Bhushan Mahajan writes about Sputnik Adani market share market Twitter Sakal
अर्थविश्व

स्फुटनिक अदानींवर की बाजारावर?

पुढील आठवड्यात ‘अमुक तमुकवर स्फुटनिक सुटणार,’ असे जाहीर

भूषण महाजन

का ही वर्षापूर्वी ‘मराठा’ दैनिकाची शोधपत्रकारिता हा चर्चेचा विषय असे. पुढील आठवड्यात ‘अमुक तमुकवर स्फुटनिक सुटणार,’ असे जाहीर झाले, की त्या त्या तंबूत घबराट होऊन पळापळ सुरू व्हायची. कधी ते स्फुटनिक सुटायचे, तर कधी फुसके निघायचे, पण तत्कालीन राजकारणात मात्र मोठी हालचाल व्हायची.

आता ती जागा ट्विटरने किंवा व्हिसल ब्लोअरने घेतली आहे. मागे एकदा सुचेता दलाल यांनी केलेल्या ट्विटमुळे अदानी समूहाच्या शेअरना खालचे सर्किट लागले होते. कंपनीची काही खाती ‘एनएसडीएल’ने गोठवली आहेत, असा कथित आरोप होता. पुढे जाऊन मात्र ते एक पेल्यातील वादळच ठरले.

यावेळी मंदीवाले पूर्ण तयारीने उतरले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे, जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्हजचे विश्लेषण करते व त्यातून मोठ्या कंपन्यांचा गडबड-घोटाळा उघडकीस आणते.

या संस्थेने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. यावेळी त्यांचे स्फुटनिक अदानी समूहावर आदळले. निमित्त होते अदानी समूहाचा वीस हजार कोटीचा ‘एफपीओ’. सुमारे दोन वर्षे संशोधन करून संस्थेने अदानी व्यवस्थापनाला ८८ प्रश्न विचारले आहेत.

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, की हिंडेनबर्ग ही काही समाजसेवा करीत नाही. आपल्या रिसर्चचा स्वत:ला भरपूर फायदा करून घेण्यासाठी प्रथम शेअर अथवा बॉंड शॉर्ट करतात आणि नंतर आपला अहवाल प्रसिद्ध करतात. अहवाल आल्यावर तो शेअर खाली आला, तर तो पुन्हा विकत घेऊन नफा कमावतात. चालू वेळ मात्र त्यांनी अचूक साधली आहे.

हिंडेनबर्गचे प्रमुख आरोप

अदानी समूहाने हवाला मार्गाने परदेशी पैसे पाठवले आणि ते परदेशी संस्थांमार्फत पुन्हा स्वत:च्याच शेअरमध्ये गुंतवून शेअरचे भाव फुगवले.

अदानी समूहामध्ये सर्व काही आलबेल नाही, काही प्रवर्तकांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. कायदेशीर कारवाई चालू आहे.

समूह ऑपरेटर्सना हाताशी धरून शेअर बाजारात मोठी उलाढाल करते आणि त्यातून शेअरचे भाव फुगवते. त्या वाढीव भावांवर पुन्हा कर्ज घेते व नवनव्या कंपन्या विकत घेते.

या समूहावर प्रचंड कर्ज आहे व ते फेडले नाहीतर देणाऱ्या बँका बुडतील.

समूहाच्या वहीखात्यांमध्ये गडबड आहे, आतापर्यंत चार ‘सीएफओ’ कंपनी सोडून गेले आहेत वगैरे वगैरे.

यावर अदानींनी सर्व आरोप खोडून काढत ‘आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू,’ असे म्हटले आहे आणि ते आव्हान हिंडेनबर्गने स्वीकारले आहे. यातला पहिला आरोप यापूर्वीही झालेला आहे. भारतातून हवाला मार्गाने पैसे परदेशी जातात व ‘योग्य’ त्या वेळी मॉरीशसमार्गे ते देशात आणले जातात, असा आरोप वेळोवेळी केला जातो.

यात काही राजकीय नेत्यांची नावेही मागे येत असत. आजपर्यंत तरी असा आरोप सिद्ध झालेला नाही.तसेच पूर्वीही ऑपरेटर्सचे नाव घेतले जात असे. खरेतर, शेअर बाजारात ऑपरेटर्स असतातच. कोणत्याही कंपनीच्या शेअरचा मोठा हिस्सा स्वत:कडे असणे व त्याबरोबर भरपूर भांडवलाचे त्याला पाठबळ असणे हे त्यासाठी आवश्यक आहे.

बहुतेक ऑपरेटर्सचे काही लाडके शेअर असतात व त्यात ते पैसे कमावतात व प्रसंगी मारही खातात. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या हातात हात घालून असे काम करणे नक्कीच चुकीचे आहे व सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या हिताविरुद्ध आहे.

आता ‘सेबी’ ही या प्रकरणात उतरली आहे व अदानी समूहाच्या बाबतीत खरेच काही हितसंबंध (नेक्सस) गुंतलेत का? याची चौकशी होणार आहे. खरे काय ते लवकरच कळेल.

समूहावर मोठे कर्ज आहे हा आरोप नसून, वस्तुस्थिती आहे. परंतु त्या कर्जासाठी तारण म्हणून मोठी मालमत्ता (अॅसेट्स) आहेत. शेअर तारण ठेऊन घेतलेले कर्ज चिंताजनक आहे. ते बुमरँगप्रमाणे उलटू शकते. मोठा धोका तेथेच आहे.

एकूण दोन लाख कोटी कर्जापैकी, ३८ टक्के कर्ज देशांतर्गत बँकांकडून उचलले आहे. गेल्या चार वर्षांत हे कर्ज एक लाख कोटींवरून दुप्पट झाले आहे. या अहवालाप्रमाणे हा समूह दिवाळखोर झाल्यास सरकारी बँका अडचणीत येऊ शकतात.

पायाभूत उद्योगांच्या उभारणीत प्रचंड भांडवल लागते व ते पूर्ण नफ्यात येण्यास अनेक वर्षे जावे लागतात. स्वातंत्र्यानंतर सरकारने स्वत: उभे केलेले अनेक उद्योग अजूनही तोट्यात आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

विमानतळ, बंदरे, उर्जा निर्मितीसारख्या क्षेत्रात भारताने मारलेली मजल कौतुकास्पद आहे व त्यात अदानी समूहाच्या उद्यमशीलतेचा मोठा वाटा आहे हे नक्की. आज या समूहाच्या शेअरचे पी/ई गुणोत्तर (पोर्ट व पॉवर सोडल्यास) ८० च्या पुढे आहे; तसेच कामगिरीही यथातथाच आहे. अदानी एंटरप्रायझेसचा महसूल ७५ टक्के वाढूनही नफा खालीच आला असून, विक्रीच्या दीड टक्के आहे.

सुमारे दोन वर्षे संशोधन करून 'हिंडेनबर्ग'ने केलेल्या आरोपात जर तथ्य आढळले, तर परदेशी वित्तीय संस्थांचा भारतीय गुंतवणुकीवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.

गुंतवणूकदारांपुढील पर्याय

अदानींच्या कंपनीचे शेअर असेच घसरत राहिले, तर ते इश्यूची किंमत २० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात, अथवा पुरेसा भरणा झाला नाही, तर ही भागविक्री पुढे ढकलू शकतात. ते मानहानीकारक असले तरी शक्य आहे. पण कंपनीने ती शक्यता फेटाळल्याचे समजते.

अदानी समूहाचे बाजारातील तरंगते भांडवल जेमतेम पाच टक्के आहे. त्यामुळेच मोठे चढ-उतार होऊ शकतात. आपला चाहतावर्ग हाताशी धरून ‘शॉर्ट स्क्वीझ’ निर्माण करणे अशक्य नाही. तसे झाल्यास मंदीवाल्यांना पळता भुई थोडी होईल. मागे रिलायन्सवर मंदीवाल्यांचा हल्ला झाल्यावर असे झाले होते. त्यानंतर त्यावाटेला कोणी गेले नाही.

दोन-तीन वर्षांत या समूहाचे शेअर अनेक पटीने वाढले, तसे होत असतांना माध्यमांसह साऱ्यांच्याच नजरेतून सुटले कसे, हा प्रश्नच आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने हे सारे वादळ शांतहोईपर्यंत थांबावे. या समूहातील शेअर कोणत्याही निकषात महागच आहेत. त्याच्या नादी न लागता, या निमित्ताने खाली आलेल्या सिमेंट व सरकारी बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT