"होम', हे त्याचं एक गाजलेलं चित्र आहे. चित्राची चौकट भरून राहिलेलं एक बंगलेवजा घर आपल्याला दिसतं. त्या घरावर छत्रछाया धरणारं प्रचंड झाड आहे. समोर व्हरांडा आहे. पण त्या घराच्या मागच्या बाजूनं ते घर एका प्रचंड मोठया स्त्रीनं आपल्या कवेत घेतलं आहे. ती बाई वाकून समोर अंगणात पहाते आहे. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास, राग, वैताग, त्रागा वगैरे भावना जेमतेम दोनचार रेषात जिवंत झाल्या आहेत... आणि अंगणातल्या कोपऱ्यात नीट पाहिल्यावर आपल्याला दिसतोय तो इवलासा, दबकत पावलं टाकत येणारा, जरा वेंधळा, घाबरलेला एक माणूस. कोण असतील हे दोघं? आपल्या रागीट स्वभावामुळे उभ्या घरादाराला आपलाच स्वभाव बहाल केलेली ही घरमालकीण तर नाही?... आणि नको ते घरी परत जाणं आणि पुन्हा तिच्या तावडीत सापडणं, असा विचार करणारा तो मालक दिसतोय. त्या प्रचंड घरापुढे आणि घर व्यापून दशांगुळे उरलेल्या त्या बाईपुढे हा माणूस फारच थोटका दिसतो. पण त्याच्या खुज्या रेखाटनातच त्याच्या मनीच्या भावनांचा अर्क उतरला आहे हे नक्की.
थर्बरचं असंच एक गाजलेलं चित्र. इथे पती-पत्नी अपरात्री अंथरुणात उठून बसलेले दिसतात. पतिराज झोपेतच आहेत. चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि प्रसन्न भाव आहेत. स्वप्नातच त्यांनी आपल्या हाताचं पिस्तूल करून बायकोवर रोखून धरलंय. बायको मात्र या हल्यानं घाबरलेली आहे, दचकलेली आहे. डोळे विस्फारून ती नवऱ्याचं हे रूप पहाते आहे. कोणता नवरा खरा? स्वप्नात पत्नीवर पिस्तूल रोखून आनंदी दिसणारा खरा का? जागेपणी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा खरा? झोपेत संयमाच्या सगळ्या शृंखला गळून पडल्यावर दिसणारं नवऱ्याचं रूप हेच सत्य समजायचं का? चित्रातल्या बायकोपेक्षा चित्राच्या प्रेक्षकांच्या मनात थर्बर जास्त प्रश्न निर्माण करतो.
आणखी एक चित्र तर भन्नाटच आहे. एक पार्टी ऐन रंगात आलेली दाखवली आहे. मुख्यत्वे गॉसिप चालू आहे. अशा गर्दीत एकच सुटाबुटातले विद्वान नुसतेच कोपऱ्यात पहात बसले आहेत. शेजारच्या कोचावरच्या दोन उच्चभ्रु स्त्रिया एकमेकींच्या कानात कुजबुजताहेत, ह्यांना खरं तेवढंच माहित असतं बाई..! म्हणजे गावगप्पा टाळणं योग्य, की एखाद्या रंगीत संध्याकाळी, गावगप्पांच्या साथीनं, गाव आणि गप्पा दोन्हीही एन्जॉय करणं चांगलं? थर्बरनं हा निर्णय आपल्यावरंच सोडलेला आहे.
श्रेष्ठ साहित्य आणि श्रेष्ठ चित्रसुद्धा दरवेळी नवा आणि वेगळा अनुभव देतं. प्रश्नांची तयार उत्तर देण्यापेक्षा उकल करण्याची वेगळी दृष्टी देऊन जातं. खरंतर व्यंगचित्रांबद्दल मी शब्दात काय वर्णन करणार कप्पाळ. तुमची उत्सुकता चाळवणं एवढाच माझा हेतू. जेम्स थर्बरच्याच शब्दात सांगायचं तर, टवाळी, उपरोध वगैरे प्रकार इतरांची चेष्टा करतात. पण खरा विनोदवीर मात्र स्वतःकडे पाहून हसतो. लोकांना हसवतो आणि या भानगडीत लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे आपोआप गळून पडतात. हे आत्मदर्शन विलक्षण असतं हेच खरं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.