Blog | ब्लॉग

Bodoland : विद्वेष कमी करण्यासाठी शाळेत शिकवणार हॅपिनेस मिशन, बोडोलँडपासून शिकण्यासारखे बरेच काही

परिसरात येणाऱ्या बक्सा, चिराग, कोक्राझार व उदलगिरी या चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

विजय नाईक,दिल्ली

एप्रिल 2023 पासून आसामच्या बोडोलँड प्रादेशिक मंडळाने ``मोहीम आनंद ( हॅपिनेस मिशन)’’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, तिचा विस्तार प्रादेशिक मंडळाच्या अंतर्गत 9 हजार चौसर कि.मी परिसरात येणाऱ्या बक्सा, चिराग, कोक्राझार व उदलगिरी या चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

या संदर्भात बोलताना मंडळाचे प्रमुख प्रमोद बोरो यांनी 23 मार्च रोजी सांगितले की आनंद (ज्याचा सौख्य, प्रसन्न, समाधानी असा अर्थ होतो) हा विषय आता शाळेतून शिकविला जाणार आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली की आपल्याला समाधान वाटते, चांगले वाटते, मनाला सुखाची लहर स्पर्ष करून जाते. हा अनुभव अनोखा असतो.

उलट, मनाला क्लेष देणाऱ्या घटना दैनंदिन जीवनात सातत्यानं घडत असतात, त्यापैकी कशात आनंद मानायचा व कशात क्लेष, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. पण गरीबी ही निश्चितच क्लेषदायक बाब होय व आपल्या देशातील कोट्यावधी लोक त्या वर्गात मोडतात. दुःख त्यांच्या सातत्याने वाट्याला येते. वाळवंटात पाण्याचा एखादा ओहोळ दिसावा, त्याप्रमाणे गरीबाच्या जीवनातही आनंदाचे काही क्षण येतात. असेही म्हटले जाते, की सुख वा दुःख हे मानण्यावर अवलंबून असते.

बोरो यांनी म्हटल्यानुसार, ``आनंद हा विषय आता वरील चार जिल्ह्यातील शाळातून शिकविला जाणार आहे.’’ त्यासाठी मंडळ कोणताही अभ्यासक्रम आखते हे पाहणे उद्बोधक ठरेल. याचा सकारात्मक परिणाम होईल, असे मानायला हरकत नाही. कारण, आनंद वा सुख कशात आहे, हे विद्यार्थ्यांना समजल्यास त्याचा परिणाम त्यांचे कुटुंब सुखी होण्यात व पर्यायाने समाज समाधानी होण्यात होईल, असे मानायला हरकत नाही.

या मोहिमेपासून अन्य राज्यांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. कारण, आजचे राजकारण सामाजिक व धार्मिक विद्वेषाने इतके भरले आहे, की त्यात सातत्याने तणाव दिसतो. सहनशीला, सहिष्णुता संपुष्टात आल्याचे दिसते.

बोरो यांनी असेही म्हटले आहे, की बोडोलँड विद्यापिठात आनंद विभाग स्थापन करण्यात येईल व तेथे शांतता व समाधान हे विषय शिकविले जातील.

संसदेत ``आसामपासून बोडोलँडला अलग करून वेगळे राज्य स्थापन करावे,’’ अशी मागणी गेली अनेक वर्ष संसदेत व संसदेबाहेर होत होती. बोडोलँडचे सदस्य बसुमतारी हे आघाडीचे नेते होते. मोहीमेने अनेकदा हिंसक स्वरूपही धारण केले होते.

दहशतवादही मूळ धरू लागला होता. अखेर जानेवारी 2020 मध्ये बोडोलँड प्रादेशिक मंडळ स्थापन करण्याबाबत समझोता झाला. त्यामुळे, मागणी बऱ्याच अर्थाने पूर्ण झाली. अशाच प्रकारची मोहीम पश्चिम बंगालमध्ये गोरखालँडचे नेते सुभाष घिशिंग यांनी अनेक वर्ष चालविली. अखेर, गोरखालँड विकास मंडळ स्थापन करून मोहीम संपुष्टात आणण्यात आली. महाराष्ट्रातही कोकण, विदर्भ व मराठवाडा या मागसलेल्या प्रदेशांसाठी विशेष विकासमंडळे स्थापन करावी, अशी मागणी गेली अऩेक वर्ष होत आहे. त्यासाठी काही पावले टाकण्यात आली.

तथापि, आजही हे प्रदेश पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने मागे आहेत. त्यामुळे तेथे समाधानाचे वातावरण नसते, असे वारंवार दिसून येते. सारांश, तेथील आनंदाचा `इंडेक्स’ अजूनही सुधारलेला नाही.

अलीकडे, दिल्ली सरकारने शाळातून आनंदविषयक अभ्यासक्रम सुरू केला. तो निरनिराळ्या 36 प्रकरणातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे.

मध्यप्रदेश शासनाने 2016 मध्ये `आनंद मंत्रालय (राज्य आनंद संस्थान)’ स्थापन केले. त्या संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात. खरगपूर येथील आयआयटीमध्ये `रेखी सेन्टर फॉर एक्सलंन्स फॉर द सायन्स ऑफ हॅपिनेस’ स्थापन करण्यात आले. या केंद्रातर्फे मध्यप्रदेशातील निरनिराळी शहरे व खेड्यातील रहाणीमान, असमानता, मिळकत, आरोग्य, सुरक्षा, विकासाचे प्रमाण, परस्परांतील संबंध, सकारात्मक व नकारात्मक भावना, पर्यावरण यांची पाहाणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 मार्च 2019 च्या हॅपिनेस अहवालानुसार, ``भारताचा हॅपिनेस निर्देशांक 2018 मधील 133 वरून 140 वर घसरल्याचे दिसून आले आहे.’’ राष्ट्र म्हणून आनंद हे परिमाण मानणारा देश म्हणजे भूतान.

त्याचेच अनुकरण आपण काही प्रमाणात करीत आहोत. परंतु, भूतानचे भौगोलिक स्थान, आजवर कोशात वावरताना तेथील लोकांनी राजेशाहीला मायबाप मानीत आखलेले जीवन, पर्यावरणाची घेतलेली काळजी, डोंगर दर्यातून निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारी लोकसंख्या व प्रगत देशांच्या मानाने अत्यंत सीमित असलेल्या लोकांच्या गरजा, या पाहता तेथील बव्हंश लोक सुखी समाधानी असल्याचे दिसून आले.

2 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ``जगातील सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून सहाव्यांदा फिनलँडला घोषित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्याचा निर्देशांक 7.821 होता तो घसरून 7.804 खाली आला. तरही तोच सर्वाधिक आनंदी देश असल्याचे घोषित करण्यात आले.’’ फिनलँडच्या खालोखाल पहिल्या दहा आनंदी देशात डेन्मार्क, आइसलँड, इझ्त्राएल, द नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झरलँड, लक्झेमबर्ग व न्यूझिलँड या देशांचा क्रमांक लागतो.

तथापि, या क्रमवारीत प्रगत देशांपैकी अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया, ब्रिटन यांचा अथवा श्रीमंत देशांपैकी आखाती देश आदींचा कुठेही क्रमांक लागलेला नाही. म्हणूनच आपल्याला फारसे वैषम्य वाटण्याची गरज नाही. पण, बोडोलँड, मध्यप्रदेश, भूतान यापासून काही शिकण्यासारखे असेल, तर ते शिकले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, तसे ``सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’’ हे साध्य झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT