महागाई, भाववाढ किंवा चलनवाढ ही होणारच आहे; मग ती सेवांच्या मूल्यात वा चलनाची क्रयशक्ती कमी झाल्याने! पण, हे सांगायला खूप मोठा अभ्यास केला असल्याचे दर्शविण्यासाठी त्यावर भाष्य केले जाते.
महागाई (अर्थात भाववाढ, चलनवाढ - इंग्रजीत इन्फ्लेशन) हा शब्द जरी असला तरी त्याचा मूळ अर्थ आपल्या परवलीचा झाला आहे. भाववाढ झाल्यावर आपण त्यावर अभ्यास करीत आहोत वा आपल्याला त्यामागचे शास्त्र माहीत आहे, असे वाटू शकते. प्रत्यक्षात महागाई ही नैसर्गिक गोष्ट आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण वाढ होणे हा निसर्गाचा, मनुष्याचा, संपत्तीचा स्थायीभाव आहे. मात्र, त्यात गतीच नसेल तर मनुष्यवृत्ती वा निसर्गाच्या नियमानुसार त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एक उदाहरण म्हणून पाहिल्यास, समजा काही वर्षांपूर्वी बटाटा एक रुपया किलो भावाने विकला जात होता आणि आजही त्याच भावाने विकला जात आहे. मात्र, अन्य वस्तूंच्या मूल्यात वाढ झाली असल्यास बटाटा पिकविणारा शेतकरी तो पिकविणे बंद करेल. परिणामी, त्याचा तुटवडा निर्माण होईल व आपोआपच बटाट्याची भाववाढ होईल.
महागाई, भाववाढ किंवा चलनवाढ ही होणारच आहे; मग ती सेवांच्या मूल्यात वा चलनाची क्रयशक्ती कमी झाल्याने! पण, हे सांगायला खूप मोठा अभ्यास केला असल्याचे दर्शविण्यासाठी त्यावर भाष्य केले जाते. अनेकदा आपण ऐकतो, आपल्या पैशाची क्रयशक्ती कमी झाली. पण, प्रत्यक्षात त्यात काय होते, हे लक्षात घेतले पाहिजे. क्रयशक्ती चलनाची कमी होत असते म्हणजे चलन कमकुवत होत असते, पण अर्थव्यवस्था कमकुवत होत असते, असे काही नाही. महागाई होत असल्याचे नक्कीच बोलले जात असते. यासाठी एक सूत्र आपण लक्षात घेऊ, की एक रुपयाचे मूल्य शंभर पैसे आहे. समजा, पूर्वी शंभर पैशांत एक विशिष्ट वस्तू १० (संख्या) येत होती आणि आता ती वस्तू कमी संख्येने येत असल्यास आपण चलनाचे मूल्य, क्रयशक्ती वा खरेदीची ताकद कमी झाले, असे म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात असे काही नसते, हे लक्षात घ्यायला हवे. कारण काळाच्या ओघात वस्तूची किंमत वाढलेली असते आणि मूल्याची क्रयशक्ती घटलेली असते. तसेच, आपणही विश्लेषण केल्यास समजते, की पूर्वी विशिष्ट किमतीला आणत असलेल्या वस्तूंच्या किमतीबरोबर अन्य वस्तूंचे भावही वाढलेले नसतात, असे नसते. सरकार धान्यासाठी किमान आधारभूत किंमत वेळेनुसार देत असते आणि त्यामुळेच त्यामध्ये थोडी-थोडी वाढ होत असते. याचा अर्थ असा, की वाढलेली किंमत शेतकऱ्याला जशी मिळते, तशीच ती तेवढ्याच प्रमाणात ग्राहकांकडून वसूल केली जाणार असते. पूर्वी तांदळाची आधारभूत किंमत एक रुपया होती आणि आता ती दहा रुपये झाली आहे. मात्र, बाजारात तांदूळ एक रुपयाला मिळतो आहे, असे कधीच होणार नाही. कारण प्रत्येक वस्तूचे मूल्य काळानुसार बदलत असते आणि त्याचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होत असतो. परिणामी, वस्तूंच्या किमती या वाढत असतात.
...म्हणून किंमत वाढते
भारतात बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात असताना ज्या वस्तूचे दुर्भिक्ष्य वा कमतरता असायची, त्याच वस्तूचे मूल्य वाढत असायचे वा त्यास चढा भाव मिळत असे. तसेच, लोक एकमेकांबरोबर एका वस्तूच्या बदल्यात दुसरी द्यायचे. येथे प्रत्येक वस्तूचे मूल्य निरनिराळे होते. उदा. एखाद्या व्यक्तीने एक लिटर शेंगदाणा तेल दिल्यास त्याला दहा किलो गहू मिळायचे, दहा किलो गहू दिल्यास दोन मीटर कापड मिळायचे. म्हणजेच वस्तूचे किंमत आणि परिमाण वेगवेगळे असायचे. बारा बलुतेदार पद्धत असल्याने वस्तू व सेवा मुख्य घटक होता आणि चलनाऐवजी वस्तू देवाण-घेवाण पद्धत होती. त्यामुळे वस्तूच्या किमती, भाव वा चलनाची क्रयशक्ती कमी झाली आहे, हे लक्षात येत नसे. आज सेवा क्षेत्राची व्याप्ती, विस्तारवाढ होत आहे आणि आज एखाद्या वस्तूची किंमत वा मूल्य पाहिल्यास त्या वस्तूच्या किमतीत वीस ते तीस टक्के त्या वस्तूची किंमत अन् उरलेली त्याच्या सेवेची असते. त्यामुळेच सर्वप्रथम आणखी मुद्दा लक्षात घ्यायला हवा, की प्रत्येक सेवेचे चढे (मार्क अप) मूल्य असते. उदा. दहा रुपयांत एखादी किलोभर वस्तू वाहतूक करून घरी आल्यास वस्तू चार रुपये अन् दहा रुपये वाहतूक धरून चौदा रुपये व नफ्याचे प्रमाण वीस टक्के केल्यास त्यावर २.८० पैसे चढे मूल्य लागते.
आता वस्तू चार रुपयांनी घरी आली असती आणि त्यावर वीस टक्के नफ्याचे प्रमाण लागले असते, तर मूल्य फक्त ४.८० रुपये झाले असते. येथे लक्षात येते, की प्रत्येक गोष्टीमुळे त्यात मार्क अप वाढत जाते. कारण प्रत्येकालाच नफा कमवून वस्तू पुढे विकायची असते. त्यामुळेच प्रत्येक वस्तूमध्ये ज्या किमतीचा अंतर्भाव असतो, त्यात वस्तू-सेवा यांची किंमत व प्रत्येक पातळीवर मार्क अप केले जाते. परिणामी या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या वस्तूची अखेरची किंमत. आपण किंमतवाढीचे आणखी एक उदाहरण पाहू. हॉटेलमधील दीडशे ते दोनशे रुपयांना मिळणारी भाजीची डिश एखाद्याला महाग वाटू शकते. पण, त्या हॉटेलचालकास कामगारांचे पगार, गॅस-वीज-पाणी, आस्थापना खर्च, जुन्या होत जाणाऱ्या वस्तू (फर्निचर, काटे-चमचे), होणारे नुकसान आदींचा विचार करून तो त्याचा नफा वर लावून वस्तू देणार आहे. त्यामुळे ग्राहकाला वीस ते पंचवीस रुपयेच मूल्य वाटत असणारी ही डिश सर्व्हिस कॉस्ट व अन्य कॉस्टमुळे महाग वाटते. अशा कारणांमुळे मूळ वस्तूची किंमत वाढते.
परिस्थितीचाही प्रभाव
आज आपण ट्रान्स्पोर्टेशन म्हणतो तो डिझेल, ट्रकची किंमत, देखभाल खर्च, कर्मचारी वेतन, टोल, डेप्रिसिएशन असते आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून वस्तूची किंमत वाढत असते. या ठिकाणी कोणतेही सरकार वा अन्य गोष्टींचा वस्तूच्या किमतीवर परिणाम होत नसतो. मात्र, काळानुसार वस्तूंच्या मूळ उत्पादन खर्चात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे वाढ होत असते. परिणामी वस्तूंच्या किमती काळाच्या ओघात बदलतात. त्यामुळे किमती वाढणे ही कोणाचे अपयश नसून, हा त्या घटनाचक्राचा एक भाग आहे, हे लक्षात घेतला पाहिजे. काही वेळेस अल्पकाळासाठी वस्तूच्या किमतीत घटही होते. कारण बाजारपेठेत अचानक पुरवठा वाढतो, त्या लवकर खराब होणाऱ्या असतात अन् त्या पटकन वापरून कशा लवकर संपवायच्या याची काळजी असते आणि म्हणून किंमत कमी मिळत असली तरी विक्री होते. या ठिकाणी वस्तू स्वस्त झालेली नसते, तर परिस्थितीनुसार किमतीवर परिणाम झालेला असतो. तसेच, तो कायमचा परिणाम नसून, तात्कालीन असतो.
कांद्याचे उदाहरण पाहिल्यास, समजा कांदानिर्मिती किलोला दहा रुपये आणि समजा तो किलोला तीस ते चाळीस रुपयांनी विकला जात आहे. मात्र, अचानक पडलेल्या पावसामुळे कांदा ओला झाला. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन त्याचे मूल्य पन्नास रुपयांवर गेले. या उलट खूप कांदा निर्माण झाला, साठवणूक क्षमता संपली आणि त्यामुळे तो विकून टाकावा लागला तर तो अगदी किलोला दोन रुपयांपर्यंत येतो. पण, होणारा परिणाम अल्पकालीन व परिस्थितीनुसार असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. अथवा कांद्याचे पीक कमी, पूर्वीचा साठवलेला कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतात. कारण मागणी जास्त व पुरवठा कमी अन् कोणत्याही वस्तूचे मूल्य वा किंमत मागणी-पुरवठ्यावर अवलंबून असते.
समान सूत्र; पण...
जगभरातील लोकांनी पारंपरिक इंधनावरील वाहने वापरण्याऐवजी वेळ वाया गेला तरी पायी प्रवास करायचा, असा निर्णय घेतल्यास कच्च्या तेलाच्या किमती खाली येतील. कारण त्याला केवळ औद्योगिक मागणी राहील. पण, असे किती काळ राहू शकते? कारण वेळ वाचवण्यासाठी आपण सेवेची किंमत मोजायला तयार असतो. सेवांच्या किमती या महाग वाटू शकतात, महागाई वाढत असल्याचे वाटू शकते. मात्र त्याच्या बदल्यात वेळ वाचवून नवी संपत्ती निर्माण करून त्या संपत्तीचा काही भाग वा उत्पन्नातील काही भाग वाढणाऱ्या महागाईला पूर्ण करण्यासाठी वापरतो. महागाईत वाढ झाली असे म्हणणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण पूर्वी एखादे लेक्चर कॉलेज वा संस्थेत देण्यासाठी ते किती पैसे आकारायचे आणि आता किती आकारतात, यावरूनच ते स्पष्ट होईल. पूर्वी म्हणजे २५ ते ३० वर्षांपूर्वी एका लेक्चरसाठी तीनशे रुपये मिळत होते आणि मात्र, आता त्यासाठी तीन हजार रुपये घेईन, असे सांगतात. त्यासाठी लागणारा वेळ, त्यात किती पैसे कमावले असते, महागाई आदींचा विचार करून ही किंमत ठरविलेली असते. आताच्या लेक्चरमध्ये आणि पूर्वीच्या लेक्चरच्या आशयामध्ये फरक पडलेला असतो का, तर नसतो. मात्र, मला वाढलेल्या किमती भागविण्यासाठी जे उत्पन्न मिळविणे गरजेचे आहे, त्याचा विचार करून लेक्चरची किंमत ठरवली जाते व ती तीनशे रुपयांवरून वाढून तीन हजार रुपयांवर पोचते. हीच गोष्ट प्रत्येक गोष्टीबाबत घडत असते आणि त्यामुळेच किंमतवाढ होते.
तात्कालीन स्वरूप अन् वाढ
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून विविध वस्तू व सेवांच्या किमतीत बदल झाला आहे. महागाई झाली म्हणून पूर्वी विरोधात असणारे आता वस्तूंच्या मूळ मूल्यातच वाढ झाली असल्याचे विश्लेषण करून त्याचे उदात्तीकरण करतात. अर्थात प्रत्यक्षात हिशोब केल्यावर लक्षात येते, की ही महागाई नसून, प्रत्यक्षात काळानुसार व सेवादात्याने लावलेल्या मार्क अपनुसार वाढलेली किंमत असल्याचे कळते. यावरून लक्षात येते, की केवळ वस्तूची किंमत वाढत नसून, त्याच्याशी निगडीत सर्वच गोष्टींच्या किमती वाढतात. तसेच, किंमतवाढ अपवादात्मक परिस्थिती सोडता सर्वच वस्तूंच्या किमती या वाढत असतात. तसेच, वाढ हा स्थायीभाव आहे. कारण तसे न झाल्यास त्या वस्तुचे उत्पादन वा उपलब्धताच होणार नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तूची वाढ होणे आवश्यक असून, ते झाल्यानेच प्रत्येक उत्पादक संबंधित वस्तूचे उत्पादन घेत राहील. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हा त्याचाच एक भाग आहे. अन्य वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात. त्यामुळे शेती फायद्याची होण्यासाठी म्हणजेच चार पैसे मिळण्यासाठी व महागाईत वस्तू खरेदी वा सेवा घेऊ शकण्यासाठी सरकार शेतकऱ्याला ‘एमएसपी’ वाढून देते. शेतकऱ्याला किंमत वाढवून न दिल्यास तो शेती करण्याचे बंद करेल.
परिणामी शेतमालाचा तुटवडा होऊन किमती आवाक्याच्या बाहेर जातील. याचे उदाहरण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलबिया व गव्हाच्या पुरवठ्यावर (निर्यातीवर) परिणाम झाला. जगाच्या बाजारपेठेत विविध ठिकाणांहून येणाऱ्या या वस्तू बंद झाल्या. त्यामुळे गहू व तेलबियांच्या किमती वाढल्या. गव्हाशी निगडीत असलेल्या प्रत्येक वस्तूच्या किमती वाढल्या. पण, गव्हाच्या वाढलेल्या किमती या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. गव्हाच्या किंमतवाढीमुळे अन्यत्र उत्पादन होईल वा शेतकरी चांगली किंमत मिळत असल्याने उत्पादन घेतील वा रशिया-युक्रेन युद्ध थांबून पुन्हा पूर्ववत पुरवठा होईल. वस्तूंच्या किमती सामान्यतः समसमान वाढत असतात, जेणेकरून प्रत्येकच गोष्ट दुसऱ्या गोष्टीला खरेदी करू शकेल. अगदी बारा बलुतेदार पद्धत पुन्हा आणली तरी तसेच होईल. पूर्वी दहा किलो गव्हाला दोन मीटर कापड मिळत असेल, तर आजही तेवढेच मिळेल. कारण दहा किलो गव्हाची किंमत त्या प्रमाणात वाढली असेल. म्हणजे प्रत्येकच वस्तू ही एकमेकांची थेट वा अप्रत्यक्ष हस्तांतरित होत असते, ती आता चलनाच्या स्वरूपात होत आहे. असेच कधीच होत नाही, की एका वस्तूची किंमत वाढली आणि दुसऱ्याची वाढत नाही.
किंमतवाढ सर्वत्र
आपण आता पाहिलेले विवेचन सामान्य परिस्थितीमधील आहे. पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश यांच्यात सध्या असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे उत्पादनच होत नसून, चलनांना किमती राहिलेल्या नाहीत, निर्यात नाही व आयात शक्य नसल्याने किमतीत वाढ होत आहे. मात्र, वस्तूंच्या किमती या चलनाचे मूल्य घटल्यामुळे वाढल्या नसून तुटवड्यामुळे वाढत आहेत. पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेशास वस्तू आयात करणे शक्य नसल्याने त्या वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. अशा वस्तू घेणाऱ्यांसाठी त्यांना अधिक किंमत मोजावी लागत असल्याने ते स्वतःकडील वस्तू अधिक किमतीने विकत आहेत वा वाढवत आहेत. याचाच अर्थ असा, की महागाई, चलनवाढ काळानुसार चालणारी गोष्ट असून, त्यावर तात्कालीन परिणाम होत असतो. परंतु, महागाई वा किंमतवाढ ही अटळ गोष्ट आहे.
(लेखक आर्थिक व कमॉडिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.