नांदुरा : ओल्या व कोरड्या दुष्काळाच्या वणव्यात संपूर्ण जिल्हा यावर्षी होरपळून निघाला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. तर रब्बी पिकांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपीटीमुळे खूप नुकसान झाले आहे.
यासाठी जवळपास शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा काढण्याची सुविधा असल्याने यावर्षी खरीपासोबतच रब्बीतील सर्व पिकांचा विमा काढलेला होता. परंतु खरिपातील ऑनलाईन तक्रारीसाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पातळी ठरवूनही शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही.
सोबतच रब्बीतही हीच परिस्थिती उद्भवून शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या, मात्र रब्बी संपुष्टात आला, तरी तक्रारीचे निवारण न करता शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याने विमा कंपनीप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात व त्यातल्या त्यात घाटाखालील सर्वच तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती २५ टक्केही उत्पन्न मिळाले नाही. जून महिन्यात शासनाने केलेल्या एक रुपयात विमा काढण्याचा गाजावाजामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मात्र विमा काढून नुकसान सोसून, विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून नुकसानग्रस्त पिकांचे सर्व्हे होऊनही काही मंडळातील ठरावीक शेतकरी सोडले तर शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडली नाही.
याबाबत माहिती जाणून घेतली असता तीन टप्प्यात शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानीचा लाभ देण्यात येणार असल्याने एकाच टप्प्याचे नगण्य वितरण करण्यात आले आहे. तर रब्बीतील पीक विम्यासाठी नांदुरा तालुक्यात एकूण ७९३१ विमाधारक शेतकऱ्यांपैकी २४४१ शेतकऱ्यांनी पीक खराब झाल्याच्या कारणातून ऑनलाईन तक्रारी दाखल केल्यावरही केवळ ६२२ शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण विमा कंपनीच्या प्रतिनिधिंकडून केले गेले आहे. इतर तक्रारधारकांचा कोणताही विचार न करता नुकसान होऊनही त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
मी चालू रब्बी हंगामात शेतातील पिकांचा विमा ऑनलाईन काढला. मध्यंतरीच्या काळात अवकाळीने माझ्या शेतातील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याच्या ७२ तासाच्या आत नुकसान झाल्याने मी त्याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
मात्र अद्यापपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नसून कोणताही विमा कंपनीचा प्रतिनिधी माझ्या शेतापर्यंत अजूनही पोहचलेला नाही. आज रोजी शेती मशागतीकडे आम्ही आमचा मोर्चा वळविला तरी साधी पाहणी सुद्धा होऊ शकली नाही.
- सीताराम खोंदले, शेतकरी टाकरखेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.