सिंदखेड राजा : ''गण गण गणात बोते'' ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, अशा जयघोषामध्ये विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीसंत गजानन महाराज शेगांव पालखीचे मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. टाळमृदंगाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता. विदर्भाच्या हद्दीमध्ये प्रवेश करताच फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, फुलांची उधळण करत ''श्रीं'' च्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
परिसर भक्तीमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता. प्रशासनाच्या वतीने ''श्रीं'' च्या पालखीचे भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. माळ सावरगाव ते सिंदखेड राजा शहरापर्यंत हजारो गजानन भक्त पालखी सोबत पायी चालत शहरामध्ये दाखल झाले होते.
श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे ५५ वे वर्ष असून पालखीसोबत दोन अश्व, ७२० वारकरी आहेत. श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दुपारी ३ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये आगमन झाले.
यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, मनोज कायंदे, सतीश काळे, सीताराम चौधरी, सतीश तायडे, जगन सहाणे, विजय तायडे, ॲड.संदीप मेहेत्रे, योगेश जाधव, मधुकर गव्हाड, सतीश सरोदे, गणेश सानप, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, नायब तहसीलदार मनोज सातव यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूरवरून ''श्रीं'' ची पालखी २१ जुलै रोजी शेगावसाठी मार्गस्थ झाली होती. ३ ऑगस्ट रोजी पालखी जिल्ह्यात दाखल झाली. स्थानिक नागरिकांकडून ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले.
तसेच शहरात दाखल होताच जिजामाता नगरमध्ये भाविकांनी पालखीचे स्वागत केले. ऐतिहासिक रामेश्वर मंदीर येथे ''श्रीं''च्या पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रंगमहाल, काळाकोट मार्ग तहसील कार्यालया समोरून जिजामाता विद्यालयामध्ये पालखी मुक्कामासाठी थांबली आहे.
यावेळी भक्तांनी रांगेत उभे राहून श्रीसंत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. ४ ऑगस्ट रोजी सकाळी पुढील प्रवासासाठी किनगांव राजाकडे पालखी प्रस्थान करणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय अधिकारी मनीषा कदम मार्गदर्शनाखाली ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, ठाणेदार विनोद नरवाडे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सानप, श्रावण डोंगरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
श्रीसंत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरवरून विठ्ठलाचे दर्शन घेऊन स्वगृही म्हणजे जिल्ह्यामध्ये परतली आहे. मराठवाडा विदर्भाच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच स्वगृही परतल्याचा पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आंनद पहायला मिळत होता.
श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीसोबत पंढरपूर वरून श्वान चालत आला. ''श्री'' च्या पालखी सोबत श्वानही वारकरी झाला असल्याचे पहायला मिळते.
श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीचा जिल्ह्यामध्ये प्रवेश होताच पोलिस विभागाकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, ठाणेदार विनोद नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, भारत चिरडे यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालखीने जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोबत पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळतो. मराठवाडा विदर्भाच्या हद्दीवर प्रवेश झाल्यापासून शेगांवपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त पालखी सोबत राहणार आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पालखी दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनचे ठाणेदार, पोलिस उपनिरीक्षक तसेच ३० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सोबत असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.