मी सांगत असलेली गोष्ट समाजाने वेडा ठरवलेल्या जगन्नाथ नावाच्या एका माणसाची आहे. जेग्या, जग्या, येडा तात्या, येडा जगण्या ही त्याची टोपण नावं. याच्याशी माझं नेमकं नातं काय होतं हे मला आजही गवसलेलं नाही; पण मी लहान असल्यापासून, म्हणजे अगदी नुकतचं कळायला लागल्यापासून त्याच्याविषयी मला सुप्त आकर्षण होतं. घरानं, गावानं सोडलेला आणि बेरजेत न धरलेला तो एकमेव प्राणी होता. त्याच्याविषयी अनेक कथा, दंतकथा मी लहानपणापासून ऐकत होतो. लहान असताना घरातल्यांचं ऐकलं नाही किंवा अभ्यास केला नाही, की आम्हाला ‘येडा जग्या धरून घेऊन जाईल’ अशी धमकी मिळायची. आम्हाला कळायचं नाही की हा येडा जग्या आम्हाला घेऊन गेल्यानंतर काय करेल? पण काही तरी भयंकर करत असेल अशी भीती मात्र बालमनानं घेतली होती. असा हा येडा जग्या अगदी बाळ असल्यापासून माझ्या भावविश्वाला चिकटून आहे अगदी आजपर्यंत. मी जसजसा मोठा होत होतो तस तसा तो म्हातारपणाकडे झुकत होता. पाच, सव्वापाच फूट उंची, सावळा रंग पण, स्वच्छता नसल्यामुळे अगदी काळा पडलेला. अंगावर अतिशय मळलेले फाटके कपडे, त्यातही सदरा वेगळ्याच रंगाचा आणि अगदी लांबसडक ढगळा, तर पॅंट दुमडून- दुमडून घातलेली. अर्थात हे सगळं कुणी तरी दिलेलंचं. अगदी हडकुळी मूर्ती. गालांची हाडं वर दिसणारी. दाढीचे खुंट वाढलेले. दोन्ही डोळे खोल खळग्यात बसवल्यासारखे. सगळं शरीर नको इतकं लवचिक, चालताना तो फरपटत सतरा ठिकाणी लचकत चालायचा. शक्यतो त्याने घातलेल्या पॅंटला सुतळी किंवा काठाळी बांधलेली असायची. डोक्यावरचे केस अगदी कमी झाली होते. त्यामुळे त्याचं डोकं सोललेल्या नारळासारखं तुळतुळीत दिसायचं. कोणी दिली तर हा तंबाखूही खायचा. भुकेची शुद्ध नसल्यामुळं त्याचं सगळं शरीर दुर्बळ आणि निस्तेज दिसायचं. तसा याचा गावाला काहीच त्रास नव्हता, अगदी काहीच. गावातल्या एखाद्या न्हाव्याच्या दुकानात गर्दी नसेल तर याची फुकटात दाढी व्हायची आणि दोन-चार दिवस याचा चेहरा चमकायला; पण हे अगदी क्वचित व्हायचं.
गावातल्या एक- दोन हॉटेलात कुणाच्यातरी बागेतला कडीपत्ता, कुणाच्या तरी वावरातली कोथिंबीर असं काही तरी येडा जग्या चोरून नेतो म्हणून त्याच्या नावानं बोंबाबोंब व्हायची. त्यात किती तथ्य होतं कोण जाणे; पण कधी तरी या हॉटेलांमधून त्याच्या हातात एखादा बालुशा किंवा भेळीचा पुडा पडत असे. खरं तर गावाकडं कालवणासाठी एखाद्याच्या वावरातनं आणलेल्या मिरच्या, कडीपत्ता, कोथिंबीर, चार वांगी किंवा तत्सम काही याला चोरी म्हणत नाहीत. ही तर शेतकरी संस्कृती आहे. गावगाडा आहे; पण पावत्या मात्र येड्या जग्याच्या नावानं फाडल्या जायच्या.
आनेवाडीला टोल नाका झाल्यानंतर जग्या कधी तरी टोल नाक्यावर थांबलेल्या गाड्यांना पैसे मागतानाही दिसायचा. त्याला भूक लागली असेल तर तो गावातल्या लोकांना जाता-येता पैसे मागायचा. स्वतःचा कळकटलेला हात तोंडाजवळ घेऊन तो भूक लागलीये एवढच खुणेनं सांगायचा. लोक त्याला चार-दोन रुपये काढून द्यायचे. त्यावर कुठं वडापाव खा, चहा पी असे त्याचे उद्योग चालायचे. त्याला घरातलं कोणी नव्हतं असं नाही; पण घरी जाण्याची यालाचं शुद्ध नसे. त्याला भाऊ होते. छोटंस घर होतं. टोपल्यात याच्या नावाची अर्धी-कोर भाकरी असायची; पण क्वचितच ती त्याच्या तोंडाला लागत असे. आपल्या समाजात दुबळ्यांवर आवाज चढवून बोलण्याची, हात उगारण्याची, त्यांना फटकारण्याची परंपरा आहे. काही मंडळींना यातचं शौर्य आणि पराक्रम वाटतो. जगू अशा अनेक प्रसंगांचा बळी ठरला होता. एखाद्या दुकानाच्या कट्ट्यावर कोणीही यावे आणि याला सहज फटका द्यावा, अशी परिस्थिती होती.
खुपदा तर त्याला सुजेपर्यंत मार बसलेला होता. कुठल्याही न केलेल्या गोष्टी त्याच्या माथी मारून त्या दुबळ्या जीवाचे हाल केले गेले होते. जाब विचारणारा कोणीही नसलेल्या लोकांवरच हल्ली समाज मर्दुमकी गाजवत असतो. तो कधी तरी माझ्या वडिलांसमोर हात पुढे करायचा, मग वडील त्याला दोन-तीन रुपये देत. मी हे अनेकदा पाहिलं होतं. पुढे मी कॉलेजला जाऊ लागलो. माझ्या खिशात थोडे पैसे येऊ लागले. जगू माझ्याही समोर हात तोंडा जवळ घेऊन जायचा. मग मी खिशातले सुट्टे पैसे त्याच्या हातावर टेकवायला लागलो.
एक दिवस सकाळी-सकाळी मी गडबडीनं कुठे तरी चाललो होतो. समोर जगू येताना दिसला, म्हटलं हा आता जवळ येईल पैसे मागेल म्हणून मी खिशात हात घातला. तो जवळ येताच त्याने मागण्या आधी पाच रुपयाचे नाणं मी त्याच्या समोर धरलं. त्यांनं माझ्याकडे पाहिलं आणि दोन्ही हातांनी नको असे हातवारे केले. मला आश्चर्य वाटलं, तेवढ्यात त्यानं स्वतःच्या मळलेल्या शर्टमधून तशीच मळलेली दहा रुपयाची नोट काढून मला दाखवली आणि ‘आज हायती’ असं काही तरी पुटपुटत तो निघून गेला. मी अवाक झालो होतो. लोक याला वेडं म्हणतात; पण खरंच तसं होतं का?
मी म्हटलं वेडा आहे, वेडाच्या भरात नको म्हटला असेल; पण तसं नव्हतं, पुढे अनेकदा असं घडलं. जेव्हा-जेव्हा त्याच्याजवळ पैसे होते तेव्हा-तेव्हा चुकूनही त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. तो सच्चा होता प्रामाणिक होता. पोट भरलेलं असताना आणखी रेचायचं नसतं हे साधं तत्त्व या वेड्या माणसांनं मला किती सहज शिकवलं होतं. शहाण्या म्हणवणाऱ्या या जगात किती लोक या तत्त्वानं जगतात? तेव्हापासून जगू हा या जगातला एकटाच ‘माणूस’ आहे असं मला वाटतं होतं. शहाणा माणूस. तो होता तोपर्यंत हे असचं चालू होतं. जेव्हा एका भल्या सकाळी उन्हाला पेपर वाचत बसलो असताना कोणी तरी दबक्या आवाजात ‘येडा जग्या मेला’ असं सांगितलं होतं. तेव्हा मी आतून हललो होतो. कोणी तरी आपलं नात्याचं, रक्ताचं गेल्यासारख्या भावना मनात येत होत्या.
मी लगबगीनं त्याच्या घराकडे धावलो होतो. बहुतेक तो थोडा आजारी होता. रात्रीचं कधी तरी त्याचा झोपेत जीव गेला होता. सकाळी हे लक्षात आलं. पुढं अगदी निर्जीवपणे सगळी तयारी करण्यात आली. कुणाच्याही चेहऱ्यावर विशेष दुःख नव्हतं. त्याचा जीव सुटला असेच भाव होते. लांबचे, जवळचे पै-पाहुणे यावेत एवढी त्याच्या जाण्याची दखल अर्थातच घेतली जाणार नव्हती. त्याचं सरण रचलं जात असताना मी जवळ उभा राहून त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो. नेहमीप्रमाणे निस्तेज, निर्विकार, असणारा त्याचा चेहरा चिरनिद्रेत अधिक शांत दिसत होता.
चितेला अग्नी दिल्यानंतर ‘एक काम संपलं’ इतक्या सहज भावनेने सगळे लोक निघून गेले. सगळ्यात शेवटी मी निघालो, खूपदा मागे वळून पाहिलं जगाच्या दृष्टीने वेडा असलेला एक माणूस शहाणपणाच्या खूप गोष्टी शिकवून खूप दूर निघून गेला होता...
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.