खामगाव - दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा सुगावा लावण्यात हिवरखेड पोलिसांना यश आले आहे. परंतु, पोलिसांना तो व्यक्ती जिवंत नव्हे तर मृत मिळाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या खून प्रकरणात दोघांना अटक केली आहे. मिसिंग व्यक्तीचा सांगाडा पोलिसांनी गणेशपूर गावातील शेतातील खड्ड्यातून बाहेर काढला आहे.
हिवरखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गणेशपूर येथे राहणारे नंदु श्रीराम धंदरे (४०) हे १० ऑक्टोबर २०२२ पासून बेपत्ता होते. यासंदर्भातील तक्रार हिवरखेड पोलिस करीत होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की नंदु धंदरे यांचा खून करून त्यांना एका शेतात पुरविण्यात आले आहे.
माहितीचा हा धागा धरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यामध्ये पोलिसांनी नंदु धंदरे याचे अतुल गंगाधर कोकरे (३०) याच्यासोबत नेहमी वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.पोलिसांनी अतुल कोकरे सोबत नेहमी राहणारा दिपक शालीग्राम ढोके (२३) याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली.दिपक ढोके ने पोलिसांना माहिती दिली की नंदु धंदरे यांचे प्रेत ज्याठिकाणी पुरवून ठेवले आहे ती जागा दाखविली.
पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरवलेला सांगाडा बाहेर काढला. तेव्हा दीपक ने हा सांगाडा नंदु धंदरेचा असल्याचे सांगितले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा ही करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये दिपक ढोके आणि अतुल कोकरे या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलिस निरीक्षक कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
गावातील एका महिलेसोबत नंदु धंदरे आणि आरोपी अतुल कोकरे यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांमध्ये त्या महिलेवरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या वादातून अतुल कोकरे ने नंदु धंदरेचा कायमचा काटा काढण्याचा विचार केला. त्यानुसार नंदु धंदरे यांच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने व दगडाने मारून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर दिपक ढोकेला सोबत घेऊन अतुल कोकरे यांच्या शेताच्या धुºयावर खड्डा करून नंदु धंदरे यांना पुरविले.
पुरावा ही केला नष्ट
या प्रकरणात आरोपींनी नंदू धंदरे यांचा खून करून त्यांना खड्ड्यात पुरविल्यानंतर त्यांचे कपडे जाळून टाकले. त्यासोबतच त्यांची दुचाकी ही जिंतूर रोडवरील पुलावरुन नदीत फेकुन देवुन पुरावा नाहीसा केला. यासंदर्भात दिपक ढोके ने पोलिसांना संपूर्ण माहिती दिली.
प्रतिक्रिया
दोन वर्षांपासून मिसिंग प्रकरणाचा तपास लावण्यात यश आले आहे. या मृतकाची डिएनए चाचणी केल्यानंतरच मृतक तोच आहे का, हे स्पष्ट होणार आहे. आरोपीच्या सांगण्यावरून पंचासमक्ष सांगाडा बाहेर काढला आहे. दोघांना अटक केली आहे.
- विनोद ठाकरे उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.