गुटखा, सिगारेट यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. तंबाखू सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. भारतात तंबाखू सेवनामुळे कर्करोग होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्याही सर्वांधिक आहे. कर्करोगापासून वाचण्यासाठी तंबाखू सेवन न करणे हा एकमेव पर्याय आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही पानटपऱ्या उघड्या नसल्याने लोकांना तंबाखू मिळत नाहीये. यामुळे लोकांची तंबाखू सेवनाची सवय सुटू लागली आहे. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतरही लोकांनी तंबाखूकडे पाठ फिरवणे गरजेचं आहे. तरंच आपण या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.
तंबाखू सेवनामुळे फक्त कर्करोग होतो असे नाही, तर हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, हृदयरोग व मेंदू विकार यांसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. भारतात सध्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचं प्रमुख कारण तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन हेच आहे. दरवर्षी दोन ते तीन लाख तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. तोंडाचा कर्करोग असलेल्या 70 ते 80 टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन असते. वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण कर्करोगातून बाहेर येऊ शकतो. परंतु बऱ्याचदा रूग्ण शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे येतो. अशा स्थितीत रूग्णाला वाचवणे डॉक्टरांसाठी अशक्य होऊन जाते. तोंडाच्या कर्करूग्णांची संख्या प्रचंड आहे. या आजाराला रोखायचे असल्यास तंबाखू सेवन सोडणे हा एकमेव पर्याय आहे. आणि यासाठी लॉकडाऊनचा हा कालावधी अतिशय योग्य आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मिशरीचा अतिरिक्त वापर हे यामागील मुख्य कारणं आहे. ही मिशरी नाकातून किंवा रक्तावाटे फुफ्फुसात जात असल्याने कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. अनेक महिला शौच साफ होईल म्हणून मिशरी लावतात; परंतु हा निव्वळ गैरसमज आहे.
लॉकडाऊनमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत नसल्याने अनेकांची ही सवय सोडण्यात मदत मिळतेय. मुळात, कोणतेही व्यसन सोडवताना शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात. जसे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, निद्रानाश, अंगात थंडी भरणे, क्रॅम्प येणे असे बदल शरीरात जाणवू लागतात. काही जणांना थकवा, चिडचिड, मनःस्थिती बिघडणे किंवा नैराश्य अशा समस्येला देखील तोंड द्यावे लागते. ही सर्व व्यसनापासून सुटल्याची लक्षणे आहेत. परंतु लॉकडाऊननंतरही ही बदललेली सवय कायम ठेवण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. लोकांना कर्करोगापासून वाचायचे असल्यास तंबाखू व्यसन सोडणे गरजेचं आहे.
कर्करोगाची पूर्वलक्षणे
तोंडातील पांढरा चट्टा, लाल चट्टा, लालसर पांढरा चट्टा, काळसर चट्टा (मेलानोप्लाकिया).
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम.
तोंड पूर्णपणे न उघडणे.
तोंडात व मानेमध्ये आकाराने वाढत जाणारी गाठ.
तोंडात सतत खराब, कुबट वास येणे.
आवाजात अचानक घोगरेपणा येणे.
मसालेदार पदार्थ खाताना तीव्र वेदना होणे.
कर्करोग झाला म्हणजे मृत्यू निश्चित असे अनेकांना वाटते; परंतु कर्करोग म्हणजे आयुष्य संपत नाही. याउलट कर्करोग होऊ नये, यासाठी तंबाखू व्यसन सोडवणे गरजेचं आहे. हे व्यसन कोणी सांगून बंद होणार नाही, तर लोकांनी स्वतःहून व्यसन न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तरंच आपण तंबाखू व्यसन टाळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.