ज्येष्ठ साहित्यिक मूल्ये जपण्याबरोबरच तळागाळातल्या शेवटल्या माणसांशी असलेले शेकऱ्यांशी असलेले घट्ट नाते टिकविणे ही प्रत्येक भाषेतील साहित्यकृतिचे आद्य कर्तव्य असते आणि हे कर्तव्य पार पाडण्यात डॉ. विठ्ठल वाघ सर सर्वात पुढे असणारे वऱ्हाडी कवी ठरतात. त्यातही ते विविधता जोपासतात. त्यांच्या साहित्याचा विविधांगी प्रवास हा वेगळा असा चिंतनाचा स्वतंत्र विषय ठरु शकतो. पण या ठिकाणी मला प्रकर्षाने मांडायच्या आहेत त्या त्यांनी साहित्याशिवाय जोपासलेल्या विविध कला. त्यांच्या विविध कलांचा विचार करतांना आपल्याला दिसतो तो भिंतीवर बनविलेला बांगड्यांचा सुंदर मोर. हा मोर तर महाराष्ट्रातील सरांच्या प्रत्येक मित्राच्या घरातील भिंतीवर डॉ. वाघ सरांनी तयार केलेला आहे. विटेतून बनविलेलं माय लेकराचं शिल्प मनाला भावतं, तर दुसरीकडे सकाळी वॉक ला जातांना खिळे व तार गोळा करुन त्यातून साकारलेले सुंदर पक्षी, प्राणी मनात घर करुन जातात. रस्त्यावर पडलेल्या तारांतून आणि खिळ्यातून अशी निर्मिती होऊ शकते याची तुम्ही आम्ही सर्व सामान्य कल्पनाही करु शकत नाही. जी कागदं आपण रद्दी म्हणून टाकून देतो त्या विविध रंगांच्या कागदांच्या रंगसंगतीतून साकारलेले कोलाज मनाला वेगळाच आनंद देऊन जातात. आपण रंगीत कागदांचे तुकडे फेकून देतो पण सर त्यातून नवनिर्मिती करतात आणि ते मनाला भावतं. तुम्हाला, आम्हाला जर बस मधून पुण्यापर्यंत प्रवास करायला सांगितला तर आपण चक्क झोपून जाऊ पण सर मांडीवर कागद ठेवतात व हातातील पेन त्यावर ठेवतात. रस्त्याने बस चालतांना मिळणार्या धक्यांमधून पेन हलत राहतो व त्या हलण्यातून कागदावर चित्रविचित्र काहीतरी तयार होतं पण सर चित्रविचित्र दिसणार्या रेषांना व्यवस्थित निवडक रेषांनी आकार देऊन एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र निर्मिती करतात. नंतर पाहणाऱ्याला जर आपण सांगितलं की हे चित्र असं तयार झालं तर त्याचा विश्वास बसणार नाही. पण हे फक्त सरच करु शकतात. अशा प्रकारच्या प्रवासात त्यांनी बनविलेली चित्रे ही लोकसंस्कृती जपणारीही आहेत हे पाहून तर आपल्याला अजूनच आश्चर्य वाटते. ही सतत नवनिर्मिती करण्याचा त्यांचा ध्यास त्यांना सदैव आनंदी ठेवत असतो. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावरही दिसणारी उर्जा या नवनिर्मितीतून, या सदैव झपाटल्यागत स्वतःला गुंतवून ठेवण्यातून आल्याचे आपण अनुभवतो. एखाद्याचे नाव लिहितांना त्यातून गणपतीचे चित्र साकारणे, ही तर कितीतरी परिचित लोकांनी अनुभवलेली नवनिर्मिती आहे. आपले नाव, आडनाव, आईचे नाव,बाबांचे नाव या सर्वांमधून आपल्या समोर डॉ. वाघ सरांच्या पेनातून साकार होणारा गणपती अनुभवण्याचे भाग्य हजारो लोकांना लाभलेले आहे.
साहित्य निर्मिती करतानाच ह्या आगळ्या वेगळ्या कलेची जोपासणा करणारा लोककलावंत म्हणून वाघसरांकडे आपण बघतो. वर्हाडी म्हणी गोळा करतांना शेंडगांव ते आसोदा पायदळ काव्ययात्रा काढतांना म्हणी तर गोळा झाल्याच पण त्यासोबतच विविध आकारांचे लाकडी ओंडकेही जमा झालेत. त्यातून कधी मोर, तर कधी हरिण तर कधी बैल तर कधी एखादा पक्षी सरांनी साकारला. रस्त्यावर पडलेल्या लाकडातून असा प्राणी किंवा पक्षी तयार होऊ शकतो हे हेरणारी भेदक नरजच ही नवनिर्मिती करु शकते. झाडांच्या मूळांपासून बनविलेली काष्ठ शिल्पे आपण पाहिली की क्षणभर आपण अवाक् होतो.
पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे वेळी आम्ही सरांना विनंती करुन ह्या सर्व त्यांच्या कलाकृती संमेलनस्थळी आणल्या होत्या आणि वाघांची गुहा बनवून त्यात ह्या सर्व आगळ्या वेगळ्या कलाकृती सर्वांनी पहाव्यात म्हणून ठेवल्या होत्या. पाहणारा प्रत्येक जण मअरे ! हे तर आम्हाला माहितीच नव्हतं असं म्हणून ह्या नवनिर्मितीचा आनंद घेत होता. डॉ. विठ्ठल वाघ सर लोककवी म्हणून जेवढे मोठे आहेत, तेवढेच ह्या विविध कला जोपासणारे, कचर्यातून नवनिर्मिती करणारे व ह्या नवनिर्मितीतही लोकसंस्कृती जपणारे लोककलावंत म्हणून मला अधिक भावतात. त्यांनी रचलेली आणि गायलेली मंगलाष्टके सुरु असतांना लग्न मंडपातील संपूर्ण वधू पक्षाकडील वऱ्हाडी रडतात हा त्यांच्या शब्दांचा आणि पहाडी आवाजाचा प्रभाव असतो. पण त्यांनी चितारलेली लग्नपत्रिका पाहिली की देखील लगीन घर डोळ्यासमोर उभं राहतं, हा त्यांच्यातील कलावंतांच्या कलेचा प्रभाव असतो आणि ही कला त्यांनी सातत्यपूर्णतेने जोपासली आहे आणि तिचं त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि आनंदीवृत्तीचे खरे गुपीत आहे असे मला वाटते. आज त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे निमित्ताने त्यांच्यातील या नवनिर्मितीच्या ध्यासाला साष्टांग नमस्कार करतो आणि त्यांना दीर्घायू - आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. शेवटी अकोल्यातील प्रथितयश कवी किशोर बळी यांनी सरांसाठी लिहिलेल्या सन्मान कवितेतील चार ओळी ह्या ठिकाणी चपखलपणे बसतात.
तुम्ही लिहिली चित्रातून कविता ॥
तुम्ही रेखाटलं कवितेतून चित्र,
रंगरेषेतून
बोली भाषेतून
फुटकं, तुटकं सांधत,
विस्कटलेलं बांधत
पोथी-पुराण खोडत
बिल्लोरांना जोडत
प्रतिष्ठीत केलंत
वऱ्हाडी लोकधर्माचं सूत्र ॥
(लेखक हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.