IPS Mahesh Bhagavat sakal
Blog | ब्लॉग

अटकेपार झेंडा! स्पर्धा परीक्षार्थींचा आदर्श!

देशभरातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी दुणावलेला आत्मविश्‍वास जागवणारे महेश भागवत यांच्या अतुलनीय कार्याने त्यांनी लावलेल्या अटकेपार झेंड्याची नोंद घेतलीच पाहिजे.

अभय दिवाणजी

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीसारख्या (Pathardi) ग्रामीण भागातील सर्वसामान्य तरुण ते तेलंगणातील राचकोंडासारख्या मोठ्या शहराच्या पोलिस आयुक्तपदापर्यंत मारलेली मजल, पोलिस खात्यातील या 25 वर्षांच्या कालावधीत नक्षलग्रस्तांचे पुनर्वसन, वेश्‍यांचे पुनर्वसन, मानवी तस्करीला घातलेला आळा या कामाबरोबरच देशभरातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी दुणावलेला आत्मविश्‍वास जागवणारे महेश भागवत यांच्या अतुलनीय कार्याने त्यांनी लावलेल्या अटकेपार झेंड्याची नोंद घेतलीच पाहिजे. यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींपैकी 90 हून अधिक तरुणांना श्री. भागवत व टीमचे मार्गदर्शन लाभले आहे. (IPS Mahesh Bhagavat)

पाथर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना टंचाई काळात सायकलवरुन पाणी आणणे, वर्गखोली सारवण्यासाठी प्रसंगी शेण गोळा करण्याचेही काम श्री. भागवत यांनी बालपणात केले. आई-वडील व तीन बहिणी असे सर्वच शिक्षण क्षेत्रात कार्यरत. दहावीनंतर सर्वांचाच शिक्षक होण्यासाठी आग्रह. परंतु श्री. भागवत यांनी पुण्याच्या एस. पी. कॉलेज, सीओईपी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर काही काळ म्हणजे 1990-94 मध्ये पुण्यात सीडीएसए या स्वयंसेवी संस्थेत पाणलोट क्षेत्र विकासासाठी, त्यानंतर टेल्कोमध्ये समाज विकास अभियंता म्हणून काम केले. याच काळात मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा बचाव आंदोलनात आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीत योगदान दिले.

दरम्यान, त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील देवेंद्र कासार यांची आरपीएफमध्ये निवड झाली होती. हा धागा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. नेमके त्याच दरम्यान आएएस झालेल्या भूषण गगराणी यांनी प्रथमच मराठी माध्यमातून परीक्षा देऊन भारतात तिसरे येण्याचा मान पटकावला होता. या काळात काम करताना आर. ए. राजीव, नितीन करीर या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क आला होता. यातून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरवात केली. दुसऱ्या प्रयत्नात 1995 मध्ये ते मराठी साहित्य आणि इतिहास विषय घेऊन आयपीएस झाले. सध्या ते राचकोंडा (हैद्राबाद, तेलंगणा) येथे पोलिस आयुक्तपदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सुनिता या भारतीय वन सेवेत असून त्या सध्या हैद्राबाद येथे वन संरक्षकपदावर कार्यरत आहेत.

गेल्या 26 वर्षांहून अधिक काळ श्री. भागवत महाराष्ट्राबाहेर आहेत, तरीही त्यांची मराठीची नाळ तुटली नाही. पायाभूत सुविधा शासनाच्या सेवेतूनच देता येत असल्याने त्यांनी सकारात्मक विचारातून शासन सेवेत प्रवेश केला. लोकांच्या भल्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगत पदाचा लाभ सर्वसामान्यांसाठी करुन दिला. नोकरीच्या सुरवातीच्या काळात मणिपूरमध्ये पोलिसांवर, सीआरपीएफ, आर्म्ड फोर्सवर हल्ले होत होते. त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली. रेशनिंगचा गहू रेल्वेने दिमापूरला जात असे व तेथेच त्याचा लिलाव करून कंत्राटदार त्याची परस्पर विल्हेवाट लावत असत. या बाबी त्यांनी बंद केल्या.

पश्‍चिम गोदावरी (आंध्र प्रदेश) जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम पाहताना त्यांनी अनेक खुनाचे जुने गुन्हे उघडकीस आणले. महाराष्ट्राच्या सीमेवरील अदिलाबाद जिल्ह्यात तब्बल चार वर्षे अतिरिक्त पोलिस प्रमुख असताना नक्षलग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम केले. "पोलिस तुमच्यासाठी' प्रकल्पातून नक्षलवादींना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे कौन्सिलींग करणे, सरकारच्या पुनर्वसनाच्या योजनेचा त्यांना फायदा करुन दिला. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, वैद्यकीय सेवेकडे एकूणच "गुड गव्हर्नन्स'च्या माध्यमातून शासन व प्रशासनाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात ते यशस्वी झाले.

या भागात जवळपास 200 नक्षलवादी होते. त्यांची संख्या 20 वर आली. हा भाग लोकसहभागातून नक्षलमुक्त करण्यात त्यांना यश आले. 106 आदिवासींचे लग्न एका मांडवात लावून देण्याचे मोठे समाजकार्यही त्यांनी केले. यावेळेस तेथील मुलांना बाहेरचे जगच माहिती नव्हते. तेव्हा श्री. भागवत यांनी तेथील 700 मुलांना विज्ञान विहार यात्रेच्या माध्यमातून हैदराबादची सहल घडवून आणली. त्यांच्या या चांगल्या संपर्कामुळे नागरिकांनीच नक्षलवाद्यांकडून हत्यारे हिसकावून घेण्याचा प्रकार घडला.

त्यांनी केलेल्या एकूणच कार्याची दखल तत्कालिन राष्ट्रपती (कै.) ए.पी.जे. अब्दुल कलाम घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. देशभरातील नक्षलग्रस्त भागासाठी हा पॅटर्न वापरला गेला. एक नक्षलग्रस्त तरुण तर पुनर्वसनाद्वारे बीटेक, एमटेक झाला. त्याची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली. शरण आलेला एक नक्षलवादी तरुण नंतर प्राध्यापक झाला. हे त्यांच्या चळवळीचे यशच म्हणावे लागेल.

सायबराबाद येथे पोलिस उपायुक्त म्हणून काम करत असताना नाईट राऊंडवेळी एका रिसोर्टवर छापा टाकला. तेथील वेश्‍या व्यवसायातील मुंबई, पुणे, कलकत्ता अशा भारतभरातून आलेल्या 20 मुलींची सुटका केली. तब्बल 23 कुंटणखाने बंद केले. देशातील संघटीत गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मानवी तस्करीतून हजारो मुलींची सुटका त्यांनी केली. आसरा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन केले. त्यांच्या मुलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देत त्यांना मुख्य प्रवाहात आणले. यासाठी त्यांनी पद्मश्री डॉ. सुनिता कृष्णन यांचे मार्गदर्शन लाभले. या माध्यमातून त्यांनी मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली असे भारतभर छापे टाकून तेथील महिलांची सुटका केली. त्यांची शासकीय सुधारगृहात नुसती रवानगीच केली नाही तर महिला बालकल्याण विभाग, जिल्हाधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून त्यांचे पुनर्वसनही केले. गेल्या तीन वर्षात जवळपास हजार महिलांची त्यांनी सुटका केली. बांगला देश, नेपाळ, युक्रेन, उजबेकिस्तान, टांझानिया, नायझेरिया अशा परदेशातून आलेल्या महिलांचीही त्यांनी सुटका करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे काम केले. त्यांच्या कार्याची अमेरिकेने दखल घेतली.

आंध्र प्रदेशात दरवर्षी ओडिसातून विटभट्टी कामगार त्यांच्या लहान मुलांसह कामासाठी येत असतात. त्यांची मुले सहा महिन्यासाठी दहा हजार रुपयांवर वेठबिगारी करीत होती. हा प्रकार समजल्यानंतर श्री. भागवत यांनी "ऑपरेशन स्माईल'च्या माध्यमातून त्या बालकामगारांची केवळ सुटकाच केली नाही तर त्यांच्या शिक्षणाचीही सोय लावली. एका दिवसात 350 लहान मुले सापडली होती. त्यांना त्यांच्या उडीया भाषेतून शिक्षण (वर्क्‍स साईट स्कूल) दिले. शालेय पोषण आहार, पुस्तके यासाठी सरकारबरोबरच विटभट्टी मालकांचीही मदत मिळाली. जवळपास तीन हजार मुलांचे शिक्षण या माध्यमातून मार्गी लागले. बालमजुरीबाबत कार्य करणाऱ्या पद्मश्री कैलास सत्यार्थी यांनी हे काम पाहून श्री. भागवत यांची प्रशंसा केली.

आंतरराष्ट्रीय किडणी रॅकेटचाही त्यांनी पर्दाफाश केला. तुर्की देशात फॅमिली मेंबर दाखवून शस्त्रक्रिया करण्यात येत होती. त्यातून किडणीचे रॅकेट चालवले जात होते. यावर मात करण्यात त्यांना यश मिळाले. काहीवेळा पोलिस खात्याच्या चाकोरीबाहेर जावून रिस्क घेऊन त्यांनी काम केले. परंतु सरकारचे नाव खराब होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली.

खात्यातील प्रवास...

  • 1997 -99 मणिपूरमध्ये सहाय्यक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक.

  • 1999 - विवाहोत्तर आंध्रप्रदेशमध्ये बदली. आदिलाबाद, नलगोंडा, कडाप्पा, खम्मम या चार जिल्ह्यात पोलिस अधीक्षक आणि हैद्राबाद, सायबराबाद भागात पोलिस उपायुक्त

  • 2009 - पोलिस उपमहानिरीक्षकपदी बढती

  • 2014 पासून तेलंगणा राज्यात काम

  • 2014 - पोलिस महानिरीक्षक पदोन्नती

  • 2020 - अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी पदोन्नती

मान-सन्मान...

  • - राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक

  • - राष्ट्रपती पोलिस उल्लेखनिय सेवा पदक

  • - मणिपूर पोलिस स्पेशल ड्यूटी पदक

  • - आंध्रप्रदेश अंतर्गत सुरक्षा पदक

  • - 16 डिसेंबर 2016 दिल्ली येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते गृहमंत्र्याचे प्रशंसापदक

पुरस्कार -

  • - अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेचे पाच पुरस्कार

  • - 2004 साली अदिलाबाद जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात लोकसहभागातून श्रमदानाने तयार केलेल्या 12 किमी रस्ता प्रकल्पासाठी लॉस अँजेल्स येथे दोन पुरस्कार

  • - 2006 साली नलगोंडा जिल्ह्यात वेश्‍याव्यवसाय निर्मूलनाच्या आसरा प्रकल्पाला बॉस्टन येथे दोन पुरस्कार

  • - 2018 साली वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी जिल्हाधिकारी, शिक्षण खाते, वीट भट्टी मालक आणि स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांच्या मदतीने चालवत असलेल्या ओडिया मातृभाषेतील शाळा प्रकल्पाला अमेरिकेत पुरस्कार

  • - 2017 अमेरिका सरकारने ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो ऍवार्ड दिला. संपूर्ण जगभरातून केवळ आठ व्यक्तींची यासाठी निवड केली होती. त्यात श्री. भागवत यांचा समावेश

लेखन -

मानवी तस्करीच्या विषयावर आठ पुस्तकासाठी सहलेखक. ही पुस्तक गृहखाते दिल्ली आणि यूएनओडीसी यांनी प्रकाशित केली आहेत. याच विषयावर लिखित एक पुस्तक इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या एका कोसच्या अभ्यासक्रमाला आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन -

गेली 25 वर्षे श्री. भागवत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो मुलांना व्हॉट्‌स ऍपच्या सहाय्याने मार्गदर्शन करत आहेत. गेल्या सहा वर्षात हजाराहून जास्त विद्यार्थी महाराष्ट्र राज्य आणि उर्वरित भारतातून आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर सेवांसाठी व सुरक्षा विभागाच्या विविध केंद्रीय राखीव दलात निवडले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT