Gofan Sakal esakal
Blog | ब्लॉग

गोफण | एका दगडात पक्षी तरी किती मारावेत

संतोष कानडे

गावात गदारोळ माजला.. लोक सैरावरा पळू लागले, कुणी ओक्साबोक्शी रडतंय.. कुणी जोरजोरात आरोळ्या देतंय तर कुणी खिन्न मनाने मान पाडून बसलंय. वातावरणात भलता तणाव निर्माण झाला होता, कोंडी फुटत नव्हती.. कारण कळत नव्हतं. खरंतर कुणालाही काहीच कळत नव्हतं.

शेवटी गावचे जयाजी पाटील कट्ट्यावर आले. हातात माईक घेऊन बोलणार- पण शब्दच फुटेना. आवंढा गिळून ते बोलण्याच्या प्रयत्नात होते मात्र आवंढ्यासोबत शब्दच गिळले जात होते. जयाजी पाटील म्हणजे नामी माणूस. मुरब्बी राजकारणी, नेमकं अन् चपखल बोलणं, हा त्यांचा हातखंडा. पण आज ते ढसाढसा रडत होते.

कार्यकर्तेही मोठमोठ्याने रडायला लागले. पुन्हा सगळ्यांचा आरडाओरड सुरु झाला.. शेवटी पाटलांनी मोठ्ठा आवंढा गिळला आणि बोलते झाले-

'मित्रांनो, आपले सुभेदार आता इथून पुढं हातात तलवार धरणार नाहीत.. लढायला जाणार नाहीत. निवृत्ती घेतायत! त्यांनीच निर्णय जाहीर केलाय. (भावनिक होत) ज्यांच्याकडं बघून आम्हाला लढायची प्रेरणा मिळाली, ज्यांच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय आजवर एकही लढाई आपण जिंकलो नाही आणि ज्यांच्या नावाने दिल्ली हादरली.. तेच आज रणभूमीतून माघार घेतायत'

एवढं बोलून जयाजी पाटील खिन्न झाले.. शून्याकडे बघत राहिले. जसेच भानावर आले पुन्हा डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. त्यांच्या पुढ्यात बसलेले लहानथोर सगळेच जमिनीवर गडाबडा लोळत टाहो फोडत होते. कुणी छाती बडवून घेतंय, कुणी तोंड फोडून घेतंय.. सगळा गाव भावनिक.

तेवढ्यात तिथं गावचे दुसरे 'दादाराव दणगटे पाटील' आले. दादाराव दणगटेंचा तोराच न्यारा. एक घाव दोन तुकडे, थेट काळजात वार... युद्धाच्या प्रसंगी त्यांच्या पहाडी आवाजानेच गनिम गारद होतो, अशी त्यांची ख्याती. मागच्या काही वेळापासून ते बाजूला उभं राहून हे सगळं बघत होते.

कट्ट्यावर येताच दादारावांनी पाटलांच्या हातातल्या माईक रागातच हिसकावला. 'काय झालंय रडायला? आमी माणसं न्हाईत काय? आमाला भावना न्हाईत काय? का तुमीच लै शाने' दादारावांचा हा रागावलेला अवतार बघून सगळे चिडीचूप. दादाराव पुढे बोलत होते.

'मी काय म्हण्तो, न्हाई लढले सुभेदार तर काय फरक पड्तो. त्यांचं वय झालंय आता.. त्यांनी लै लढाया जिंकल्या.. आता त्यांना जरा आराम करु द्या. बरं ते लढणार न्हाईत म्हंजी गप् ऱ्हाणारेत का? नवा सुभेदार देतील त्याला शिकवतील... हैत की माणसं आमच्यासारखे.'

दादारावांच्या शेवटाच्या वाक्याने जयाजी पाटील भानावरच आले. डोळे-बिळे पुसून चट्कन म्हणाले, 'आमच्यासारखे म्हंजी...?'

दादाराव ताण खैसून बोलले, आमच्यासारखे म्हंजी माझ्यासारखे.. तुमच्यासारखे, ह्यांच्यासारखे! कुणीबी. सुभेदार म्हणतील ते. त्यात काय? पण मी विचारतो, कुणाला नगंय नवा सुभेदार?

'नव्या सुभेदाराचं काईबी व्हईल, पण तुमाला हे असं व्हणार ते आधी माहिती व्हतं काय?' जयाची पाटलांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला.

या अवचित प्रश्नाने दादाराव जरा भांबावलेच. अडखळत म्हणाले- हो..ना..ना..नाही नाही! म्हंजे जराशी कल्पना होती पण असं काय थेट नाही. पण त्यात काय एवढं. सुभेदार साहेबांनी निर्णय घेतला-घेतला..तो अंतिमय.

गावचे पाटील आता चिडले होते. त्यांचा मूड काहीतरी निराळाच सांगत होता. रडून-रडून लाल झालेले डोळे मोठ्ठे करुन ते कधी दादारावांकडे तर कधी शुन्याकडं बघून बोलायला लागले. 'अंतिम-बिंतिम काय न्हाई. सगळं कळतंय आमाला. आमाला आगुदर सांगणं तुमाला मत्वाचं नसंल वाटलं... निवृत्तीला आमचा इरोध!'

एवढंच बोलून चिडलेले पाटील एक रागाचा झटका मारुन तिथून निघून गेले.

इकडे दादारावांनी रडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दमदाटी करुन त्यांना हसायला लावलं. लोकशाहीमध्ये असे निर्णय घ्यावे लागतात... वगैरै; असं एक जोरदार भाषण ठोकून त्यांनी स्वतःच्या मनातली लोकशाहीची व्याख्या तमाम पीडित, दुःखीत अन् वंचितांना पटवून दिली.

हा सगळा वृत्तांत इकडे सुभेदारांना कळला होता. आपले कोण? परके कोण? याचा अंदाज आला होता. खुंटा जाम बळकट असल्याचं त्यांना जाणवलं होतं. आपलाच निर्णय आपणच मागे घ्यायचा, असं त्यांनी ठरवलं. सुभेदारांनी एका दगडात तीन-चार पक्षी गारद केले होते. मात्र इकडे दादाराव दणगटे तन्..तन्..फन्..फन्.. करीत एकांतात निघून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT