अलिबागपासून ४८ किलोमीटरवरील मुरुड-जंजिरा किल्ला अभेद्यतेमुळे इतिहासात ठसा उमटवून आहे. जझीरा हा मूळ अरबी शब्द. याचा अर्थ बेट असा आहे. त्यापासून जंजिरा नाव रूढ झाले. मुंबई, पुण्यातून अलिबागला जाण्यासाठी उत्तम बससेवा आहे. अलिबागला आल्यानंतर रेवदंडा मार्गे मुरुडला यावे. मुरुड म्हणजे तळकोकणाचा भाग. नारळी-पोफळीच्या हिरव्यागार झाडांतून डोकावणारी टुमदार घरे पाहताना मस्त वाटते. नबाबाचा वाडा पाहतच मुरुडमध्ये प्रवेश होतो. डाव्या बाजूला निसर्गरम्य मुरुड अन् उजव्या बाजूला समुद्राची गाज... असे भारावून टाकणारे वातावरण आहे.
मुरुडपासून चार-पाच किलोमीटरवर किनाऱ्यावर दंडा व राजपुरी गावे आहेत. येथूनच जंजिऱ्यास जाण्यासाठी शिडाच्या नावांची सोय आहे. जंजिऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार कुठे आहे, हे लवकर समजतच नाही. घोटाभर पाण्यातूनच किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेश करताना उजव्या बाजूला अरबी भाषेतील शिलालेख कोरलेला दिसतो. मुख्य दरवाजाला लागूनच पीर पंचायतन आहे. पीर पंचायतनासमोर तटावरून गेल्यानंतर घोड्याच्या पागा लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच सुरुलखानच्या वाड्याचे अवशेष दिसतात. सध्या या वाड्याची पडझड झाली असून, झाडी-वेलींनी अतिक्रमण केले आहे. भव्य बांधणीवरूनच वाड्याचा त्या वेळचा डौल काय असेल, याची कल्पना येते. गडाच्या पश्चिमेला गोड्या पाण्याचे तलाव आहेत. याच तलावाच्या बाजूने गेल्यावर बालेकिल्ला व सदर आहे. येथे ध्वजस्तंभ उभारलेला दिसतो.
किल्ल्याला सुमारे ३० ते ४० फूट उंचीचे १९ बुरुज आहेत. या बुरुजावरून तोफांचा मारा करण्याची व्यवस्था आहे. याठिकाणी तीन तोफा लक्ष वेधून घेतात. त्यातील ‘कलाल बांगडी’ ही ताकदवान तोफ आहे. तसेच ‘चावरी’ आणि ‘लांडा कासम’ या तोफांची त्याकाळी दहशतच होती. जंजिरा अजिंक्य राखण्यात यांचा वाटा सिंहाचा. २२ एकरांत पसारा असलेल्या या किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम आहे. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. गडाच्या पश्चिमेस तटाखालून चोर दरवाजा आहे. त्याला दर्या दरवाजा म्हणतात. सध्या ही वाट बंद आहे. हा किल्ला पूर्वी स्थानिक कोळी लोकांच्या ताब्यात होता. मात्र, निजामशहाचा सरदार पिरमखानने व्यापारी होऊन किल्ल्यात प्रवेश मिळविला अन् कालांतराने ताबा घेतला. त्याच्यानंतर बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. बुऱ्हाणखानाने किल्ल्याचे महत्त्व ओळखून तटबंदी भक्कम केली. सिद्दी अंबर हा जंजिऱ्याचा मूळ पुरुष. त्याने जंजिऱ्याची जहागिरी बादशहाकडून मिळवली आणि दणकट व चिवट सिद्दी सरदारांच्या सहाय्याने टिकवली. समुद्री आरमाराचे महत्त्व ओळखलेल्या छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी तीन-चारवेळा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजीराजे व पेशव्यांनीही स्वाऱ्या केल्या. मात्र, हे प्रयत्न असफल ठरले. खवळलेला समुद्र, भक्कम तटबंदी आणि बुलंदी तोफा यामुळेच किल्ला अजिंक्य राहिला असावा. जंजिरा पाहण्यासाठी तीन तास पुरेसे आहेत. मुरुडच्या निसर्गसौंदर्यासह अजिंक्य जंजिऱ्याची अभेद्यता अनुभवावी, अशीच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.