तेल्हारा : तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील हिंगळा भवानी मातेचा गुरुवार, दि.३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव प्रारंभ झाला आहे. पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असणाऱ्या हिंगळा भवानी देवीच्या दर्शनासाठी आगामी नऊ दिवस भक्तांची मांदियाळी असणार आहे.
वान धरणाने समृद्ध झालेल्या तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे हे सात ते आठ हजार लोकसंख्या असणारे गाव, सर्व जाती धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी याच गावात देवीची मूर्ती एका कापसाच्या व्यापाऱ्याला मोजणी करताना प्राप्त झाली. त्यानंतर याठिकाणी हिंगळा भवानी मातेची स्थापना झाली, अशी आख्यायिका आजवर रूढ झाली आहे. कालांतराने मंदिर प्रशासनाने जयपूर येथून संगमरवरी भवानी देवीची मूर्ती आणली.
गावात मिरवणूक काढून दि. ३ एप्रिल २००८ रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या देवीवर भक्तांची श्रद्धा असणाऱ्या भक्तांनी स्वेच्छेने वर्गणी देत मंदिर उभारणीसाठी सहकार्य केले. सध्या सुसज्ज सभामंडप दिमाखात उभा आहे. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीची मोठी यात्रा भरते. वर्षभरात तुळशीविवाह, देवी भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथाचे आयोजन करण्यात येते. नवरात्रात पंचक्रोशीत हजारो भक्त दरवर्षी न चुकता दर्शनाला हजेरी लावतात. मंदिराची आकर्षक रोषणाईने सजावट केली असून, मंदिर प्रशासन सुद्धा भक्तांच्या सोयीसुविधेंसाठी सज्ज झाले आहे.
असे असतील नऊ दिवस कार्यक्रम
दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घटस्थापना झाली. संध्याकाळी ६.३० वाजता नियमित हरिपाठ व दुर्गापाठ व संध्याकाळी ७.३० वाजता आरती असे दररोजच नियोजन आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता जिजाऊ महिला भजन मंडळ झाशी पळशी यांचे भजन,
दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता वारकरी महिला भजन मंडळ हंतोडा ता.अंजनगाव
दि.५ ऑक्टोबर रोजी हरी महिला भजन मंडळ जळगाव जामोद
दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १२ गोंधळ पाथर्डी, रात्री ८.३० वाजता श्रीकृपा महिला भजन मंडळ खेर्डा ता.संग्रामपूर
दि.७ ऑक्टोबर रोजी विठाई महिला भजन मंडळ संग्रामपूर
दि.८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १२ गोंधळ पाथर्डी, रात्री ८.३० वाजता जिजाऊ महिला भजन मंडळ बादखेड-सौंदळा
दि.९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता जगदंबा महिला भजन मंडळ शेगाव
दि.१० ऑक्टोबर रोजी शंकरगिरी महाराज भजनी मंडळ झाशी पळशी
दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता संत सोनाजी महाराज महिला भजनी मंडळ सोनाळा,
दि.१२ रोजी सकाळी ९ ते १२ होम हवन व पूर्णाहुती व रात्री सात वाजता आरती राहील.
काचेचा गाभारा आकर्षक सजावट
मंदिराच्या आत प्रवेश करताच काचेच्या सुंदर गाभाऱ्याची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. सिंहासनावर विराजमान आई भवानीची प्रसन्न भावमुद्रा मन प्रसन्न करून जाते. मंदिर परिसरात पौराणिक विहीर असून याठिकाणी उसाची खोपडी घालून घटस्थापना केली जाते. भक्त नतमस्तक होतात. नवरात्रात नऊ दिवस भक्तिमय वातावरण गावात असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.