Mahatma Basaveshwar Jayanti esakal
Blog | ब्लॉग

बसवण्णांनी 'त्या' धर्म व्यवस्थेला आव्हान देऊन लिंगायत धर्माची स्थापना केली अन् माणुसकीचा समन्वय साधला!

सकाळ डिजिटल टीम

बसवण्णा यांनी अनुभव मंटपात समाजातील सर्व स्तरातील लोकांना मुक्त प्रवेश दिला होता. सोबत स्त्रियांनाही येथे प्रवेश होता.

-डॉ. नितीन रणदिवे, सांगली.

महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) यांनी समाजव्यवस्था परिवर्तनाचे विचार मांडले. त्यांनी तत्कालीन धर्म व्यवस्थेला आव्हान देऊन पर्यायी धर्माची (Lingayat Religion) स्थापना केली. त्यासाठी अनुभव मंटपाद्वारे त्यांनी कल्याणकारी समाज आणि राज्याची मांडणी केल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची पायाभरणी त्यांनी राजेशाही व्यवस्थेत केलेली आहे. अनुभव मंटप हा लोकशाही विचार मांडण्याचा संविधानिक ढाचा होता. अध्यात्म आणि भक्ती चळवळीतून माणुसकीचा समन्वय साधण्याचे कार्य बसवण्णा (Mahatma Basaveshwar) यांनी केले. त्यांची आज जयंती. त्यानिमित्त...

‘अनुभव मंटप’ म्हणजे लोकशाही संसदची स्थापना बसव कल्याण (Basav Kalyan) येथे करून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक या बाबींचा समाज आणि लोककल्याणासाठी उपयोग करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आपल्या विचारांची मांडणी केली. व्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य, संपत्ती बाळगण्याचे स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य या संविधानिक अधिकारांचा लोकांनी स्वीकार करून आपले जीवन विकसनशील करण्याच्या दिशेने वैचारिक मांडणी त्यांनी केली आहे.

त्यांनी मांडलेला सामाजिक समतेचा विचार समता व बंधुता या राजकीय विचारातील संकल्पनांना सामावून घेणारा होता. स्वावलंबी होण्यासाठी उद्योगाचा आधार सांगितल्याने स्वाभाविकपणे समाजविघातक बाबींचा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर आळा आला. राज दरबारात मोठ्या पदावर असतानाही त्यांनी आपल्या पदाचा उपयोग अनुभव मंटपाच्या वाढीसाठी किंवा त्याच्या आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी कधीही केला नाही. यातून त्यांची कर्तव्यदक्ष राजकीय बुद्धी दिसून येते.

या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी, यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचन साहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरुपी विचार पेरले. त्यांनी १२ व्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची सुरुवात केल्याचे वचन साहित्यातून दिसून येते. वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधुता एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सुशासन आणि प्रशासन आदी बाबीवर सखोल विवेचन केले आहे.

बसवण्णा यांनी अनुभव मंटपात समाजातील सर्व स्तरातील लोकांना मुक्त प्रवेश दिला होता. सोबत स्त्रियांनाही येथे प्रवेश होता. आध्यात्मिक विषयावर येथे चर्चा घडवून आणल्या जात असे. समाजात चाललेल्या अनिष्ठांचा नि:पात करून त्याजागी इष्टाची स्थापना या अनुभव मंटपाद्वारे त्यांना अपेक्षित होती. राज्याची उभारणी ही हिंसेवर आधारित आहे, हे बसवाण्णांनी अनुभवले होते. बसवानी राजकारणाला अध्यात्म व नीतीची बैठक देण्याचा प्रयत्न केला.

व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना धार्मिक कलह, श्रेष्ठक, कनिष्ठत्व यांना दूर लोटताना बसवांचे धर्मविषयक विचार चिंतन मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. त्यांनी लोकशाहीचा प्रत्यक्ष उल्लेख केला नव्हता तरी सर्वांना समान स्तराची अपेक्षा त्यांच्या वचनातून दिसून येते. स्त्री-पुरुष समतेबाबतचे त्याचे विचार मध्ययुगात सर्वथा नवीनच होते. स्वतःच्या पत्नीला प्रोत्साहन देऊन दासोह अर्थात दान करणे, शिक्षकी पेशाची कामे अर्थात ज्ञानदान करणे, अनुभव मंटपाद्वारे वचन साहित्याची निर्मिती करून सर्व स्तरातील लोकांना स्त्री-पुरुषांना विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT