अकोला : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजनाकरिता निवड झालेल्या लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन (Online) पद्धतीने १६ जानेवारीपर्यंत अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी (District Deputy Commissioner of Animal Husbandry) केले होते. मात्र, योजनेंतर्गत आपण पात्र की, अपात्र याची माहितीच अनेकांना उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे निवड याद्यांच्या उपलब्धतेसह योजनेंतर्गत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुधाळ गाई व म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, अशा विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया २०२१-२२ या वर्षात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह), अशा लाभार्थ्यांनी १२ ते १६ जानेवारी या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईल ॲप्लीकेशनव्दारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले होते.परंतु, अल्पावधीत आवश्यक सर्व कागदपत्रे मिळविणे व ते ऑनलाइन पद्धतीने अपलोड करणे ग्रामीण भागातील बहुतांश पात्र शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. शिवाय अनेकांना निवड (पात्रता) यादी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ही योजना पारदर्शकपणे राबवित निवड यादी पीडीएफ फाईल स्वरुपात सुद्धा उपलब्ध करून द्यावी व योजनेंतर्गत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.(Akola News)
प्रतीक्षा यादीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १६ जानेवारी २०२२ पर्यंतची मुदत दिलेली आहे. मात्र, आम्हाला निवड यादी मिळाली नसल्याने आम्ही कागदपत्रे अपलोड करू शकलो नाही.
- वल्लभराव मोहिते, शेतकरी, बाखराबाद
पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती अकोला यांना प्रतीक्षा यादी मागीतली असता, सेतूवर जाऊन पाहा, जिल्हा स्तरावर याद्या आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही पात्र की, अपात्र हे समजू शकले नाही. निवड याद्या अकोला तालुक्यातील पशू दवाखान्यात प्रसिद्ध करण्यात याव्यात व शासनाने कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
- अक्षय पांडे, शेतकरी, बाखराबाद
बाळापूर तालुक्यात प्रतीक्षा याद्या पीडीएफ फाईलद्वारे प्रत्येक गावात देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे अकोला तालुक्यात सुद्धा याद्या उपलब्ध व्हायला हव्या होत्या. मात्र, येथील शेतकऱ्यांना त्याप्रमाणे याद्या का देण्यात आल्या नाहीत, समजू शकले नाही.
- अमोल महल्ले, शेतकरी, खरप पाचपिंपळ
पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर याद्या दिलेल्या असून, अर्जदारांना त्या अँड्रॉइड मोबाईलवर पाहता येतील. पीडीएफ फाईलद्वारे याद्या उपलब्ध होण्यासंदर्भात तालुकास्तरावर विस्तार अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास माहिती मिळू शकेल. प्रशासनाला मुदत वाढीसाठीची विनंती आम्ही करीत आहोत. उद्यापर्यंत त्याबाबतीत काही माहिती मिळाल्यास पशुधन विकास अधिकारी (विस्तार) अर्जदारांपर्यंत ती पोहचवतील.
- डॉ. जगदीश बुकतरे, पशुसंवर्धन उपआयुक्त, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.