सहकाराची मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली, त्या निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखान्याचं पुनरुज्जीवन म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सहकार पर्वाची नवी पहाट मानावी लागेल. गोदाकाठच्या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रानवड कारखाना हा खऱ्या अर्थाने मोठा आधारवड ठरणार आहे. रानवड कारखाना सुरू करण्यासाठी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न तालुक्याच्या भविष्यासाठी मोलाचे आहेत. दहा वर्षे दिलीप बनकर सत्तेपासून दूर होते. पण, आमदारकीच्या निवडणुकीवेळी अजित पवार यांनी दिलीप बनकर यांच्यासाठी शेतकऱ्यांना दिलेला शब्द बनकर यांनी सत्यात उतरवला आहे. त्यामुळे बनकर हे नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याचा होणारा प्रारंभ दिलीप बनकर यांची भविष्यातील राजकीय कारकीर्द अधिक भक्कम करणारा आहे.
निफाड तालुक्यात उसाचे गाळप वाढविण्यासाठी सहकारधुरिणांनी १९७२ मध्ये रानवड कारखाना सुरू केला. साडेबाराशे टन प्रतिदिन एवढी प्राप्त केलेली क्षमता ऊस उत्पादकांसाठी जणू सुवर्णयुगच ठरली. अर्थकारणाला गती मिळाली. तब्बल ३० वर्षे ‘रासाका’ने देदिप्यमान कामगिरीची नोंद केली. मात्र अनियंत्रित कारभाराचा फटका ‘रासाका’ला बसला. २००२ मध्ये कारखाना आजारी पडला. संचित तोटा कमी करण्यासाठी शासनाने ‘रासाका’ भाडेतत्त्वावर देण्याचे निश्चित केले. २००५ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर सहा वर्षे कारखाना चालविला. पण, करार संपताना शेतकरी देणी व कारखान्याचे भाडे असा एक कोटी ८६ लाख रुपयांचा परतावा ते करू शकले नाहीत. पुढे हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजी कारखान्याने अवघे तीन हंगाम केले अन् वीस कोटी रुपये थकवले. निफाडमधील सुमारे दहा लाख टन गाळपासाठी शेतकऱ्यांना लगतच्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे हात पसरावे लागायचे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर निफाडमधील स्थानिक संस्थेकडे कारखान्याची सूत्रे द्यावीत, असा सूर शेतकऱ्यांमधून सातत्याने उमटत होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी तुम्ही, दिलीपला आमदार करा... मी साखर कारखाने सुरू करतो, असा शब्द दिला. बनकर निवडून आले आणि त्यानंतर हा शब्द बनकर यांनी अथक परिश्रमातून सत्यात उतरवून दाखविला. या शब्दपूर्तीसाठी थेट कायद्यात बदल करून सहकारी संस्थांना साखर कारखाने भाडेतत्त्वावर घेण्यास परवानगी देण्यात आली. येत्या काळात केवळ साखर उद्योग कारखान्यांना तारू शकणार नाही, हे वास्तव ओळखून ‘रासाका’चे सुशोभीकरण करत ४५ हजार लिटर क्षमतेची डिस्टरली, इथेनॉल, नऊ लाख टन क्षमतेचा बायोगॅस अशी उपउत्पादने सुरू करण्याचे ठरले आहे. ऊस गाळपाची क्षमतादेखील अडीच हजार टनापर्यंत वाढणार आहे. या कारखान्यात ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्व. अशोक बनकर पतसंस्थेने करून अद्ययावत यंत्रसामग्रीसह ‘रासाका’ परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. ही कामगिरी म्हणजे पुढील १५ वर्षे निफाडच्या राजकारणावर हुकूमत करण्याचा दिलीप बनकर यांचा मानस यातून समोर येतो. ‘रासाका’च्या पीचवरून आमदार बनकर यांनी मारलेला हा उत्तुंग षटकार विरोधकांना नक्कीच घायाळ करणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.