोलिसांनी गुन्हे दाखल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध ता. ३ डिसेंबर रोजी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी मजूर करताना पालकमंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग करीत शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला दिली होती. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली. यंत्रणा कामाला लागली आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सचिव नीमा अरोरा यांनी तातडीने संबंधित यंत्रणांची सोमवारी सुनावणी घेतली. तक्रारकर्ते डॉ. पुंडकर यांनी यासंदर्भात कोणत्याही सुनावणीची मागणी केली नसताना सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीला तक्रारकर्ते उपस्थित नव्हते.
जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी गिरीश शास्त्री, जागतिब बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सरनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला उपविभागाचे उपअभियंता दिनकर नागे, अकोट, तेल्हाऱ्याचे उपअभियंता संजय बोचे यांची उपस्थिती होती. या सुनावणीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर लेखाशिर्षक ३०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना सात कामांकरिता चार कोटी ४० लाख व जागतिक बँक प्रकल्प अकोला यांना दोन कामांकरिता ५० लाख व लेखाशिर्षक ५०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना १३ कामांकरिता चार कोटी २९ लाख ४० हजार व जागतिक प्रकल्प अकोला यांना तीन कामांकरिता एक कोटी ८० हजार रुपयांची दिलेली प्रशासकी मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगित केली असल्याची माहिती डॉ. पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला वंचितच्या युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, सचिन शिराळे उपस्थित होते.
स्थगिती दिलेले रस्ते व निधी
लेखाशिर्षक ३०५४ अंतर्गत एकूण नऊ रस्त्यांना स्थगिती
मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढाेरे पाेच रस्ता मजबुतीकरण - २० लाख
जांब ते रस्त्यावर स्लॅब ड्रेन बांधकाम करणे - २० लाख
खारपाण सालपी रस्त्याची सुधारण - १५ लाख
भटाेरी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता - २० लाख
पातूर तालुक्यातील साेनुना ते पांढुर्णा रस्ता बांधकाम - १ काेटी ८० लाख
पातूर ते भंडारज - १ काेटी ६० लाख
धनेगाव जुने ते धनेगाव नवे रस्त्याचे बांधकाम - ३५ लाख
चाेहाेट्टा धामना-करतवाडी रस्ता सुधारणा - २५ लाख
वेताळबाबा संस्थान ते मराेडा रस्त्याची दुरुस्ती करणे - २५ लाख
पोलिस अधीक्षकांना दिले स्मरणपत्र
वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. पुंडकर यांनी ता. ३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेवून कामांना स्थगित देत वंचितने केलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी पालकमंत्री व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे स्मरणपत्र सोमवारी सायंकाळीच पोलिस अधीक्षकांना दिले.
‘वंचित’ म्हणते खोटी माहिती दिली
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सुनावणीचे इतिवृत्त देताना त्यात खोटी माहिती देण्यात आल्याचा दावा वंचितचे डॉ. पुंडकर यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसारे धनेगाव जुने ते धनेगाव नवीन हा बाळापूर तालुक्यातील रस्ताच नाही. धनेगाव जुने व धनेगाव नवीन या दोन्ही गावाच्या मध्ये निर्गुणा नदी वाहते. त्यामुळे रस्ता कसा तयार करणार, असा प्रश्नही डॉ. पुंडकर यांनी उपस्थित केला.
रस्त्यांची संख्या वाढणार
चुकीच्या प्रशासकी मान्यता दिलेल्या रस्त्यांची संख्या सध्या २५ असली तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या इतरही काही रस्त्यांच्या कामांबाबत संभ्रम असून, या उर्वरित रस्त्यांची प्रशासकीय मान्यताही स्थगित केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून प्रस्तावित विकास कामांनाच खिळ बसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.