donald trump and kamla harris.jpg sakal
Blog | ब्लॉग

डोनाल्ड ट्रम्प विरूद्ध कमला हॅरिस

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतल्याने उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

विजय नाईक

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतल्याने उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. बायडन गेली अऩेक महिने हटवादीपणा करीत होते व दूर होण्यास तयार नव्हते.

अखेर डेमॉक्रॅटिक पक्षातून होणारा वाढता दबाव व चुरशीतून मागे न झाल्यास होणारा संभाव्य पराभव, याची जाणीव त्यांना झाली व कमला हॅरिस चुरशीत उतरल्या. त्यांना पक्षातून वाढता पाठिंबा मिळत आहे, असे रोज येणाऱ्या बातम्यांतून स्पष्ट होत आहे.

प्रारंभी माजी अध्यक्ष बराक ओबामा त्यांना फारसे अनुकूल नव्हते, 'त्यांचा पाठिंबा मिळणार नाही,’ असे वृत्त येत होते. परंतु, ओबामा यांनी अलीकडे हॅरिस यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याने एक मोठी अडचण दूर झाली. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आधीच त्यांचे समर्थन केले.

हॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. कृष्णवर्णीय व महिलांचा पाठिंबा त्यांना आहे. तथापि, त्यांच्यावर खालच्या दर्जाचा प्रहार होतोय, तो त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला असून, वर्णाने गव्हाळ अथवा श्वेतवर्णीयांच्या दृष्टीने `ब्लॅक’ आहेत, म्हणून.

बराक ओबामा 2009 मध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले, तेव्हा रिपब्लिकन पक्षाने त्यांच्या विरूद्ध ते `ब्लॅक व मुसलमान’ असल्याचा विखारी प्रचार केला होता. त्या सर्वावर मात करून ते दोन वेळा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्याबरोबर असलेल्या उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना तर सत्तेत 12 वर्ष मिळाली.

पहिली आठ उपाध्यक्ष म्हणून व दुसरी चार अध्यक्ष म्हणून. नोव्हेंबरच्या निवडणुकीत कमला हॅरिस निवडून आल्यास अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला अध्य़क्ष गणल्या जातील. भारतीय वंशाच्या असल्याने भारतीयांनाही ही बाब अभिमानास्पद ठरेल.

कमला हॅरिस यांना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेली बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची टिंगल टवाळी करूनही त्यांचे राजकीय वजन वाढते आहे, याकडे निर्देश करते. वॉशिंग्टनहून आलेल्या बातमीत म्हटले आहे, की अमेरिकच्या सिलिकॉन व्हॅलीतून त्यांना प्रचंड समर्थन मिळत असून, संगणक क्षेत्रातील तब्बल 700 उद्योगपतींनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय.

टेस्लाचे मालक व उद्योगपती एलॉन मस्क व पे पालचे सीईओ व गुंतवणूकदार डॅन शुलमन यांचा पाठिंबा डोनाल्ड ट्रम्प यांना असला, तरी लिंक्डइनचे संस्थापक रीड हॉफमन, एपलचे सहसंस्थापक स्टीव्ह व्होझ्नियाक, सन मायक्रोसिस्टीम्सचे सहसंस्थापक विनोद खोसला यांनी हॅरिस यांना समर्थन दिले आहे.

ट्म्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अमेरिकेत लोकशाहीचे अकुंचन झाले, श्वेतवर्णियांचा उन्माद वाढला, अमेरिकेतील बंदुक संस्कृतीला ट्रम्प यांचा पाठिंबा होता, त्यामुळे हिंसाचार वाढला, ज्यांनी अमेरिकेला मोठे केले, त्या स्थलांतरितांवरील जाचक नियम वाढले, मुस्लिम बहुल देशांविरूद्धचा आकस वाढला, 'बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्थलांतरितांना रोजगाराची संधि देऊ नये,’ असे ट्रम्प जाहीरपणे म्हणू लागले.

