'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे..' बालकवींच्या या ओळी ऐकल्या की मन किती प्रसन्न होतं नाही? ज्या व्यक्तीने कधीही श्रावणामध्ये निर्सगात होणारे सुंदर बदल अनुभवले नसतील, तो व्यक्तीसुद्धा मनातल्या मनात श्रावण इमॅजिन करु लागतो. केवळ इमॅजिनच नव्हे तर काही काळासाठी तो गावच्या गोड आठवणींमध्ये रमूनही जातो. श्रावण महिना म्हटलं की वातावरण अगदीच बदलून जातं. ऊन-सावल्यांचा खेळ, मनावरची मरगळ दूर करणारी वाऱ्याची मंद झुळूक, आठवणींमध्ये रमायला लावणारा पाऊस..असं सुंदर वातावरण या ऋतूमध्ये पाहायला मिळतं. खरं पाहायला गेलं तर सध्याच्या पिढीला श्रावणातील अशा काहीच आठवणी राहिलेल्या नाहीत. मात्र, आपल्या आजी-आजोबा अगदी आई-वडिलांकडेही श्रावण महिन्यातील अगणित आठवणींचा साठा आहे. म्हणूनच, जो श्रावण आपण कधी अनुभवला नाही तो आपण त्यांच्या आठवणींच्या साठ्यातून नक्कीच अनुभवू शकतो. (article about shravan and women childhood village memories)
गावाकडे श्रावणाचा उत्साह काही वेगळाच असतो. अगदी श्रावणी सोमवारपासून ते गोकुळाष्टमीपर्यंत प्रत्येक दिवस अन् सण थाटातच साजरा केला जातो. श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिली जाते. हा सोमवार होत नाही तोच लगेच शुक्रवार येतो. या शुक्रवारी सुद्धा प्रत्येक घरी स्त्रिया हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. आणि, आलेल्या सुवासिनींना गुळ-फुटाण्यांची खिरापत देतात. तसं पाहायला गेलं तर श्रावण म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या हक्काचाच महिना असतो. कारण, या महिन्यात स्त्रिया प्रत्येक लहान मोठ्या सण-उत्सवांमधून त्यांचा आनंद जपत असतात. आजही गावाकडे श्रावणात मंगळगौर, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा असे कित्येक सण,उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. खरं तर या प्रत्येक दिवसाची प्रत्येकाकडेच वेगळी आठवण असेल.
मला आजही चांगल आठवतंय श्रावण महिन्याची चाहूल लागायला लागली की माझी आई बेचैन व्हायची. तिचं मन सतत गावाकडे ओढ घ्यायचं. म्हणजे मूळ गाव सोडून आज तिला कित्येक वर्ष झाली आहेत. मात्र, आजही तिच्या मनात श्रावणातील आठवणी अगदी जशाच्या तशाच ताज्याच आहेत. आजही श्रावण आला की ती भरभरुन बोलते. मुळात ती केवळ तिच्या आठवणीच शेअर करत नाही. तर, पुन्हा एकदा तिचं बालपण अनुभवत असते. आजही श्रावण आला की तिचं मन गावातील वडाच्या पाराभोवती जातं आणि वडाच्या पारंब्यांना बांधलेल्या झोक्यावर ती मनसोक्तपणे झोका घेते.
श्रावणातील आठवणी सांगत असताना आईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लकाकी असते. तिच्या प्रत्येक शब्दांतून तिची गावाशी आणि जुन्या रितीरिवाजांशी असलेली घट्ट वीण सतत दिसून येते. मुळात ती बोलत असताना तिचा उत्साह, तिची ओघवती शैली सारं काही पाहण्यासारख असतं. आई बोलत असते आणि मी मात्र एकटक तिला न्याहळत असते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्सुकता सारं काही पाहण्यासारखं असतं. विशेष म्हणजे तिच्या या गोष्टी अनेकदा मलासुद्धा तिच्या बालपणात घेऊन जातात.
माझ्या आईचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव. कदाचित अनेकांना ठाऊकही असेल की नगर जिल्ह्यात प्रत्येक सण, उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे सण लहान किंवा मोठा असा भेदभाव तिथे नसतोच. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवस, सण तेथे थाटातच साजरा केला जातो. नगर जिल्ह्यात नागपंचमी सणालाही तितकंच महत्त्व आहे.
श्रावणात येणारा नागपंचमीचा सण म्हणजे एक प्रकारचा उत्साहच. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सगळ्या बायका आणि मुली हातावर छान मेंदी काढत. त्याकाळी मेंदीचे कोन वगैरे असा प्रकार नव्हता. मेंदीची पानं वाटून त्याचाच लेप हातावर लावला जाई. मेंदीचा कार्यक्रम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी गावातील सगळ्या स्त्रिया पहाटे लवकर उठून, पूजाआर्चा करुन दारापुढे मस्त रांगोळी घालत. त्यानंतर पुजेचं साहित्य, नागदेवाला दाखवायचा नैवेद्य अशी सारी तयारी करुन छान नटूथटून वारुळावर जात. यावेळी आपल्या आईच्या मागे तिची लहान मुलंसुद्धा जात.
वारुळावर गेल्यानंतर स्त्रिया नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी व त्याची पूजा करण्यासाठी लगबग करत. विशेष म्हणजे सुवासिनींची ही पूजा होईपर्यंत गावातील मुली झाडाला झोका बांधून मस्त झोके घेत. इतकंच नाही तर नागोबाची पूजा झाल्यावर स्त्रिया सुद्धा झोक्यावर बसून गाणी म्हणतं. वाऱ्याच्या तालावर त्यांची गाणी रंगत जायची आणि या गाण्यातून त्यांचं दु:ख मांडलं जायचं. माहेरी जाण्याची घालमेल दिसून यायची. हाच काय तो एक काळ होता ज्यात त्या स्वत: मध्ये रमत होत्या. सगळी दु:ख विसरुन मुक्तपणे वावरत होत्या. विशेष म्हणजे या स्त्रियांची होणारी ही घुसमट आज २१ व्या शतकातही काही अंशी पाहायला मिळते. फक्त त्या बंधनाचं स्वरुप थोडं बदललं आहे.
आज प्रत्येक स्त्री स्वतंत्र झालीये असं म्हटलं जातं. पण, खरंच ही स्त्री स्वतंत्र झालीये का? केवळ तिला नोकरी करण्याची मुभा दिली किंवा तिचं मत मांडायचे अधिकार दिले म्हणजे ती स्वतंत्र झाली? आज अनेक मुलींवर असंख्य बंधन आहेत. आजही तिच्या मुक्तपणे वावरण्यावर बोट उचललं जातं. त्यामुळे तिने कितीही उंच उडण्याचा, स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील तिच्या प्रत्येक कृतीमागे तिला कायम कुटुंब, समाज यांचा प्रथम विचार करावा लागतो. त्यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते काळ कितीही बदलला तरीदेखील काही गोष्टी या कायमच तशा राहतात. अगदी बंधनसुद्धा...
joshi.sharvari1993@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.