वाढत्या महागाई किंवा मंदावलेल्या जागतिक वाढीच्या परिस्थितीमध्ये जगभरातील कॉस्ट ऑप्टिमायझेशन ड्राइव्हमुळे (खर्च नियंत्रण) संरचनात्मक दृष्टिकोनातून भारताला मोठा फायदा
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६२,१८१ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १८,४९६ अंशांवर बंद झाला. संभाव्य जागतिक मंदीची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला झळ पोहोचेल या धसक्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. परिणामी गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’मध्ये ३९० अंशांची, तर ‘निफ्टी’मध्ये ११२ अंशांची घसरण झाली. एचसीएलटेक या कंपनीच्या व्यवस्थापनाने महसूलबाबत सावधगिरीने आपले मत व्यक्त केल्याने या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. एचसीएलटेक पाठोपाठ टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आदी आयटी क्षेत्रातील शेअरनी देखील घसरण दर्शविली.
माहिती तंत्रज्ञान उद्योगात, डेटा, विश्लेषणे आणि एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) कृत्रिम बुद्धिमत्ता चलित प्रक्रियांचे स्वरूप बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या व्यवसायांच्या स्पर्धा आणि कार्यपद्धतीत क्रांती घडवत आहे. बदलणारी डिजिटल क्रांती ही व्यवसायात काम कसे केले जाते, उद्योगांची रचना कशी केली जाते, सर्व स्तरातील लोक कसे कार्य करतात या सर्वच बाबींवर परिणाम करत आहे. २१ व्या शतकात भरभराट होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटाला केंद्रस्थानी ठेवून दीर्घकालीन स्पर्धात्मक फायद्यासाठी डिजिटल आणि पारंपारिक व्यवसाय कार्यपद्धतींचे मिश्रण करत कंपन्यांना व्यवसाय करणे आवश्यक आहे. कंपनी व्यवस्थापन करताना उपलब्ध ग्राहकाच्या खरेदीच्या संदर्भातील वर्तणुकीचे विश्लेषण करून विविध स्तरावर पुरवठा साखळीत तसेच व्यवस्थापनात टेक्नॉलॉजीचा वापर करून पेंट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी एशियन पेंट्स, पॅराशूट हेअर ऑइलची निर्माती मॅरिको, जॉकी या नामवंत ब्रँडच्या कपड्यांची भारतात निर्मिती आणि वितरण करणारी पेज इंडस्ट्रीज, बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँक, कर्ज वितरण व्यवसायात गुंतलेली बजाज फायनान्स आदी अनेक कंपन्यांनी व्यवसायात गुंतविलेल्या भांडलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायात ऊत्तम प्रगती केली आहे.
वाढत्या महागाई किंवा मंदावलेल्या जागतिक वाढीच्या परिस्थितीमध्ये जगभरातील कॉस्ट ऑप्टिमायझेशन ड्राइव्हमुळे (खर्च नियंत्रण) संरचनात्मक दृष्टिकोनातून भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मागणीचा विचार करता तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त तसेच कुशल मनुष्यबळ हे भारतीय आयटी सेवा कंपन्यांचे बलस्थान आहे; मात्र सध्या मागणीनुसार पुरेसे कर्मचारी टिकविणे हे मुख्य आव्हान असू शकते. या क्षेत्रातील टीसीएस -टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एलटीआयएम-एलटीआय माईंड ट्री, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस) आदी कंपन्याच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना शॉर्ट टर्ममध्ये म्हणजेच अल्पावधीमध्ये पडझड होत असल्यास गुंतवणूकदारांनी ‘शॉर्ट टर्म पेन्स’ अर्थात काही काळासाठी पडझडीचा सामना करण्याची तयारी ठेवली तर त्यांना ‘लाँग टर्म गेन्स’ म्हणजेच दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकेल.
डिजिटल आणि पारंपरिक व्यवसाय कार्यपद्धतींचे मिश्रण करत कर्ज वितरण क्षेत्रात व्यवसायवृद्धी करत असलेल्या एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरचादेखील दीर्घवधीच्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. बाजाराची तीव्र चढ-उतार दर्शविण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन संधी ओळखत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची पद्धत अवलंबल्यास चढ-उतारांचा सामना करणे शक्य होऊ शकेल.
(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.