तसेच, त्यांनी अन्य देशात भांडवली गुंतवणूक करू नये, याबाबत त्यांच्यावर दबाव आला. युरोपशी संबंध बिघडले. या सर्व गोष्टींना या उद्योगपतींचा विरोध आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांना अमेरिकेत लोकशाही हवी आहे. आपल्या लहरींनुसार व पूर्वग्रहदूषित असलेले ट्रम्प अध्यक्ष म्हणून नको आहेत.

कमला हॅरिस उपाध्यक्ष होण्यापूर्वी त्या सिलिकॉन व्हॅलीतील सॅन फ्रान्सिस्कोच्या एटर्नी होत्या, तसेच कॅलिफोर्नियाच्या एटर्नी जनरल होत्या. नंतर त्या या राज्याच्या सिनेटर झाल्या. कॅलिफोर्नियाचा राजकीय इतिहास पाहिल्यास असे दिसते, की या राज्याने नेहमी डेमॉक्रॅट्सना पाठिंबा दिला आहे.

राज्याच्या गव्हर्नरपदी असलेले माजी गव्हर्नर व प्रसिदध अभिनेते एर्नाल्ड श्वाझनॅगर हे डेमॉक्रॅटिक पक्षाचे होते. 2019 पासून गव्हर्नरपदी असलेले विद्यमान गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम हेही डेमॉक्रॅटिक पक्षाचे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मोठ्या देणगीदार लॉरीन पॉवेल जॉब्ज व फेसबुकच्या माजी चीफ ऑफरेटिंग ऑफिसर शेरिल सॅंडबर्ग याही हॅरिस यांच्या निकटवर्तीय होत.

ट्रम्प समर्थक कमला हॅरिस यांच्यावर 'त्या डावीकडे झुकलेल्या उदारमतवादी आहेत,’ असा आरोप करतात व ``त्या तंत्रज्ञान व क्रिप्टोकरन्सी विरूद्ध आहेत,’ असा प्रचार करीत आहेत तर 'ट्रम्प हे फासिस्ट प्रवृत्तीचे असून, श्रीमंतांना अधिक कर-सूट देणारे आहेत,’ असा डेमॉक्रॅटिक पक्षाचा प्रचार आहे. कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना जाहीर चर्चेचे दिलेले आव्हान ट्रम्प यांनी स्वीकारले आहे.

ट्रम्प यांना 4 सप्टेंबर रोजी ही चर्चा 'फॉक्स न्यूज’ या वाहिनीवर हवी आहे, तर हॅरिस यांनी 'अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनच्या (एबीसी)’ वाहिनीवर 10 सप्टेंबर रोजी चर्चा व्हावी,’ असे सुचविले आहे. त्याकडे अमेरिकेतील मतदार व जगाचे लक्ष लागलेले असेल. 'ट्रम्प हे गंभीर गुन्हेगार आहेत.

त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात आलेले नाही,’ असा युक्तिवाद हॅरिस करणार आहेत. विशेष म्हणजे, बायडन यांनी आपले नाव मागे घेताच, नंतरच्या पहिल्या आठवड्यात हॅरिस यांच्या देणगीदारांनी त्यांच्यासाठी तब्बल 200 दशलक्ष

डॉलर्सच्या देणग्या उभ्या केल्या. जुलैमध्ये या दोनशे दशलक्ष डॉलर्ससह एकूण 310 दशलक्ष डॉलर्सच्या देणग्या हॅरिस यांना निवडणुकीसाठी मिळाल्या आहेत.

त्या मानाने ट्रम्प यांना जुलैमध्ये 139 दशलक्ष डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या. डेमॉक्रॅटिक प्रचार समितीच्या मते ``ट्रम्प हे गंभीर (अट्टल) गुन्हेगार आहेत.’ चर्चा झाल्यास नामवंत वकील म्हणून हॅरिस ट्रम्प यांची चिरफाड करतील, असा अंदाज व्यक्त केला जातो.

ट्रम्प यांना हॅरिस यांनी जाहीर आव्हान दिले आहे, 'जे काय म्हणायचे ते माझ्या तोंडावर म्हणा, मी त्याला उत्तर देईन.’ चर्चेला सामोरे न जाण्याचा ट्रम्प यांचा युक्तिवाद म्हणजे, 'मतदारांना ठाऊक आहे, की कोण आघाडीवर आहे, (मीच आघाडीवर आहे) त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय?’ एकंदरीत, दोन्ही बाजूनी जोरदार जाहीर प्रचार व जाहिरातयुद्द सुरू आहे.

अमेरिकेतील निवडणुकात देणगीच्या स्वरूपात निधी उभा करता यावा, यासाठी उमेदवार जनतेला 'जमेल तेवढी देणगी द्या,’ असं आवाहन करीत असतो. त्याप्रमाणे, हॅरिस व ट्रम्प हे दोघेही आवाहने करीत आहेत. बराक ओबामा यांच्या निवडणुकीपूर्वी मी अमेरिकेत गेलो असता देणगीला प्रतिसाद देण्यासाठी माझा मुलगा अक्षय यास मी वीस डॉलर्स ओबामा यांच्या निधीला पाठवायला सांगितले. त्याने ते पाठविले.

तेव्हापासून ते आजतागायत डेमॉक्रॅटिक पक्षाकडून रोज इ-मेलवर ते करीत असलेल्या कार्याची माहिती येत असते. त्यात हॅरिस यांच्या निधीसाठीच्या आवाहनाची भऱ पडली आहे. त्यातील काही नमूने - 'तुम्ही पंचवीस डॉलर्स दिले, तर शिकागो येथे होणाऱ्या डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शला उपस्थित राहाता येईल. त्यातील चार रात्र हॉटेलमध्ये राहाण्याचा खर्च, विमानाची दोन तिकिटे पाठविण्यात येतील.’

देणगीची रक्कम 1 डॉलर, 25 डॉलर्स पासून ते 500 व अधिक डॉलर्स आहे. 'हॅरिस जिंकल्या तर महिलांचे प्रजनन व एबॉर्शनचे अधिकार कायम राहातील, ट्रम्प आल्यास कराखाली मध्यमवर्ग पिचून जाईल, ते आम्ही होऊ देणार नाही. कमला हॅरिस कामगारांच्या हक्क व हितासाठी कार्य करतील.

ट्रम्प देशात बेबंदशाही आणण्यासाठी चिथावण्या देऊन जनतेत फळी निर्माण करतील, उलट हॅरिस या देशाचे अयक्य व अनुकंपा बळकट व्हावे, यासाठी कार्य करतील. देश अतिजउवीकडे झुकावा, यासाठी लक्षावधी डॉलर्सचा निधी उभा केला जात आहे. त्यापासून देशाला वाचविण्याचे कार्य हॅरिस हाती घेतील.’ अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

5 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेत पदाच्या निवडणुका होणार आहेत. याचा अर्थ, केवळ तीन महिने उरले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन नेते जे. डी. व्हान्स यांची निवड केली आहे. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी या अमेरिकन वकील आहेत. जन्माने त्या भारतीय (तेलगू ) आहेत. हे माहित असूनही ट्रम्प मात्र भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिले (कमला हॅरिस) विरूद्ध निवडणूक लढविणार आहेत.

कमला हॅरिस उपराष्ट्रध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्याची निवड करावी, याची पाहाणी करीत असून, येत्या काही दिवसातच त्या नेत्याचे नाव घोषित केले जाईल. त्या संदर्भात ज्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यात केंटकीचे अँडी बेशियर, इलिनॉयचे जे. बी. प्रिट्झकर, पेनसिल्वानियाचे जोश शापिरो, मिनेसोटाचे टिम वाल्झ हे गव्हर्नर्स व एरिझोनाचे सिनेटर मार्क केली व विदयमान वाहतूक मंत्री पेट बुट्टीग्येग यांचा सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT