ट्रेकर्सची पंढरी श्री हरिश्‍चंद्रगड 
Blog | ब्लॉग

ट्रेकर्सची पंढरी श्री हरिश्‍चंद्रगड...

प्रवीण कुलकर्णी

     तब्बल दोन ते अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेला श्री हरिश्‍चंद्रगड दुर्गम प्रकारात मोडतो. समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवरील हा गड ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मुंबई-जुन्नर रस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटमाथ्यावर खुबी फाटा आहे. पुण्याहून येणाऱ्यांनी आळे फाटामार्गे किंवा कल्याण-मुरबाडवरून येताना खुबी फाट्यावर उतरावे. येथून साधारण पाच किमी अंतरावर खिरेश्‍वर गाव आहे. खिरेश्‍वरलाही यादवकालीन शिवमंदिर आहे. खिरेश्‍वरमधून निघून टोलार खिंडीतून साधारण साडेतीन ते चार तासांत हरिश्‍चंद्रगडाच्या माथ्यावर पोचता येते. पुणे-नाशिक मार्गावरील संगमनेरहून घोटी गाव गाठावे. घोटीहून अकोले, राजूरपर्यंत पोचावे. राजूरहून गडाकडे जाणाऱ्या बस कमी आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनईला जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध आहेत. तिसरी नळीची वाट. मुरबाड (जि. ठाणे) येथील बेलपाडा येथे पोचावे. बेलपाडा हे कोकणकड्याच्या पायथ्याचे गाव. तेथून प्रस्तरारोहण (रॉक क्‍लायंबिंग) करतच गडावर प्रवेश करता येतो.

रॉक क्‍लायंबिंगमधील तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलेच येथून गडावर जाऊ शकतात. पाचनईची वाट सगळ्यात सोपी, तर टोलार खिंड म्हणजे भटक्‍यांसाठी पर्वणीच. गर्द हिरव्या झाडीने आच्छादलेली टोलार खिंड जैवविविधतेने समृद्ध आहे. विविध रानफुलांच्या गंधाचा येणारा दरवळ मोहून टाकतो. कारवी, गारवेल, उक्षी, कुडा या वनस्पतींसह दुर्मिळ वनसंपदा येथे आढळते. या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याचे सांगतात. रानडुकरे, कोल्हे, तरस, बिबटे येथे सर्रास दर्शन देतात. येथे राहणारे आदिवासी कोळी, महादेव कोळी समाजाकडून खिंडीत वाघाचे शिल्प उभारले आहे. या मार्गाने साडेतीन-चार तासांत गडावर पोचता येते. गडावर ११-१२ व्या शतकात झांज राजाच्या कारकिर्दीत उभारलेले महादेवाचे मंदिर लक्ष वेधून घेते. कोरीव शिल्पकामाचा अजोड नमुना असलेले मंदिर अत्यंत सुबक आणि देखणे आहे. या मंदिरासमोरच पुष्कर्णी आहे.

मंदिराच्या उत्तरेसच पिंडी आहे. कंबरेएवढ्या पाण्यातून पिंडीस प्रदक्षिणा घालता येते. गड चढाईमुळे आलेला शिणवटा पळून जातो. गडाला कुठेच तटबंदी नाही. गडावरच तारामतीचे शिखर आहे. याठिकाणी काही राहण्यायोग्य गुहा आहेत. येथीलच एका गुहेत चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्षे तपश्‍चर्या केल्याचे गावकरी सांगतात. एका गुहेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तारामतीचे शिखर पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. गडाच्या पश्‍चिमेस कोकणकडा आहे. सुमारे तीन हजार फुटांपेक्षा जास्त अंतरावरून खाली कोकणात कोसळणारा हा कडा अंतर्वक्र आहे. समोरून नागाच्या फणीसारखा त्याचा आकार दिसतो. कड्यावर आडवे होऊनच त्याचे रौद्ररूप अनुभवता येते. हरिश्‍चंद्रगडावरून हडसर, अलंग, मदन, कुलंग, नाणेघाट, रतनगड, जीवधन, चावंड या किल्ल्यांचे दर्शन होते. पावसाळ्यात नखशिखान्त भिजल्यानंतर हिरवी शाल पांघरून बसलेला हरिश्‍चंद्रगड पाहण्याचे सुख ‘याची देही...’ अनुभवावे असेच आहे. श्री हरिश्‍चंद्रगड पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT