Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | बारामतीकर काकांचं निमंत्रण अन् पाहुणे भुकेने व्याकूळ

Gofan Satire Article : बारामतीकर काकांचं आमंत्रण मिळाल्यापासून 'सागर' निवासी देवाभाऊ फडफडे आनंदित होते. त्यांच्या आवडीच्या टोपलंभर नागपुरी पुरणपोळ्या अन् पातेलभर तूप; असा बेत ठरल्याचं काकांनी आवर्जून सांगून ठेवलं होतं...

संतोष कानडे

बारामतीकर काकांचं आमंत्रण मिळाल्यापासून 'सागर' निवासी देवाभाऊ फडफडे आनंदित होते. त्यांच्या आवडीच्या टोपलंभर नागपुरी पुरणपोळ्या अन् पातेलभर तूप; असा बेत ठरल्याचं काकांनी आवर्जून सांगून ठेवलं होतं. शिवाय लाघवी वाढपी म्हणून काकांच्या पुतण्याचे पुतणे यांची नेमणूक करण्यात आलेली होती. खास शाही व्यंजनं आणि उंची तामजाम करण्यात आलेला होता. कधी जातो आणि खातो.. अशी अवस्था देवाभाऊंची झालेली.

काकांनी निमंत्रण धाडल्याप्रमाणे मुलुखाचे सर्वेसर्वा नाथाभाई दाढीवाले हेदेखील जेवणावळीसाठी उत्सुक होते. त्यांच्यासाठीसुद्धा खास ठाणेरी तर्रीबाज मिसळ ठेवण्यात आली होती. त्यामुळे काल रात्रीपासून ते उपाशीच राहिलेले होते. दोघांनी एकत्रच प्रवास करत काकांचं गाव गाठलं. गावात शिरणार तोच वेशीवर दादाराव दणगटे स्वागताला उभे राहिलेले दिसले. पुष्पहार, पुष्पगुच्छ अन् नारळ घेऊन दादाराव उभ्यानेच वाट बघत होते.

दादावारांच्या हातात फुलं असली तरी चेहऱ्यावर राग होता. पाहुण्यांच्या गळ्यात माळा घालणार तेवढ्यात देवाभाऊ बोलले, ''सोपस्कार कशाला? चला आधी जेवणं करुन घेऊ.. भुका लागल्यात'' नको ते शब्द कानावर पडल्यावर कसं होतं, तसा चेहरा करुन दादाराव तुसड्याप्रमाणे बोलले, ''जेवता येईल की, आधी आमचा मानपान तर घ्या''

मानपानाचे शब्द ऐकून जहागीरदार नाथाभाईंनी दाढीवरुन हळूवार हात फिरवला अन् बोलले, ''काल रात्रीपर्यंत आपण सोबत होतोच की.. मग स्वागताची काय गरज? अगोदर जेवलोच असतो. मिसळ थंड झाल्यावर बेत बिघडेल.''

आता दादाराव खेकसले.. ''मिसळ मिसळ तरी काय करता.. खास गावरान तुऱ्याचा कोंबडा खाऊ घालतो. आजचं जेवण आपल्याकडंच.. सगळी तयारी झाली.'' हे ऐकून दोघांनीही डोळे विस्फारले. देवाभाऊ आवाजात नरमाई आणत बोलले, ''..पण दादाराव असं कसं जमंल. आपल्या तिघांनाबी तिकडं तुमच्या काकाकडं निमंत्रणय. मग?''

दादाराव स्वभावाप्रमाणे बेधडक बोलले, ''असलं त असू द्या की. निमंत्रण-बिमंत्रण काय नस्तंय. आमच्या गावात येऊन तुमी इरोधी पार्टीच्या पंगतीत जाणार का? ते काय नाय, जेवण हिकडंच.''

नाथाभाईंना भूक आवरत नव्हती. तरीही त्यांनी तो शांतपणाचा टोन सोडला नव्हता.. ''होओ..पण त्या मिसळीचं काय? आता गरम असेल पुन्हा गार होईल. त्यांनी एवढ्या कष्टाने-''

''होना.. त्यांनी खास गोडाचं सुग्रास भोजन ठेवलंय आपल्यासाठी'' देवाभाऊ मध्येच बोलून मोकळे झाले. त्यांनाही गावातून पुरणाचा सुगंध वेडावून टाकत होता. ''चला..चला'' असं म्हणत त्यांनी दादारावांना जळपास खेचलंच. पण जागचे हलतील ते दादाराव कसले.

''मी तर जात नस्तोय आन् तुमीबी जास नस्तात.. कळलं का? आपलं गावय ह्ये. नायतर बगा मंग ह्यो नारळ संग आणलाय.. देऊ टाकीन तुमच्या हातात.'' असं म्हणत दादारावांनी दोन्ही हातातले दोन्ही नारळ दोघांच्या पुढे केले. तसे ते दोघेही करंट लागावा तसा झापकन् मागे सरकले.

नाथाभाई म्हणाले, ''दादाराव, हे बरं नव्हे. अशाने अन्नाचा नासाडा होईल. राज्याचा प्रमुख म्हणून मला अन्न सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही हा हट्ट सोडा बरे..'' असं म्हणत नाथाभाईंनी दादारावांच्या हाताला धरुन सोबत ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण दादाराव तसूभरही ढळले नाहीत.

दादारावांनी निर्वाणीचा इधारा दिला, ''जायचंय ना तुमाला.. लैच भुका लागल्यात का? मंग घ्या ह्यो नारळ. मी निघालो.'' असं म्हणत दादारावांनी तिथून रागात निघून जाण्याचा प्रयत्न केला. पण जेवणावळीसाठी आलेल्या या दोघांनी त्यांना गच्च मिठी मारुन रोखलं.

एवढं होऊनसुद्धा नाथाभाईंचा जीव मिसळीत गुंतला होता. ''काकांकडे मिसळ बनवायला मामलेदारांचा आचारी आला होता म्हणे..'' या वाक्यावर देवाभाऊ जरासे चिडलेच. ''जाऊ द्याना राव आता.. कशाला मिसळीचं नाव काढता. मी पुरणपोळीबद्दल कायतरी बोलतोय का? मग शांत राहा जरा''

हे ऐकून नाथाभाई पुन्हा दाढी कुरवाळ्यात लक्ष घालू लागले. त्यामुळे का होईना पण भुकेकडे दुर्लक्ष होईल, असं त्यांना वाटे. दोघांना घेऊन दादाराव त्यांनी नियोजित केलेल्या महा-पंगतीकडे घेऊन गेले. दोघांनाही वाजत-गाजत आतमध्ये नेलं आणि फुलांनी सजवलेल्या एका टेबलावर बसवलं. पुढ्यात ताटं आली अन् पाहातो तर काय देवाभाऊंना पुरणपोळी अन् नाथाभाईंना झणझणीत मिसळ. बघताच दोघांनी खायचा दणका लावला.

मेन्यू कार्डमध्ये जे पदार्थच नव्हते ते आले कुठून, या विचारात दादाराव पडले. काय करावं काय सुचेना.. खाणाऱ्या हातांना थांबवताही येईना. ''जमलंय बरं'' असं म्हणून नाथाभाईंनी रश्श्याचा फुरका ओढला. देवाभाऊंनीही पोळीवर गावरान तूप ओतून पोळीचा रोल करुन खायचा सपाटा लावला होता. दादारावांनी आचाऱ्याला चारपाच शिव्या हासडल्या. पण करतो काय?- अशा हतबलतेतून ते शांत राहिले.

आमंत्रित पाहुणे आले नाहीत म्हणून तिकडे बारामतीकर काकांनी कॅमेऱ्यासमोर खंत व्यक्त केली.. ''राज्याच्या प्रमुखांनी असं भरलेलं ताट नाकारणं योग्य नाही... एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी करणं राज्य चालवणाऱ्यांना शोभत नाही... पाहुण्याने पाहुणचार घ्यायचा असतो, परंतु कुणीतरी पाहुण्यांचे कान भरुन त्यांना हे पाप करायला लावलं आहे. तिकडे दिल्लीत शेतकरी आंदोलन करतात तर इकडे हे लोक शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नाचा मान राखत नाहीत...'' वगैरे. असं कायतरी बोलून काकांनी सगळा दिवस गाजवून टाकला होता.

समाप्त!

santosh.kanade@esakal.com

मागील गोफण सदर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT