file photo e sakal
Blog | ब्लॉग

कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक

डॉ. शरद निंबाळकर

महाराष्ट्र राज्याला ज्यांचे प्रदीर्घ नेतृत्व लाभले असे उत्कृष्ट प्रशासक, लोकप्रिय नेते, वंचितांचे उद्धारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी तसेच महाराष्ट्र कृषी कृषी औद्योगिक क्रांतीचे नेते स्व. वसंतराव नाईक (vasantrao naik) यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा आज कृषिदिन (agriculture day). pioneer of agroindustrial revoltuion vasantrao naik birth anniversary()

आपल्या जनमोही, सर्वसमावेशक कार्यशैलीचा ठसा ज्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पटलावर उमटविला असे महाराष्ट्राचे नररत्न संसदपटू नाईक साहेब यांची १०८ वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सुसंस्कृत, प्रामाणिक आणि विकासाचे राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व आजच्या काळात दुर्मिळच. विरोधी पक्षालाही विश्वासात घेऊन जनहिताचे निर्णय घेत प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ सदैव आघाडीवर ठेवणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव नाईक साहेबांवर होता. पं. जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री त्यांचे आदर्श होते. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कार्यप्रवणता आणि निश्चित ध्येय धोरणाची आखणी व महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारूप ठरविले गेले होते. डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा आशीर्वादही त्यांना लाभला होता. आदर्शग्राम चळवळीतील सहभागातूनच त्यांची राजकीय जीवनाला सुरुवात होऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अकरा वर्षांपेक्षाही जास्त काळ सलग तीन वेळा हे पद भूषविणाऱ्या नाईक साहेबांनी राजकीय इतिहास घडविला आहे. महसूल उपमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री ही पदे भूषवीत १९६३ ला ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शेती, शेतकरी, वंचित समाज आणि औद्योगिक संरचना निर्मिती ही नाईक साहेबांची प्राथमिकता होती. शेतकऱ्यांची समृद्धी हा त्यांच्या चिंतनाचा विचार असायचा. शेती आणि शेतकरी जगला तरच लोकशाही जगेल, असा त्यांचा विचार होता.

पाणी आणि वीज हे शेती व ग्रामीण भागातील कृषी उद्योगासाठी तसेच सर्वांगिण विकासासाठी मूलभूत गरजा असल्याने यासाठी त्यांनी मोठ्या प्रकल्पांची निर्मिती करण्याचे ठरविले. जायकवाडी, उजनी, बेन, अप्पर वर्धा या सारखे छोटे-मोठे सिंचन प्रकल्प त्यांच्या काळात उभे झाले. विद्युत प्रकल्पांच्या निर्मितीत नागपूर जवळील कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी, भुसावळ इत्यादी प्रकल्प निर्माण करून ऊर्जेचे जणू एक जाळेच राज्यात निर्माण केले. सिंचन आणि पाण्याचा काटेकोर वापरासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अशा योजना राज्यभर राबविल्या. शेतीसाठी पाणी आणि वीज हे विकासाचे सूत्र प्रमाण मानून विकासाला गती देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून जनहिताचे निर्णय निर्भयपणे घेण्याची कुवत फार कमी नेतृत्वात आढळते. तसेच विरोधाला, अडचणींना एक इष्टापत्ती म्हणून बघण्याची दृष्टी फार थोड्या जन-नेतृत्वात आढळते. याच न्यायाने नाईक साहेबांनी अन्नधान्य स्वयंपूर्णता गाठणे, शेती उत्पादनात वाढ, सहकारी संस्थांना बळकटी देणे, मराठीला राजभाषेचा दर्जा, महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठांची निर्मिती, मुंबईतील जुन्या जीर्ण चाळींच्या नूतनीकरणाचा निर्णय, कापूस एकाधिकार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाला गती देण्याचे प्रयत्न, राज्यातील हरितक्रांती, धवलक्रांती अशा कितीतरी योजना अकरा वर्षांच्या कारकिर्दीत राबवून महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचे देदीप्यमान काम स्व. वसंतराव नाईक यांचे आहे.

साठ आणि सत्तरची दशके शेतीच्यादृष्टीने अत्यंत कष्टदायक होती. देशाची अन्नधान्याची परिस्थिती बिकट होती. फक्त ५२-५५ दशलक्ष अन्नधान्य वितरणासाठी देशात उपलब्ध होत असे. परदेशातून अन्नधान्य आयात करणे क्रमप्राप्त होते. देशाच्या अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करताना अन्नधान्य आयात करणे, वितरण व्यवस्था, साठवणूक इत्यादीवर भरपूर प्रावधान करावे लागत असे. मा. यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री असतानाचे वक्तव्य त्याकाळी खूप काही सांगून गेले. अर्थसंकल्पात जास्तीत जास्त प्रावधान परदेशी धान्य आयात करणे, ते आणणे आणि साठवणूक करून ते देशवासीयांपर्यंत पोहोचवणे याचसाठी करावे लागायचे. अन्नधान्य स्वयंपूर्णता आली असती तर हा निधी इतर विकास कामात वापरता आला असता याची खंत त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील भाषणात दिसून येते.

