आज अनेक संघटना विधायक कार्यात अग्रेसर असतात; परंतु ज्ञानयज्ञ प्रज्वलित करून लोकांमध्ये वाचन चळवळ रुजवण्यासाठी एखादी संघटना प्रयत्न करत असेल, तर ते त्याचे वेगळेपण ठरते. असाच ज्ञानयज्ञ राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी कागल येथील दोन संघटनांनी कागलपासून जवळच असलेल्या करनूर या गावी सुरू केला आहे. कागलमधील वनमित्र आणि शिवराज्य मंच या दोन संघटनांनी करनूरमधील वाचनालयास 450 पुस्तके भेट दिली. आज वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची ओरड होत असताना ग्रामीण भागात वाचनाची अभिरुची वृद्धिंगत करण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
करनूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या निधीतून राजर्षी शाहू वाचनालय सुरू करण्यात आले आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी या वाचनालयास पुस्तके भेट देण्याचा विचार वनमित्र आणि शिवराज्य मंचच्या काही सदस्यांच्या डोक्यात आला. त्यांनी तातडीने याबाबतचे आवाहन संघटनेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवरून केले. प्रत्येकाने किमान दोन पुस्तके अथवा पुस्तकांची रक्कम देण्याचे आवाहन केले. याचे सर्वच सदस्यांनी कौतुक केले. प्रत्येकाने पुस्तके जमा करण्यास सुरवात केली. पाहता पाहता सुमारे 450 पुस्तके जमा झाली. ही पुस्तके शाहू जयंतीदिनी वाचनालयाकडे सुपूर्द केली.
या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षा, चरित्र ग्रंथ, आध्यात्मिक, कथा-कादंबऱ्या, पर्यावरणविषयक पुस्तके यांचा समावेश आहे. संघटनेच्या या उपक्रमास करनूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचेही सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे यासाठीही विचार सुरू आहे. सध्याच्या वाचनालयात स्पर्धा परीक्षार्थींसाठी स्टडी रूम बांधण्यात आली आहे. संघटनेमार्फत दोन वर्षांपासून शाहू जयंती साजरी केली जाते. दोन वर्षे संघटनेच्या सदस्यांनी राजर्षी शाहू यात्रेच्या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील माहिती घेतली.
या वर्षी वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानयज्ञाची उभारणी करण्याचा निर्णय घेऊन त्या पद्धतीने पुस्तके जमा केली. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते ही पुस्तके वाचनालयास सुपूर्द केली. संघटनेमार्फत शिवजयंती साजरी केली जाते. या वेळी संघटनेचे कार्यकर्ते एका किल्ल्याची निवड करतात. आदल्या दिवशी तेथे जाऊन गडाची स्वच्छता केली जाते. रात्री प्रबोधनात्मक कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी शिवजयंती साजरी करून कार्यकर्ते परतीच्या प्रवासाला लागतात. राजमाता जिजाऊ यांचीही जयंती साजरी केली जाते. शिवराज्याभिषेकदिनी संघटनेचे कार्यकर्ते रायगडावर जातात. वृक्षारोपणातही संघटना आघाडीवर असते. विधायक कार्यात नेहमीच अग्रेसर असते.
या वर्षीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीला वेगळा उपक्रम राबवण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. या वेळी करनूर येथील वाचनालयास पुस्तके भेट देण्याचा मुद्दा चर्चेत आला. सर्वांनाच हा उपक्रम आवडला. त्यानंतर ग्रुपवरून आवाहन करताच अनेकांनी पुस्तके भेट दिली. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.
- प्रवीण जाधव, वनमित्र संस्था
- इंद्रजित घाटगे, शिवराज्य मंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.