प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर आईने बाळाला जवळ घेऊन स्तनपानास सुरुवात करणे गरजेचे आहे. बाळाच्या जन्मानंतर मातेला पिवळसर चिकासारखा द्रव स्त्रवतो, त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. यामध्ये स्निग्धता कमी असते व प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे नवजात शिशुला चिकदूध पाजणे आवश्यक आहे. तसेच वारंवार बाळाला जवळ घेऊन कुरवाळणे व स्तनपान करणे यामुळे स्त्रीमध्ये दूधनिर्मिती होण्यास मदत होते.
जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे आणि पुढे सहा महिन्यानंतर दोन वर्षांपर्यंत इतर पूरक आहारासोबत स्तनपान चालू ठेवण्यास हरकत नाही.
स्तनपानाचे फायदे
आईचे दूध सर्व पोषक तत्त्वांनीयुक्त असते. यातून बाळाला संपूर्ण पोषण मिळते आणि बाळ सुदृढ होण्यास तसेच त्याच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
पहिले 2-3 दिवस स्त्रवणारे चिकदूध बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते व संसर्गापासून बचाव करते.
आईचे दूध निर्जंतुक असल्याने ससंर्ग होण्याचा धोका कमी असतो.
आईचे दूध बाळासाठी योग्य तापमानाचे असते. तसेच हवे तेव्हा उपलब्ध असते. गरम किंवा थंड करावे लागत नाही.
स्तनपानामुळे बाळाच्या श्वसनसंस्था व पचनसंस्था सुरळीत चालतात.
माता व बालक यांच्यामध्ये भावनिक बंध तयार होतात व दोघांना मानसिक समाधान मिळते.
स्तनपानामुळे मातेच्या गर्भाशयाचा वाढलेला आकार पूर्वपदावर येण्यास मदत होते. त्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
दुग्धनिर्मिती होण्यासाठी स्त्रवणाऱ्या हार्मोन्समुळे स्त्रीला हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.
स्तनपानामुळे मातेला स्तनाचा कर्करोग, प्री-मोनोपॉज ओव्हरी कॅन्सर, मधुमेह इ. आजारांचा धोका कमी होतो.
वैश्विक महामारी-कोरोना व्हायरस या काळात नवजात शिशु व मातांची पुढील काळजी घ्यावी :
संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती सतर्कता बाळगून स्तनपान सुरू ठेवावे.
मातेला ताप, सर्दी, खोकला इ. लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
खोकताना, शिंकताना तोंड व नाक रूमालाने झाकावे.
संसर्ग झाला असेल तरीही वैद्यकीय सल्ल्याने स्तनपान चालू ठेवावे.
बाळाला स्तनपानासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने स्पर्श करण्यापूर्वी हात साबण व पाणी यांनी 40 सेकंदापर्यंत धुवावेत.
बाळ जवळ असताना स्वत:ला मास्कचा वापर करावा.
बाळाला आई व कुटुंबातील अन्य एखाद्या व्यक्तीशिवाय बाहेरील व्यक्तींनी जवळ घेणे, हाताळणे टाळावे.
शक्यतो नवजात बालक व माता यांना घरात स्वतंत्र खोलीत ठेवावे व बाहेरील व्यक्तींचा येथे वावर टाळावा.
जर काही अपरिहार्य कारणाने किंवा आजारपणामुळे आई स्वत: बाळाला स्तनपान करू शकत नसेल तेव्हा स्वच्छ निर्जंतुक भांड्यात योग्य खबदारी घेऊन दूध काढावे व निर्जंतुक चमच्याने बाळास पाजावे.
मातेने घरी बनवलेले ताजे, सकस व व्यवस्थित शिजवलेले अन्न सेवन करावे.
पुरेशी विश्रांती, हलकासा व्यायाम व पोषक, जीवनसत्त्वयुक्त आहार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.
शांत राहावे व सकारात्मक विचार करावा.
काय खावे
दूध व दुग्धजन्य पदार्थांचे दररोज सेवन करावे.
सर्व प्रकारच्या डाळी, मोड आलेली कडधान्ये यांचा दैनंदिन आहारात वापर करावा.
हिरव्या पालेभाज्या, केशरी व पिवळ्या रंगाची फळे व भाज्या यांचे मुबलक सेवन करावे.
सुप, सरबत, ताक, ताजे फळांचे रस यासारख्या तरल पदार्थांचा आहारात समावेश करावा.
ताजे, सकस अन्न वेळच्या वेळी खावे. जेवणाच्या वेळा चुकवू नयेत.
दुग्धनिर्मितीस मदत होण्यासाठी आहारात मेथी, खसखस, तीळ, बडीशेप, शतावरी, बदाम, अहळीव, कढीपत्ता, जिरे यांसारख्या पदार्थांचा वापर करावा.
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
काय टाळावे
रासायनिक प्रक्रिया केलेले पॅकेटबंद अन्नपदार्थ खाऊ नयेत.
बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ टाळावेत.
अतिरिक्त तेल, साखर आणि अतिप्रमाणात मिठाचा वापर करू नये.
शीतपेय, अल्कोहोल, अतिप्रमाणात कॉफी, चहा, सोडा यांचे सेवन टाळावे.
मिठाई, चॉकलेटस् व फास्टफूड खाणे टाळावे.
वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट तसेच वेळी-अवेळी खाणे टाळावे. खाण्याच्या वेळा ठरवून त्या वेळेलाच खावे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.