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर केलेल्या भाषणात याच अनुषंगाने महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याची भीष्म प्रतिज्ञा नाईक साहेबांनी केलेली सर्वांच्या स्मरणात आहेच. तिथूनच त्यांनी सहा पोते एकरी ज्वारीचे उत्पादन घेऊन आपण स्वयंपूर्णता गाठू शकणार नाही, हे हेरले. उत्पादन वाढीसाठी CSH-१ या संकरित ज्वारीच्या वाणाचा प्रसार-प्रचार राज्यभर सुरू केला. त्यांची ही मोहीम आम्ही जवळून पाहिली आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. विरोधकांनी हायब्रीड ज्वारीने माणूस कामातून जातो, असाही प्रचार केला. नाईक साहेबांनी या कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता २० पोती एकरी उत्पादन क्षमता असलेल्या संकरित ज्वारीचा झपाटल्याप्रमाणे एकच ध्यास घेतला. सर्व यंत्रणा त्या कामी लावली. स्वतःही पाऊस कुठे किती पडला, किती पिशव्या कोणत्या जिल्ह्यात पोहोचल्या याचा रोज सकाळी सचिव आणि स्वीय सहाय्यकांकडून माहिती घेऊन स्वतःला अपडेट ठेवले. बी-बियाणे पैदास करण्यासाठी ग्रामीण भागातील स्त्रिया, मुली यांना इमॅस्क्यूलेशन, पॉलिनेशन शिकवून त्यांना नर, मादी आणि संकरशास्त्र शिकवण्यात आले होते. सीएसएच-१ आणि सीएसएच-५ या संकरित ज्वारीच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले. पीक जास्त झाले तेव्हा भाव ३५ रु. क्विंटल म्हणजे ३५ पैसे किलो, असा ज्वारीचा भाव होता. यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ज्वारीसाठी एकाधिकार खरेदी योजना राबवून रु. ६५ प्रती क्विंटल म्हणजे ६५ पैसे प्रती किलो हा दर दिला. स्वस्त धान्य वितरणात मात्र ३५ पैसे प्रति किलो हाच दर ठेवून बाकी शासनाने तो भार उचलला. इथे नाईक साहेबांची निर्णय क्षमता आणि राबविण्याची इच्छाशक्ती दिसून येते.

राजा प्रजा हितासाठी किती जागरूक असतो? सीएसएच-५ ही ज्वारी भरपूर उत्पन्न देणारी होती. मादी २०७७ A आणि सीएसई ३५४१ हा नर. यांचा संकर म्हणजे सीएसएच-५ हे संकरित ज्वारी वाण. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रात १०० एकरावर सीएसई ३५४१ या नराचे प्रात्याक्षिक होते. एक सारखा ताटवा होता. स्वतः मुख्यमंत्री नाईकसाहेब, मा. शंकरराव चव्हाण, मंत्री, वसंतदादा पाटील आणि अकोल्याचे मा. नानासाहेब सपकाळ आणि मंत्रीगण हे प्रात्यक्षिक पीक पाहण्यास येणार होती. गोपालकृष्ण हे कुलगुरू आणि डॉ. गोविंद भराड हे शास्त्रज्ञ व्यवस्थेत होते. ही सर्व व्हीआयपी मंडळी अगदी दहा मिनिटांसाठी भेट देऊन पुढच्या कार्यक्रमाला जाणार होती. हे सर्व मान्यवर प्रात्याक्षिक १० फूट उंच मचाणावर चढून पाहण्यात आणि नंतर फेरफटका मारण्यात इतकी गुंग झाले की दोन तास पिकाचे निरिक्षण त्यांनी केले. नाईक साहेबांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. ते एखाद्या जिज्ञासू विद्यार्थ्यासारखे सर्व समजून घेत होते.

कोयनेचा भूकंप ही आपत्ती संवेदनशीलपणे हाताळून हजारोंचे पुनर्वसन केल्याचे महाराष्ट्र कधीही विसरणे नाही. मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रात सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. प्रदीर्घ दुष्काळाला संधी मानून त्यातून रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. ही योजना पुढे देशभर प्रसारित झाली. नरेगा, नमरेगा ही रोहयोचीच प्रारुपे आहेत. डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या कृषिक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, मा. वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषिक्रांती-हरितक्रांतीला नवे रुप दिले. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

लेखक - डॉ. शरद निंबाळकर (९४२२१६०९५५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT