हुश्श्य...संपले बाबा एकदाचे २०२०. अनेक संकटांनी भरलेले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारे, सर्वच व्यवस्थांची कठोर परीक्षा पाहणारे. सर्वसामान्यांच्या मनात दुःखद वर्ष म्हणून याची नोंद झालेली आहे. जीवन प्रवाही असते आणि हे काळे ढग दूर होतील, या आशेवरच गत वर्षातील सर्वच संकटांशी प्रत्येकाने आपापल्यापरीने सामना केला. अनेक ठिकाणी तो यशस्वीही झाला. सरत्या वर्षाच्या झळा नव्या वर्षातही जाणवतील, अशी चिन्हे आहेत. तरी तो भूतकाळ झाला, असे मनावर बिंबवत पुढे गेले पाहिजे. त्यासाठी मग दाराशी येणारा प्रत्येक छोटा क्षण आनंदाने लुटता आला पाहिजे. तशी मानसिकता तयार केली पाहिजे. कुटुंब हसते राहील, याची पदोपदी काळजी घेतली पाहिजे. नव्या वर्षाचा हाच खरा संदेश असू शकतो.
भारतीय माणूस संवादप्रिय आहे. सार्वजनिक कार्यक्रमात तो हिरीरीने सहभागी होतो. त्याची जत्रा, त्याचे चित्रपट, नाटक पाहणे, सण-समारंभ सर्वांना बोलावून साजरे करणे... हा स्थायीभाव आहे. त्या सत्वृत्तीवरच गतवर्षात हल्ला झाला. एकत्र येण्यामागे आनंदाचे क्षण एकमेकांच्या आयुष्यात पेरण्याचे कारण असते. दुःख हलके करण्याचेही मनोबल देणारे असते. सामाजिक वावरावर असा घाला गेल्या शतकात फारसा झालेला नव्हता. माणसाची समाज अशी ओळख न राहता एकलकोंडा अशी होणार काय, अशी अशाश्वत भीती होती. लहान मुलांचा कोंडमारा अनेकांना समजला नाही. समजलेल्यांना तो सोडविता आला नाही. असे एक ना अनेक प्रश्न जगण्याची आस दरीत लोटत आ वासून उभे होते. सुदैवाने ते सारे काही मागे पडले आहे. कोरोनाचा कहर कमी होत असतानाच नव्या कोरोनाची हाकाटी ब्रिटनमधून उठली आहे. त्यात सकारात्मक बाब म्हणजे यंत्रणा आणि समाजमनही सज्ज आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीसाठीचे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत. नव्या प्रकाराच्या कोरोनावरही त्या लागू होतील, असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. त्यामुळे चित्र दिलासादायक आहे. त्यामुळे आता कुटुंबात आनंदाचे क्षण पेरण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. छोट्या-छोट्या संवादातून तो आनंद पेरता आला पाहिजे. त्याने गेल्या वर्षभरात मनावर दाटलेले मळभ निश्चित कमी होईल. विशेषतः लहान मुलांसाठी असे आनंददायी क्षण आवर्जुन घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शाळा, शाळकरी मित्र अशा साऱ्यांपासून गेले आठ-दहा महिने दुरावलेल्या मुलांसाठी हे आवर्जुन करावे लागेल. कुठला क्षण दारात येईल, याची शाश्वती नसतेच. हे गत वर्षाने शिकवून दिले आहे. त्यामुळे ‘न्यू नॉर्मल’ मध्ये जगताना मनाची उभारी, पूर्वीसारखे आनंदी जगणं याची नाळ अधिक घट्ट करण्याची गरज आहे. ती पालक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.