Blog | ब्लॉग

Video : आजी-आजोबांचे हक्काचे घर : मातोश्री वृद्धाश्रम

सूरज सकूंडे

मातोश्री वृद्धाश्रम, महागाव म्हणजे नैराश्‍याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या निराधार आजी-आजोबांच्या हक्काचे घर. चांगल्या वाईट कारणांमुळे पोटच्या लेकरांना तसेच घरदार, नातेवाईक यांना परागंदा झालेल्या निराधार वृद्धांचा आधारवड. 

इथं आलेल्या प्रत्येक वृद्ध आजी-आजोबांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहण्याची, जेवणाची तसेच औषधोपचाराची सर्व व्यवस्था वृद्धाश्रमातर्फे केली जाते. वृद्धाश्रमातील एखाद्या सदस्याचे निधन झाले तर बऱ्याचदा त्या सदस्याला सन्मानाने निरोप देण्याचे कामही मातोश्री वृद्धाश्रमाला करावं लागते. 

येथील निराधार आजी-आजोबांसाठी मातोश्री स्वर्गच ठरत आहे. सध्या येथे 25 वृद्ध आजी-आजोबांचं कुटुंब आनंदाने नांदत आहे. इथं वास्तव्यास असणाऱ्या आजी-आजोबांपैकी काहींचे जगात कुणीच नाही, तर काहींचे घरदार-नातेवाईक सगळं असूनही त्यांना इथ राहावं लागतंय. पण, काहीजण सगळं व्यवस्थित असूनही स्वखुशीने इथं राहतात. "स्वतःच्या घरी जेवढी माया, प्रेम मिळत नाही, त्यापेक्षा जास्त मातोश्रीमध्ये मिळते', असे इथं राहणाऱ्या नव्वद वर्षीय "कुलकर्णी आजी' आवर्जून सांगतात. 

दानशूर लोकच करतात मदत  

हा वृद्धाश्रम विनाअनुदानित तत्त्वावर चालतो. साहजिकच बाहेरून मिळणाऱ्या मदतीवर मातोश्री अवलंबून आहे. 
मातोश्रीची पितृसंस्था "वृद्ध सेवाश्रम' प्रयत्न करतेच आहे. परंतु, त्याला अर्थातच जोड मिळते, ती सातारा आणि कोरेगाव भागातील अनेक दानशूर लोकांची.. त्यांच्या मदतीतूनच "मातोश्री' च्या दैनंदिन अत्यावश्‍यक गरजा भागविल्या जात आहेत. 


विविध सण, कार्यक्रमांचं आयोजन  

मावळतीकडे झुकणाऱ्या ताऱ्यांच्या आनंदी ठेवण्यासाठी इथं कोणतीही कसर सोडली जात नाही. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे सगळे सण इथं उत्साहात साजरे केले जातात. येथील सर्व सदस्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. सहली, हास्य, करमणुकीचे कार्यक्रम, भजनं, कीर्तने आयोजित केले जातात. पाहण्यासाठी टीव्ही आहे. वाचण्यासाठी वर्तमानपत्र, पुस्तकं उपलब्ध आहेत. 
बऱ्याचदा बाहेरील लोक येथे येतात. वाढदिवस साजरे करतात. आजी-आजोबांसमवेत वेळ घालवतात. त्यांना भेटवस्तूही देतात. या सर्व गोष्टींची परिणती म्हणून संस्थेचा केंद सरकारकडून गौरव करण्यात आला. 

लोकसहभागातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
 
मातोश्री वृद्धाश्रम बऱ्याच गोष्टींत स्वयंपूर्णही झालाय. अभिजात कंपनीचे मालक सुभाष जोशी यांनी त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्रुपतर्फे वृद्धाश्रमाला "सुरभि गोशाळा' बांधून दिली. त्याचप्रमाणे परिसरामध्ये आजी-आजोबांना देवाचं नामस्मरण करता यावं म्हणून छोटंसं हनुमान मंदिर देखील उभारलं. श्रीकांत देवधर या दानशूर व्यक्तीने आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त साठ हजार रुपये किंमतीची एक होस्टीयन गाय भेट दिली. तिच्या आता चार गाई झाल्यात आणि वृद्धाश्रम दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय. याशिवाय आयडीबीआय बॅंकेने इथं बायोगॅस प्लॅंट बसवून दिलाय. गाईच्या शेणापासून इथं बायोगॅस निर्मिती होऊन गॅससाठी लागणाऱ्या खर्चाची बचत होत आहे. बॅंक ऑफ बडोदाने मातोश्रीला खुर्च्या आणि कपाटं भेट दिली. याशिवाय वृद्धाश्रमाने वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर छोटीशी परसबागही फुलवली आहे. जिथं वांगी, मिरच्या, डेसा, गवती चहा, आळू इ. पिकवलं जातंय. शिवाय काही फळझाडांचीही लागवड करण्यात आली आहे. सारंगा दीपक पवार या गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक महिन्याला कमीतकमी चार वेळा जेवणाची सोय करतात. 
मातोश्री वृद्धाश्रमासाठी अतिशय महत्त्वाची समस्या म्हणजे उतरत्या वयातील आजी-आजोबांचं ढासळतं आरोग्य. मात्र, साताऱ्यातील धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून येथील आजी-आजोबांना मोफत औषधोपचार करत आहेत. यांशिवाय अनेक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात आश्रमाला भरभरून मदत करतात. 


व्यवस्थापक सूर्यकांत सागरे यांचा सेवाभाव
मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सूर्यकांत सागरे सहकुटुंब इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आई-वडिलांच्या स्थानी मानून त्यांची पुत्रवत सेवा करतात. पण, तरीही प्रत्येकानं आपल्या घरातील वृद्ध माणसांची सेवा करायला हवी, असं ते आवर्जून सांगतात. 


गरज आहे आपल्या मदतीची 

या संस्थेला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नाही. वृद्ध सेवाश्रम, सांगली, तसेच सातारा जिल्ह्यातील दानशूर लोक आणि संस्थांची मदत यातून मातोश्री वृद्धाश्रम चालवला जातो. परंतु, त्यातून इथल्या गरजा भागवताना बर्याचदा त्यांच्या नाकीनऊ येतं. मावळतीकडे झुकणाऱ्या या ताऱ्यांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपणही मदत देऊ शकता. 
संपर्कासाठीचा पत्ता : मातोश्री वृद्धाश्रम, महागाव 
(सातारा- कोरेगाव रोड,) ता. जि. सातारा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT