अकोला : केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची चौदावी किस्त जमा करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्नीकरण आवश्यक आहे.
ह्या तिन्ही बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनामार्फत २० व २१ जून रोजी जिल्ह्यात एकाच वेळी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची याकडे पाठ असल्याने त्यांना पीएम किसान सन्मान योजनेची चौदावी किस्त मिळेल अथवा नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो.
या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३व्या हप्त्याची रक्कम मिळाली असून लवकरच चौदाव्या हप्त्याची किस्त देण्यात येणार आहे. सदर हप्त्याच्या लाभासाठी केंद्र सरकारने तीन बाबी बंधनकारक केल्या असून त्याची पूर्तता केल्यानंतरच शेतकऱ्यांना १४वा हप्ता मिळेल अन्यथा नाही.
शिबीरानंतरी शेतकरी निरूत्साही
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रशासनामार्फत २० व २१ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात शिबीर घेण्यात आले. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप अनेक शेतकऱ्यांची तिन्ही बाबींची प्रक्रिया बाकी आहे.
अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी ः जिल्ह्यातील १२ हजार १८ शेतकऱ्यांची अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी बाकी होती. त्यापैकी विशेष शिबीरात एक हजार ९१५ जणांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजार १०३ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे.
ई-केवायसी : ५१ हजार ३३३ शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडलेली होती, त्यापैकी ३२ हजार २९५ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून १२ हजार ३८ जणांची ई-केवायसी बाकी आहे.
आधार सिडींग : २० हजार २१९ शेतकऱ्यांची आधार सिडींग बाकी होती. त्यापैकी १९ हजार १५८ शेतकऱ्यांची आधार सिडींग झाली असून एक हजार ६१ शेतकऱ्यांची आधार सिडींग बाकी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.