Kamala Harris Tulsi Gabbard Usha Vance sakal
Blog | ब्लॉग

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

US elections 2024 : तिन्ही नेत्या अमेरिकन नागरीक आहेत. कमला हॅरिसची आई श्यामला गोपालन, तर उषा चिलकुरी व्हान्स यांची आजी शांथम्मा चिलुकुरी हैद्राबाद विद्यापिठात शिकवितात.

विजय नाईक

19 सप्टेंबर रोजी जपान एअरलाईन्स च्या विमानाने दिल्लीहून टोकियोच्या विमानतळाच्या दिशेने उड्ड्ण केले आणि तेथील तब्बल 14 तासांच्या स्टॉप ओव्हर नंतर 20 सप्टेंबरला ते हवाईची राजधानी होनोलुलुला उतरले. प्रवासात अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांचा विषय मनात घोळत होता. या निवडणुकातील एक वैशिष्ठ्य म्हणजे अमेरिकेच्या अत्युच्च राजकारणात भारतीयत्वाचा दिसणारा एक समान धागा, हा होय.

डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार व अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (59), होनोलुलुच्या पूर्वाश्रमीच्या डेमॉक्रॅट सिनेटर व आता पूर्णपणे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोटात गेलेल्या स्वतःला हिंदु म्हणविणाऱ्या कर्नल तुलसी गॅबार्ड (43) व रिपब्लिकन पक्षाचे उप-राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जे.डी.व्हान्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी व्हान्स (38) यांचे भारतीयत्व व तुलसी गॅबार्ड यांचे हिंदुत्व कुठे लपून राहिलेले नाही.

त्या रोज निरनिराळ्या वाहिन्यांवर दिसत असतात. तिन्ही नेत्या अमेरिकन नागरीक आहेत. कमला हॅरिसची आई श्यामला गोपालन, तर उषा चिलकुरी व्हान्स यांची आजी शांथम्मा चिलुकुरी हैद्राबाद विद्यापिठात शिकवितात.

10 सप्टेंबर रोजी कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनच्या (एबीसी) वाहिनीवर जो जाहीर संवाद झाला, त्यात ``हॅरिस यांची सरशी झाली,’’ असे मत बह्वंशी राजकीय निरिक्षक व वाहिन्यांनी व्यक्त केले आहे. तथापि, 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकात सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. त्यामुळे कोण जिंकणार, याकडे केवळ अमेरिकेचे नव्हे, तर जगाचे लक्ष लागले आहे. त्यावर जागतिक राजकारणातील अनेक प्रमेये अवलंबून असतील.

अमेरिकेचे पन्नासावे राज्य हवाई हे परंपरात डेमॉक्रटिक पक्षाला पाठिंबा देणारे राज्य होय. त्याची राजधानी होनोलुलु हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जन्मस्थान. त्यांचे शालेय शिक्षण इथे झाले. वर्षातून एकदा ते साऱ्या कुटुंबासह काही दिवस इथं येतात. वायमानालोच्या किनाऱ्यावर 12 दशलक्ष डॉलर्स खर्चून बांधण्यात आलेला त्यांचा महाल वजा निवासस्थानही हा चर्चेचा विषय बनलाय.

इथल्या सिनेटर तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकेच्या सभागृहात श्रीमत्भगवत गीतेवर हात ठेऊन सदस्यपदाची शपथ घेतली होती. त्या मूळच्या अमेरिकन सामोआच्या. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली होती. पण, 2022 मध्ये त्यांनी पक्षाला रामराम ठोकला व स्वतः ला अपक्ष सिनेटर म्हणून घोषित केले.

वयाच्या 21 व्या वर्षी त्या हवाईच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह झाल्या. सामोआतून हवाईमध्ये स्थलांतर केल्यावर तिच्या आईला (कॅरोल) हिंदुधर्माबद्दल आवड निर्माण झाली. तिने आपल्या मुलांना हिंदु नावे दिली. तुलसी ही तिची मुलगी.

`देवी तुलसी’वरून ते देण्यात आलं. बालपणापासून तुलसीला कर्मकांड, योगविद्या, हिंदु धर्माचं शिक्षण मिळालं. म्हणून अमेरिकन असूनही ती स्वतःला हिंदु म्हणते. अमेरिकन लष्करात असताना कुवेत व हॉर्न ऑफ आफ्रिका येथे तुलसीनं निरनिराळ्या जबाबदाऱ्या संभाळल्या व तिला कर्नलचा हुद्दा मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाहीर प्रचार सभातून त्या डेमॉक्रॅटिक पक्ष, बायडन व कमला हॅरिस यांच्यावर जोरदार हल्ला चढवितात. त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे, ``बायडन व हॅरिस यांनी मध्य आशिया व युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. उलट, युद्धे भडकतील, यासाठी परराष्ट्र धोरण राबविले.

त्याच प्रमाणे गृहनिर्माण करण्यासाठी पावले उचलली नाही. अमेरिकेत 40 लाख घरांची कमतरता आहे. मेक्सिकोहून होणारे स्थलांतर थोपविले नाही. ते केवळ घोषण करतात, परंतु, कृती मात्र शून्य होती. त्यांनी इस्त्राइलला टोकाचा पाठिंबा दिला.

या उलट ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी लोकशाही (भारत व युरोप), हुकूमशाही (उत्तर कोरिया) राजेशाही (सौदी अरेबिया) असलेल्या सर्व देशांबरोबर संपर्क साधले. युद्धाला प्रोत्साहन देणारे धोरण बंद केले. दहशतवादाला अमेरिकेत थारा मिळू नये, म्हणून अनेक इस्लामी देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी केली.’’

गॅबार्ड या आपल्या भाषणातून गन लॉबी मुळे वाढलेल्या हिंसाचारी प्रवृत्तीचा उल्लेख टाळतात. तसेच, ``हवामान बदल हा (क्लायमेट चेन्ज इज ए होक्स) निव्वळ ढोंगीपणा आहे,’’ या ट्रम्प यांच्या दाव्याबद्दल उल्लेख करण्याचे टाळतात. गेल्या निव़डणुकीत ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावून कपिटोल हिलवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे लोकशाहीला मोठा धक्का बसला, हे त्या कबूल करीत नाही. तथापि, बायडन व हॅरिस यांनी विरोधकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले,’’ असा आरोप त्या करतात.

टेस्ला व एक्सचे (ट्विटर) उद्योगपती इलॉन मस्क यांच्याप्रमाणे तुलसी गॅबार्ड व पूर्वाश्रमीचे डेमॉक्रॅट रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे सरकार आल्यास या तिघांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती दिली जातील, असे बोलले जाते. प्रख्यात गायिका टेलर स्विफ्ट यांनी आपला पाठिंबा जाहीरपणे कमला हॅरिस यांना दिला आहे. पण, त्यापेक्षाही केनेडी यांचा ट्रम्प यांना दिलेला पाठिंबा महत्वाचा मानला जातो.

गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाचे उप-राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदावर ओहायोचे सिनेटर जे.डी.व्हान्स व डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार व मिन्नेसोटा राज्याचे गव्हर्नर टिम वाल्झ यांच्यात `सीबीएस’ वाहिनीवर खुला संवाद झाला. त्यातही वाल्झ हे सरस ठरले. व्हान्स यांनी ट्रम्प यांचे एकेकाळी `हुकुमशहा,’ असे वर्णन केले होते. त्यांच्यावर जाहीर टीका केली होती. पण, आज ते समर्थक बनले आहेत.

या निवडणूक प्रचारात महत्वाच्या मुद्यांपैकी गर्भपाताचा मुद्दा अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्याबाबत ``स्त्रीचा स्वतःच्या शरिरावर पूर्ण हक्क असला पाहिजे,’’ असे हॅरिस म्हणतात. तसेच, ``कोणत्याही राज्याने त्याबाबत बंधने घालू नये,’’ असे त्या म्हणतात. त्याबाबत अमेरिकन महिलांचा पाठिंबा हॅरिस यांना मिळेल, अशी चिन्ह आहेत.

व्हान्स यांची पत्नी उषा चिलुकुरी या व्यवसायाने वकील आहेत. `फॉक्स न्यूज’ने त्यांची अलीकडे मुलाखत घेतली. त्यावेळी व्हान्स यांच्याशी आपली कशी मैत्री झाली, नंतरचा विवाह व मुलांचे संगोपन याबाबत त्या बोलल्या. व्हान्स यांचे नाव ट्रम्प यांनी उप-राष्ट्रपतीच्या जागेसाठी घोषित केल्यावर त्यांच्यावर वृत्तपत्रातून टीका झाली.

त्याबाबत बोलताना उषा व्हान्स म्हणाल्या, की टीकेचे वार सहन करण्याइतकी माझी कातडी जाड (थिक स्कीन) झाली आहे. ``जे.डी व्हान्स बाबत लोक काय म्हणतात, याची मला चिंता नाही.’’ ज्या अमेरिकन महिला निपुत्रिक आहेत, त्यांचे व्हान्स यांनी `चाईल्डलेस कॅट लेडीज’, असे वर्णन 2021 मध्ये केले होते.

त्याबाबत अमेरिकेत जोरदार टीका झाली. व्हान्स यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली नाही. उलट, ``माझे वाक्य तोडण्यात आले ( टेकन ऑउट ऑफ कॉन्ट्टेक्स्ट)’’ अशी सारवासारव केली होती. त्या मुद्द्यानेही पुन्हा उचल घेतली आहे. परंतु, निपुत्रिक महिलांवर टीका करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता,’’ असे उषा व्हान्स म्हणतात.

ट्रम्प यांची सरशी झाली, तर अमेरिकेच्या राजकारणात उषा व्हान्स त्यांचे महत्व वाढेल. हॅरिस जिंकल्या तरी उषा व्हान्स यांच्यात व त्यांच्यात कटुता निर्माण होणार नाही. तथापि, तुलसी गॅबार्ड व कमला हॅरिस यांच्यातील कटुता कायम राहील. या महिला नेत्यांकडे पाहिले व सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यात महत्वाच्या पदांवर होणाऱ्या भारतीयांच्या नेमणुका याकडे पाहिले, की अमेरिकन राजकारणात भारतीयांचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे, याची खात्री पटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT