साधारणपणे गेल्या दीडदोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात अभूतपूर्व स्थिती निर्माण केलीय. अनेक देशांना लॉकडाऊन, संचारबंदीसारखी कठोर पावलं उचलावी लागतायंत. आपला भारत, महाराष्ट्र, पुणंही याला अपवाद नाहीये. उलट महाराष्ट्रात, मुंबई-पुण्यात कोरोना रुग्ण वाढतायत. अशा सर्व परिस्थितीत डॉक्टर, पोलिस, प्रशासकीय कर्मचारी आणि पत्रकार कोरोनाशी सर्वशक्तीनिशी दोन हात करत आहेत, ते जोखीम पत्करूनच. डॉक्टर किंवा वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, नर्स कोरोना रुग्णांचे निदान, तपासणी, उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतायत. पोलिस लॉकडाऊन, संचारबंदीची कठोर पालन होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रशासनही शासकीय आदेशांची अंमलबजावणी करत या अभूतपूर्व संकटात समाजात सुसूत्रता राखण्याचा प्रयत्न करतंय. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाणारी प्रसारमाध्यमंही या रणांगणात उतरलीयत. एकीकडं कोरोनाशी निकराचं युद्ध सुरू असतानाच दुसरीकडं सोशल मीडियावरील फेक न्यूज, मेसेजशी लढण्याचं ‘दुहेरी युद्ध माध्यमांना करावं लागतंय. अशा परिस्थितीत समाजापर्यंत विश्वासार्ह, अधिकृत माहिती, बातम्या पोचवणं कधी नव्हे इतकं गरजेचं बनलंय. अनेकजणांना त्यासाठी आपल्या कार्यालयात जाणं, फिल्ड वर्क अपरिहार्य झालंय.
‘सकाळ’ सारख्या वाचकांशी अनेक दशकांची अतूट नाळ जोडलेल्या माध्यम समूहाच्या एनआयई (Newspaper In Education) चा विद्यार्थ्यांसाठीच्या फेब्रुवारीच्या अंकात ‘कोरोनाचा कहर’ ही मुखपृष्ठ कथा केली होती. राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना कोरोनाचा विषय मुळातून समजून सांगितला. त्यावेळी, नुकतचं ३१ जानेवारीला केरळमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याचा उल्लेखही केला होता. कोरोना प्रकरण गंभीर असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या ‘कोव्हिड १९’ पेक्षाही ‘सार्स’ हा हवेतून पसरणारा व्हायरस अधिक धोकादायक होता. तो भारतात पसरला नव्हता. त्यामुळं, ‘कोव्हिड १९’चा भारताला फारसा धोका नसेल, असं वाटत होतं. मात्र, ती आशा फोलं ठरली.
साधारण कामाच्या गरजेनुसार ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील मुख्य कार्यालयात जावं लागतंय. हडपसरवरून कार्यालयापर्यंत कॅम्प, पुणे स्टेशनमार्गे येताना वेगवेगळे अनुभव आले. प्रमुख रस्ते, चौकात बॅरिकेड्स उभारण्यात आलेत. वैदुवाडी, पुणे स्टेशनला पोलिस येणाऱ्याजाणाऱ्यांची चौकशी करतात.
प्रसंग १ : स्थळ : हडपसर गाडीतळ
हडपसर उड्डाणपुलाखालील चौकात पोलिस - वाहतुक पोलिस सर्वांनाच अडवत होते. चौकशी करूनच पुढे जाऊ देत. मलाही पोलिसांनी थांबविले. बाईकवर ‘सकाळ - प्रेस’ लिहिलेले स्टिकर होते. तरीही, पोलिसाने अधिकृत आयकार्ड तपासले. ते मी घरातून निघतानाच गळ्यात घालतो. खात्री पटल्यावर त्याने मला पुढे जाण्यास परवानगी दिली. ‘‘खूपजण नुसतं प्रेस लावून उगाच फिरताहेत,’’ पोलिस म्हणाला. ‘‘सर, हरकत नाही, उलट तुम्ही अत्यावश्यक सेवा असली तरी आयकार्ड तपासायलाच हवं. माझी काहीच तक्रार नाही.’’ मीही त्यांना सहमती दर्शविली. आम्ही दोघेही कोरोनाविरुध्दच्या युद्धातले एक छोटे महत्वाचे घटक. दोघांच्याही डोळ्यांतून एकमेकांबद्दल आदर व्यक्त झाला. माझी बाईक ‘सकाळ’ कार्यालयाच्या दिशेने धावू लागली.
प्रसंग २ : स्थळ : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय/ससून हॉस्पिटल
एकेदिवशी साधारण रात्री आठसाडेआठ वाजता ड्युटी संपवून निघालो. गाडी काहीशी वेगात होती. पुणे स्टेशनजवळील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आलो. तितक्यांत पलीकडच्या रस्त्यानं उलट दिशेला जाणाऱ्या पीएमपी बसचालकाने दुभाजकातून यु टर्न घेतला. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची सेवा सुरू होती. माझी बाईक पाहून बसचालकाने बस थांबवत एक प्रकारे मला पुढे जाण्याचा संदेश दिला. मी मात्र बाईक थांबविली. तितक्यात बी.जे.च्या प्रवेशद्वारातून एम ॲम्ब्युलन्स बाहेर पडली. मी पीएमपीसाठी थांबलो तर पीएमपी ॲम्ब्युलन्ससाठी. तिघांनी एकमेकांकडे नुसते पाहिले, क्षणभरच. तिघांच्याही डोळ्यांतून एकमेकांबद्दल आदर व्यक्त झाला. ॲम्ब्युलन्स गेल्यावर पीएमपीही बस स्टॉपकडे वळली. माझी बाईक हडपसरला घराच्या दिशेने धावू लागली. मिल्ट्री एरियातील जवळजवळ निर्मनुष्य रस्ते, फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचा पुतळा, त्याभोवती पिवळ्याजर्द फुलांचा पडलेला सडा, पुढे दिमाखात विहरणारा तिरंगा, त्यापुढील रणगाडा जणू लढत राहण्याचा निःशब्द संदेश देत होता.
एरवी समाजातील सर्वच घटक पोलिस, डॉक्टर, पत्रकारांबद्दल बरंच काही उलटसुलट बोलत असतात. त्यात थोडेफार तथ्य असेलही. मात्र, सध्या हेच घटक समाजाच्या, राष्ट्राच्या, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी एकवटलेत. कोरोना व्हायरसचं शिवधनुष्य पेलतायत. मंदिर, मशीदी, चर्च बंद झालीयत. हे देवदूत मात्र तुमच्याआमच्यासाठी उभेच आहेत. त्यांना सहकार्य करुयात, घरीच थांबूयात, कोरोनाला पळवून लावूयात...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.