Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण| सत्तेतही तुम्हीच अन् कुलूप ठोकणारेही तुम्हीच...

संतोष कानडे

नाथाभाई दाढीवाले परवाच्या प्रसंगामुळे रागाने लालबुंद झाले होते. रागाच्या भरात दाढीसुद्धा लाल होते की काय, या भीतीने दाढीचे केस क्षणभर थरथरुन गेले. त्यांनी मोबाईल काढला अन् दादाराव दणगटेंना फोन फिरवला. संतापाला आवर घालत ते बोलते झाले-

नाथाभाईः हॅलोS..हॅलोSS... दादाS..दादाराव काय म्हणतेय तब्येत?

दादारावः (घोगऱ्या आवाजात) बोलाS जरा कणकणी हाईच. ताप वाढलाय ताप..

नाथाभाईः (थेट मुद्द्यावर येत) तुमचा ताप वाढला अन् आमच्या डोक्याला ताप झालाय

दादारावः (आश्चर्याने) काय झालंय? आमदारं अपात्र ठरले वाटतं तुमचे.. होणारच होतं ते-

नाथाभाईः (मध्येच रोखत) ते नाही हो! आमदार कसले अपात्र होतायत.. मुद्दा जरा दुसराचे

दादारावः (कान टवकारुन) दुसरा? म्हंजे? नेमकं झालं काय? आम्हाला तर खबरच न्हाई

नाथाभाईः (राग आवरत) तुम्हाला कशी खबर लागणार? तुम्ही आजारी पडले ना!

दादारावः (उसणं आवसन् आणून) हो पण झालं काय ते तर सांगाल का न्हाई?

नाथाभाईः (चिडक्या स्वरात) तुमचे लोक सरकारविरोधात आंदोलन करतायत.. शोभतं का हे?

दादारावः (आश्चर्याने- 'खरं की काय'च्या स्टाईलमध्ये) काय म्हण्ता? कोणंयत ते? असं चालणार नाही...

नाथाभाईः (दाढीवरुन हात फिरवत) बघा आता तुम्हीच? तुम्हाला माहितीच नाही म्हणता, बरं..बरं..बरं...

दादारावः (पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न) नाही ना! मी हिकडं आजारी अन् ते तिकडं वाट्टल तसं करायले.

नाथाभाईः (दाढीतल्या दाढीत हसत) असंय का? अवघड झालीय दुनिया.. कधी-कोण-काय करील याचा नेमच नाही.

दादारावः (मुद्दा पटलाय असं समजून) दुनिया बेक्कार निघाली राव. आश्वासनं एकाला, व्हिडीओ दुसऱ्याचा अन् बसलाय तिसराच

नाथाभाईः (धीरानं घेत) हो का? आमचंबी तसंच म्हणा ना. नको नको म्हण्तो, तरी बसवलं अन् आता उठा..उठा लावलंय. का तर कुणीतरी अचानक आला म्हणून-

दादारावः (लटक्या रागात) अचानक कसलं? कुणी अचानक येत नसतं. जुने दावेदार असतात.. फार जुने. तेव्हा तुम्ही-

नाथाभाईः (आवरतं घेत) जावू द्या. कशाला शिळ्या कढीला उत आणता. (मुद्द्यावर येत) पण मी म्हणतो- खरंच तुम्हाला माहिती नव्हतं का? हे आंदोलनाचं-

दादारावः (शपथेवर) कशाचं काय.. मी इथं जाम आजारी, मला कुणी इच्चारलंच न्हाई. बघतो ह्यांना आता.

नाथाभाईः (खरंखोटं सोडून देत) असो... मीसुद्धा बोललोय. सत्तेत राहून अशी आंदोलनं करता येत नाहीत. तुमचे मंत्री मंत्रालयात अन् तुम्हीच कुलूप ठोकणार का?

दादारावः (शेवटची सारवासारव) दुनिया लैच बघिडली. कुणी कुणाचं आयकालया तयार व्हईना.. मी असा आजारी पडलोय नाहीतर-

नाथाभाईः (लहान लेकराला बोलल्यासारखं) असू द्या..असू द्या... तुम्ही काळजी घ्या. कुणी काय व्हिडीओ टाकला अन् कुणाचं काय आंदोलन सुरुय, याच्यात तुमी लक्ष घालू नका.. काळजी घ्या!

(असं म्हणत नाथाभाईंनी रागाच्या भरात भिंतीवर मोाबाईल आदळला. तिकडे दादाराव मिश्किलपणे गालात हसले आणि पांघरुन घेऊन झोपी गेले)

समाप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT