कागलच्या जयसिंगराव पार्कमधील तानाजी पाटील यांनी हा वेळ सत्कारणी लावताना टेरेस शेतीचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही ठरला. आपल्या घरासाठी विषमुक्त भाजी कशी मिळेल, या विचारातून त्यांनी टेरेसचाच उपयोग करण्याचे ठरविले आणि ते कामाला लागले.'यूट्यूब'च्या माध्यमातून त्यांनी टेरेसवर केलेले शेतीचे विविध प्रयोग पाहिले आणि स्वतःच्या टेरेसवर प्रयोग सुरू केले. आज त्यांची शेती चांगलीच बहरली आहे. लवकरच त्यांना उत्पादन मिळण्यास सुरवात होईल. हे करताना त्यांनी केवळ भाजीपाला पिकवणे हा उद्देश ठेवला नाही, तर वेगवेगळे प्रयोगही त्यांनी सुरू ठेवले आहेत. टेरेसलाच त्यांनी प्रयोगशाळा बनविले आहे.
त्यांनी टेरेसवर आंबा, चिकू, सफरचंद, बोर, डाळिंब, पेरू, अंजीर आदी कलमी रोपे लावली आहेत. यासाठी तीन बाय तीनचे विटांचे चौकोन तयार केले आहेत. यामध्ये नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, गांडूळखत, कोकोपीट टाकले आहे. त्यामध्ये ही रोपे लावून जीवामृत टाकले आहे. या झाडांना भविष्यातही माती न घालता पालापाचोळाच टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील यांनी टाकाऊ बादल्या आणल्या. त्यांना रंग देऊन त्या देखण्या केल्या आहेत. या बादल्यांत त्यांनी फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, टोमॅटो तसेच कारले, दोडक्यासारख्या वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली आहे. त्यासाठी शेडनेटही उभारले आहे. शेडच्या चार खांबांशेजारी वेलवर्गीय भाज्या लावल्या असून तो वेल शेडनेटच्या छतावर चारही बाजूंनी जाईल अशी व्यवस्था केली आहे. जेणेकरून चोहोबाजूंनी भाजीपाला लगडेल. शेडनेटच्या खाली भाजीच्या बादल्या ठेवल्या आहेत. माकडांच्या त्रासापासून बचावासाठी टेरेसच्या चारही बाजूस तारेचे कुंपण केले आहे.
मिरची, वांगी, टोमॅटोच्या झाडांच्या मुळाशी तांब्याच्या रिंगा घातल्या आहेत. त्या माध्यमातून तांब्याचा अंश झाडांना मिळतो. त्यांनी मातीच्या भांड्यात ताक ठेवले असून ताकातही तांब्याची तार टाकली आहे. गुलाबाच्या वेगवेगळ्या फांद्या जगवण्याचेही त्यांचे प्रयोग सुरू आहेत. दिवसभरात ते सकाळी आणि संध्याकाळी दोन-दोन तास टेरेसवर घालवतात. झाडाचे पान अन् पान न्याहाळतात. कीड, रोग आहे का पाहतात. काही फरक जाणवल्यास त्यांचा सेंद्रिय प्रयोग सुरू होतो. ते झाड बाजूला ठेवून ते उपाययोजना सुरू करतात. शेतकरी कुटुंबातील असल्याने मित्रकिडे, शत्रूकिडे कोणते याचे ज्ञान आहे. वेगळे काही दिसल्यास आपण उपाय शोधतो, असे पाटील सांगतात. झाडाचे पान हाती घेतल्यानंतर ते पान आपल्याशी बोलते, आपली ख्यालीखुशालीच सांगते, असा भास होतो. एक वेगळाच आनंद, जो शब्दातीत आहे, असे तानाजी पाटील सांगतात.
उत्पादन चांगले येण्यासाठी आपण टूजी, थ्रीजी (सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन) पद्धत वापरत असल्याचे ते सांगतात. घरासमोरील बंदिस्त गटार आणि कुंपणाचाही उपयोग त्यांनी झाडे लावण्यासाठी केला आहे. कमीत कमी खर्चात ते येथे शेती करत आहेत आणि प्रयोगही करत आहेत. त्यांचे प्रयोग नक्कीच अनुकरणीय असे आहेत.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.