gofan article sakal esakal
Blog | ब्लॉग

गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही

संतोष कानडे

Maharashtra Politics :

भारतवर्षाचे चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंदे आपल्या मुलुखात येणार, या भावनेने दादाराव दणगटे शहारुन गेले होते. शेवटी तो दिवस आलाच. दादारावांचा उत्साह शिगेला पोहोचलेला. आज त्यांनी भल्या पहाटेच उठायचं ठरवलेलं. एरव्हीची त्यांची पहाट म्हणजे इतरांची मध्यरात्र अन् आजची त्यांची पहाट म्हणजे तुमची-आमची झोपायची वेळ हो. नाहीतरी पहाटेचं अन् त्यांचं एक वेगळंच नातं आहे. इतिसाहाने त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी करुन ठेवलीय म्हणा.

असो, तर नमोभाई येणार म्हणून दादाराव दणगटे लगबगीनं आवराआवर करत होते. आपल्या व्यवसायात रंगांचा पर्याय नाही ते त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी स्वच्छ, जाळीदार, खादीचा पांढरा कुर्ता अन् पायजमा नेसला. मनगटावर घड्याळ बांधलं.. आता हे घड्याळ फक्त नावालाच उरलं होतं. त्याच्याकडे त्यांचं फारसं लक्ष नसे. कारण कोणाची अन् कोणती 'वेळ' आलीय, हे त्यांना न बघताही कळे. माथ्यावरच्या तुरळक केसांवर त्यांनी शानदारपणे कंगवा फिरवला. हलकसं मंद अत्तर कपड्यांवर शिंपडलं अन् निघाले.

पुण्यभूमी म्हणजे दादारावांची कर्मभूमी. दादांचा वकूब मोठा, दरारा म्हणाल तर भल्याभल्यांना त्यांच्यापुढ्यात उभं रहायची हिंमत होत नसे. पण मागच्या काही दिवसांपासून दादारावांच्या स्वभावात जरासा नाजूकपणा दिसतोय.. साखरझोपेत असतांना कुणीतरी कमळाच्या पाकळ्या गालावरुन हळूवारपणे फिरवल्यात म्हणे... तेव्हापासून त्यांचा जुना तोराच गेलाय.

बरं ते जाऊ द्या. तर नमोभाऊ पुण्यभूमीत येऊन दादारावांची खास भेट घेणार होते. नमोभाईंनी त्यासाठी एक कमाल खेळी केलेली. नमोभाई अर्थातच चक्रवर्ती सम्राट. आता काहीच महिन्यात ते सिकंदराचंही रेकॉर्ड मोडतील, असं तमाम रियासतीला वाटू लागलंय. त्यामुळे सगळे कसे सुखाच्या छायेत, गाणं गात जगत आहेत. दादारावांनीही त्यांचा प्रभाव मान्य करुन एक प्रकारची मनसबदारीच स्वीकारली होती.

तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे नमोभाईंनी एक खेळी करुन दादारावांची मजा घ्यायचं ठरवलेलं. नमोभाई एका खासगी कार्यक्रमास हजेरी लावणार होते. तिथेच त्यांनी दादारावांना बोलावून घेतलं. दादाराव बिचारा रांगडा माणूस. बोलावलं तर जायचं असतं, मोठ्यांचं ऐकायचं असतं, कधीकधी पुढे जावूनही माघारी यायचं असतं; एवढंच त्यांना ठावं... पण आजची परिस्थिती जरा निराळी होती.

जिथं नमोभाई येणार तिथं दादाराव वेळेच्या आधीच पोहोचले. पाहातो तर काय मंचावर साक्षात काका बसलेले. दादारावांना काय करावं काहीच कळेना. माघारी जाता येईना अन् पुढेही येता येईना. मग त्यांनी हळूच दबक्या पावलांनी काकांच्या पाठीमागून जात एक कोपरा गाठला. 'हे इथं कसे?' असं त्यांनी स्वतःच्याच मनाला हजारदा विचारलं असेल परंतु उत्तर मिळालं नव्हतं.

काकांचा सुभा सोडून दादाराव दिल्लीला जावून मिळाले होते. तेव्हापासून दोघांनी एकमेकांना ब्र शब्द बोलला नाही, असं लोक म्हणतात. काहींच्या आतल्या खबरा वेगळ्या आहेत म्हणा.. असो. तर काकांना टाळून दादारावांनी कोपऱ्यात बसणं पसंत केलं. काकांनी ही चोरी बघितली होती. पण करता काय? त्यांचाही असाच नाईलाज झालेला.

तेवढ्यात चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंदे दाखल झाले. मोठा लवाजमा, घोषणा, आरोळ्या अन् हारतुरे स्वीकारत त्यांनी मंचावर हजेरी लावली. नमोभाई अगोदर काकांना भेटले. काकांनीही नमोभाईंच्या पाठीवर थाप दिली अन् वारे पठ्ठ्या.. असं म्हटलं. त्यानंतर नमोभाई दादारावांकडे आले.

''क्या कहते हो दादाराव? कसा वटतोय मला भेटून..आनंद वाटतोय ना?' नमोभाईंचा मराठीचा अनावश्यक हट्ट दादारांवांना खटकला होता. तरीही त्यांनी उत्तर दिलं, ''लै आनंद वाटतोय.. पण आमचे काका इकडं कसे? त्यांनाबी तुमी पक्षात घेतलंय का?'' दादारावांनी असं विचारताच नमोभाई मोठ्याने हसले अन् एक थाप दादारावांच्या दंडावर मारली.

''आपको नहीं समझ आएगा.. ये राजनीती है भैया. तुम्हारे काकाका (म्हणजे काकांचा) हमपर आशीर्वाद हैं. उनके बोट को धरकरही हमने राजनीती सिखी हैं. तो आपभी उनसे नाराज मत रहियेगा.. उनको साथ चलने को कहो. वैसे तो वो साथ ही है.. फिर भी- ये काम आपका''

असं बोलून नमोभाई निघून गेले. इकडे दादारावांना नेमकं काय करायचं ते कळलं नव्हतं. काकांना सोबत घ्यायचं म्हणजे काय करायचं? पुन्हा पहिले पाढे पंचावन्न करायचे? खरं तर त्यांनी आता विश्रांती घ्यायला हवीय. बरं काका सोबत आहेत असं नमोभाई म्हणाले, म्हणजे काय? आता काकांना नेमकं बोलू की नको? असे शेकडो प्रश्न दादारावांच्या मनात घोळत होते. गोंधळाचा डोंगर दादारावांच्या मनात उभा करुन नमोभाईंनी उड्डाण केलं. (Latest Marathi News)

मागील सर्व 'गोफण' वाचण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT