विक्रीकर खात्याकडून व्यवसाय कराच्या कायद्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. व्यवसाय कर हा प्रत्येक व्यक्ती किंवा मालक, जो कोणताही व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करीत असेल, त्यांनी भरणे गरजेचे आहे. जी कंपनी, भागीदारी संस्था, व्यक्ती आपल्याकडे नोकरी करीत असणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय कर कापत असते, त्यांना व्यवसाय कर व त्याचे विवरणपत्र भरणे गरजेचे असते. नवीन बदलानुसार, आता ज्यांनी व्यवसाय कर विवरणपत्र ३१ मार्च २०१७ पर्यंत भरलेले नाही किंवा काही विवरणपत्रे भरायची आहेत, ते ३० सप्टेंबरपर्यंत ही विवरणपत्रे भरू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ही मुभा सर्व व्यावसायिकांना विवरणपत्र भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दिली गेली आहे.
व्यवसाय कर कायद्यामध्ये कलम ‘४ बी’चा समावेश करण्यात आला आहे. नवीन तरतुदीनुसार, एप्रिल २०१७ पासून ‘आयआरडीए’ कायद्यानुसार नोंदणी झालेल्या प्रत्येक विमा कंपनीने दरवर्षी रु. २५०० चा व्यवसाय कर आपल्या एजंटांच्या कमिशनमधून कापून सरकारजमा करायचा आहे. ज्या महिन्यात व्यवसाय कर कापला असेल, त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या आत तो भरावा लागणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय कर विवरणपत्र, असेसमेंट, पुनर्प्राप्ती अपील आदींची पूर्तता पण करावी लागेलच.
विमा एजंटांनी जर आधीच व्यवसाय कर क्रमांक (वैयक्तिक) घेतला असेल आणि रु. २५०० चा व्यवसाय कर भरला पण असेल, तर कंपन्यांनी परत भरण्याची गरज नाही. पण या एजंटांना आता वैयक्तिक व्यवसाय कर क्रमांक रद्द करावा लागणार आहे आणि हा क्रमांक एक एप्रिल २०१७ पासून रद्द करण्यात येईल. जर एकाहून अधिक कंपन्यांचा तो विमा एजंट असेल तर एजंटांनी ठरवायचे, की कोणत्या कंपनीने त्याचा वार्षिक रु. २५०० व्यवसाय कर कापावा आणि भरावा. २०१७-१८ चा व्यक्तिगत व्यवसाय कर रु. २५०० हा ३० जून २०१७ पर्यंत भरणे अपेक्षित आहे.
नवीन तरतुदीनुसार, ज्यांनी व्यक्तिगत व्यवसाय कर क्रमांक एक एप्रिल २०१७ नंतर घेतले असतील किंवा घेतील, पण प्रत्यक्षात त्यांनी नोंदणी आधीच करायला पाहिजे होती, अशा व्यक्तींना आता फक्त चार वर्षे आधीचा व्यवसाय कर भरावा लागणार आहे. जर हा व्यवसाय कर क्रमांक एक एप्रिल २०१७ च्या आधी घेतला असेल किंवा तारीख आधीची असेल, तर त्यांना आठ वर्षे आधीपासून व्यवसाय कर लागू होतो. पण, त्यासाठी त्यांची नोंदणी तारीख (उद्योग, धंदा, प्रॅक्टीस) बघावी व त्या तारखेपासून कर भरावा. या योजनेचा लाभ डॉक्टर, वकील यांनी जरूर घ्यावा. एक मे २०१७ पासून व्यवसाय करामध्ये सुधारित व्याजदर लागू झाले आहेत. हे व्याजदर विक्रीकराच्या सुधारित दराप्रमाणे आहेत. ते सोबतच्या चौकटीप्रमाणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.