Journalist Day esakal
Blog | ब्लॉग

Journalist Day : पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन करणारे गोपाळराव जोशी

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही.

सकाळ डिजिटल टीम

गोपाळराव जोशी.. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या, डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही. मात्र इतिहासात हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून, त्यांच्या विविध अवगुणांवर बोट ठेवून रंगवले गेले आहे. एक इरसाल, विक्षिप्त, हेकेखोर व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा, पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात.

श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनांवर लिहिलेली `आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली. `आनंदी गोपाळ' याच शीर्षकाचा एक सिनेमाही आला. अंजली किर्तने यांनीं लिहिलेल्या `आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व' या पुस्तकात आनंदीबाईंबरोबरच गोपाळरावांच्या चरित्राचीही ओळख होते. पंडिता रमाबाई यांनींही गोपाळरावांबद्दल लिहिलं आहे. इतिहासातले एव्हढं प्रसिद्ध आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या गोपाळरावांचे एकही चांगले छायाचित्र आज दुदैवानं उपलब्द नाही. एकच फोटो आहे तो अत्यंत दुःखद प्रसंगातला, आनंदीबाई यांच्या कलेवरासोबतचा.

मात्र गोपाळराव यांच्या एका वेगळ्याच कामगिरीकडे पुर्ण दुर्लक्ष झालं आहे. ती कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या आणि नियतकालिकेच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यांनी बजावली.

गोपाळ विनायक जोशी यांची ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांनी अगदी ठरवून घडवून आणलेले एक स्टिंग ऑपरेशन. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुण्यातील विविध क्षेत्रांतील भलीभली, थोर मंडळी अलगदपणे अडकली. गोपाळरावांचे हे स्टिंग ऑपरेशन ग्रामण्य प्रकरण किंवा पंचहौद चहा प्रकरण म्हणून इतिहासात अधिक प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकरणात गोपाळराव जोशी खलनायक म्हणून रंगवले जातात आणि नायकाची भुमिका जाते बळवंतराव उर्फ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे,

न. चि केळकर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक यांच्या चरित्रात, रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मचरित्रात अशा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत या चहाच्या पेल्यांसंबंधीच्या वादळाविषयी विस्तृतपणे लिहिलं गेलं आहे.

`स्टिंग ऑपरेशन' या सदरात येणारे सर्व घटक गोपाळरावांच्या या उपद्व्यापात आहेत. ही सर्व घटना गोपाळरावांच्या तल्लख बुद्धीने एक विशिष्ट उद्देश ठेवून आणि खूप दिवस आधीच ठरवून घडवून आणली आहे. यावेळी पुण्यातील अनेक लोकांना पंचहौद चर्च मध्ये बोलावून, तिथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातल्या `पुणे वैभव' या वृत्तपत्रात हा सर्व वृत्तांत भरपूर रंगवून छापून आणला आहे. त्यानंतर या लोकांनी तिथं ख्रिश्चन लोकांच्या हातचा चहा पिऊन धर्मद्रोह केला असा आरोप करण्यात आला.

विशेष म्हणजे या स्टिंग ऑपरेशमध्ये या खळबळजनक वृत्ताचे श्रेय गोपाळरावांना देण्यात आलं आहे. या बातमीला गोपाळराव जोशी यांची बाय लाईन म्हणजे नाव आहे. अर्थात गोपाळराव त्यावेळी पूर्णवेळ पगारी बातमीदार नव्हते. त्याकाळी अशी पगारी नोकरी अपवादाने असणार कारण नियतकालिकांचे मालक संपादक एकतर हौशी किंवा ध्येयवादी असत.

ही बातमी पूर्ण तपशिलवार प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य तो किंवा गोपाळरावांना अपेक्षित असलेला परिणाम लगेचच झाला. पुण्यातले समाजजीवन त्यामुळे पूर्ण ढवळून निघाले. त्यात मग इतर अनेकांनी आपली पोळी भाजून घेतली. या चहापानाच्या प्रकरणात कोणकोण अडकले होते याची नुसती यादी पाहिली तरी त्यावरून विविध क्षेत्रांत उडालेला धमाका लक्षात येईल. एकाद्या सुगरणीने खाद्यपदार्थांच्या चवीसाठी विविध घटकांचा वापर करावा तसे गोपाळरावांनी आपले डोके वापरून पुण्यातील सामाजिक, राजकीय, सनातनी, पुरोगामी अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा या स्टिंग ऑपरेशन साठी भरणा केला होता.

या लोकांमध्ये देशातील एक प्रमुख राजकीय आणि सामाजिक नेते असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, न्यायमूर्ती म गो रानडे होते, भारत सेवक समाजाचे संस्थापक आणि नंतर उदयास येणाऱ्या गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेवगैरे.

या प्रकरणात मुख्य व्यक्ती आणि सर्वाधिक हानी पोहोचणारी व्यक्ती अर्थातच लोकमान्य टिळक होते. दीड दोन वर्षे या प्रकरणामुळे खूप लोकांना, खूप कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातल्या दोन विरुद्ध टोकांना असलेल्या लोकांनी या वेळी प्रतिस्पर्धी गटावर पुरता हल्ला करून या प्रकरणातली रंगत अनुभवली. दीर्घकाळ चाललेल्या या ग्रामण्य प्रकरणात लोकमान्य टिळकांना दोनदा प्रायश्वित घ्यावे लागले. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यासाठी आणि दोषी लोकांना शिक्षा सुनावण्यासाठी खुद्द शंकराचार्यांची मदत घेण्यात आली होती.

विशेष म्हणजे गोपाळराव जोशी यापैकी कुठल्याही गटांत मोडणारे नव्हते. या स्टिंग ऑपरेशनमुळे पत्रकार गोपाळराव जोशी यांचे एकमेव इप्सित साध्य झाले. हे उद्दिष्ट्य म्हणजे त्याकाळच्या पुणे शहरातील लोकांचा सनातनीपणा, सुधारक मंडळींची प्रत्यक्ष जीवनातील विसंगती उघडकीस आणणे.

हां, इथं सांगायलाच हवं, तर गोपाळराव जोशी हे भारतीय कुटुंब नियोजन चळवळीचे आद्य प्रवर्तक र. धो. कर्वे यांच्या सहकारी शकुंतला परांजपे यांचे चुलत आजोबा, सिने-दिग्दर्शिका सई परांजपे यांचे चुलत पणजोबा. शकुंतला परांजपे यांनी गोपाळराव जोशी यांचे व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. `निवडक शकुंतला परांजपे' या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात शकुंतलाबाई लिहितात:

”गोपाळरावांना ढोंग आणि दांभिकपणा बिलकुल खपत नसे. नाना सोंग करून दुसऱ्याचं ढोंग चव्हाट्यावर आणण्याची त्यांना फार खोड. पाणी शिंपडल्यानं माणूस बदलतं काय, असं म्हणून स्वारी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाली आणि पुढल्या रविवारी प्रार्थनेच्या वेळी धोतर नेसून उघड्या पोटावर जानवे घालून चर्चमध्ये जाऊन बसली. तेव्हा तेथील पादऱ्यानं हळूच सुचवलं की, तुम्ही आता ख्रिस्ती झालात तेव्हा जानवं वगैरे काढून नीट पोशाख करावा. “जानवं घालू नये. असं बायबलमध्ये कुठं सांगितल आहे?” असा सवाल गोपाळरावांनी पादऱ्याला केला आणि लवकरच संगमात स्नान करून, आता माझी सर्व पाप धुऊन निघाली आणि मी पूर्ववत हिंदूच आहे, असा आधार धर्मग्रंथातून भटभिक्षुकांना दाखवला. ख्रिस्ती धर्माची टिंगल आणि हिंदू धर्माचीही टिंगलच!”

गोपाळरावांच्या अशा या व्यक्तिमत्वाला साजेसं असं हे स्टिंग ऑपरेशन आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी `दर्पण' नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. महाराष्ट्र सरकारतर्फे ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून जातो. `दर्पण'च्या स्थापनेनंतर सहा दशकांनी - १४ ऑकटोबर १८९० रोजी - गोपाळराव जोशी यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. अर्थात `स्टिंग ऑपरेशन’ हा पत्रकारितेत रूढ झालेला अलिकडचा शब्दप्रयोग.

गोपाळरावांच्या या स्टिंग ऑपरेशनविषयी माझा स्वतंत्र एक लेख आहे, `बदलती पत्रकारिता' या माझ्या पुस्तकात ते एक प्रकरण आहे.

भारताच्या इतिहासात काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले काही स्टिंग ऑपरेशन्स खूप गाजले. भारतीय जनता पक्षाचे पहिले (आणि आतापर्यंतचे एकमेव ) दलित पक्षाध्यक्ष म्हणून गाजावाजा केलेले बंगारु लक्ष्मण हे लाच घेताना एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लोकांनी २००१ साली पाहिले. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते आणि त्यामुळे पक्षाध्यक्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच बंगारु यांना दरवाजा दाखवण्यात आला होता.

त्याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाच्या नेत्या जया जेटली यांच्यासह इतरही स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे स्टिंग ऑपरेशन `तेहेलका डॉट कॉम’ या न्युज पोर्टलने केले होते.

लोकसभेचे अकरा सदस्य २००५ साली संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेताना अशाच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेले होते, त्यामध्ये भाजपचे सहा, बहुजन समता पार्टीचे तीन आणि काँग्रेसचा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रत्येकी एक खासदार होता.

अलिकडच्या काळात मात्र स्टिंग ऑपरेशन घडवून आणण्याचं धाडस कुणाही वृत्त एजन्सीनं वा पत्रकारानं केलं नाही.

गोपाळराव जोशी यांचे हे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासात गाजलेले आणि सर्वपरिचित असले तरी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात या प्रकरणाची साधी दखलही घेतली जात नाही. पत्रकारितेसाठी देशातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत सोडा, महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबईच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांतसुद्धा या देशातील पहिल्यावहिल्या सर्वाधिक गाजलेल्या स्टिंग ऑपरेशनविषयी शिकवले जात नाही.

गोपाळराव जोशी यांचे एकूण व्यक्तिमत्व अत्यंत वादग्रस्त असले तरी देशाच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन घडवून आणून समाजजीवनातील अनेक विसंगती चव्हाट्यावर आणण्याचे श्रेय त्यांना निश्चितच द्यावे लागेल.

(लेखक कामिल पारेख हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT