अकोला : बुधवारपासून एकुण १९५ ‘पोलीस शिपाई’ पदाकरीता अकोला जिल्हा पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस भरतीकरीता आज सकाळी ५.०० वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला येथे शारीरीक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यामध्ये आज रोजी बोलाविण्यात आलेल्या ८०० उमेदवारांपैकी ५७३ उमेदवार हजर झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी उमेदवारांशी संवाद साधला.
यावेळी हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात आली. त्यानंतर छाती व उंचीचे मोजमाप करण्यात आले. त्यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये ०१ व छाती उंची मध्ये ७७ असे एकूण ७८ उमेदवार अपात्र झाले. पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळा फेक चाचणी ही पोलीस मुख्यालय अकोला येथील कवायत मैदानावर घेण्यात आली व त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे घेण्यात आली.
तसेच पोलीस भरती करीता आदल्या दिवशी बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांची रात्रीला राहण्याची व्यवस्था राणी महल, पोलीस लॉन, अकोला येथे निःशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे. तसेच मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका, इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.