जिवलग मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचे त्यांनी टाळले.
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा अनेकार्थाने गाजला. त्यांना औपचारिक भेटीचे आमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिले होते. त्यामुळे त्यांचे जिवलग मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचे त्यांनी टाळले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत व नंतर मोदी यांच्या त्या वेळच्या अमेरिका भेटीत ``अब की बार ट्रम्प सरकार,’’ असा नारा लावणारे तेच. अर्थात, त्यांचे आवाहन अमेरिकन मतदाराने झिडकारले, ही बात अलाहिदा. ``वक्त वक्त की बात होती है,’’ हेच खरे.
अमेरिका अथवा कोणत्याही राष्ट्राचा मोदी यांचा दौरा असो, तो गाजत वाजत केला जातो. त्यात अलिंगनांचा वर्षाव असतो, अधुनमधून योगविद्येचे सराव असतात. पत्रकार परिषदा होत नाहीत. केवळ `वन टू वन’ अथवा शिष्टमंडळ पातळीवर चर्चा होतात.
पण, यावेळी बायडन व त्यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले व ``भारतात अल्पसंख्यक मुस्लिमांना कोणताही पक्षपाती वागणूक दिली जात नाही,’’ असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, व्हाइट हाऊसच्या परिसरात होणाऱ्या मोदीविरोधी निदर्शनात अनेक वक्त्यांनी भारतात लोकशाहीची गळचेपी कशी चालली आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर जाचक बंधने कशी लादली जात आहे, विरोधकांच्यामागे मोदींनी चौकशी संस्थांचा ससेमिरा कसा लावला आहे, हे सांगितले.
तर, न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलंकावर मुस्लिम युवक नेता उमर खालेद याला तब्बल एक हजार दिवस कोणत्याही आरोप व चौकशीविना कसे तुरूंगात डावलण्यात आले आहे, याचे छायाचित्र व माहिती होती.
गेले महिनाभर `डबल इंजिन’चे सरकार असलेल्या मणिपूरमध्ये चाललेली जाळपोळ, त्यात झालेले शंभरावरील मृत्यू, बेघर झालेले हजारो नागरीक व न संपणारा मैती व कुकी यांच्यातील संघर्ष, यांचाही उल्लेख होता.
हे सर्व झाकोळले, ते मोदी यांचे अमेरिकेत झालेले भव्य स्वागत, बायडन यांनी त्यांना दिलेला शाही भोज व अमेरिकेच्या संसदेमध्ये मोदी यांना दुसऱ्यांदा संधि मिळून त्यांनी त्यात केलेले भाषण, यामुळे.
राष्ट्रसंघाच्या इमारतीसमोर मोदी यांचा झालेला योगवर्ग, त्यांच्याबरोबर टेस्ला व ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क व अनेक प्रसिद्ध उद्योगपती, विचारवंत, नोबेल पारितोषिक विजेते यांच्याबरोबर झालेल्या गाठीभेटी आदी भरगच्च घडामोडींनी ही भेट गाजली.
भेटीची तयारी गेले वर्षभर चालली होती. अशा भेटींतून दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. त्या म्हणजे, भारताचा काय लाभ झाला व अमेरिकेला काय मिळाले. भारत व अमेरिका यांच्या दरम्यान वेगवेगळ्या पातळीवर चाळीस कार्यगट काम करीत असून, त्यातून निरनिराळ्या क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीचा सतत आढावा घेतला जातो.
दोन्ही देशातील संबंध प्रथम द्विगुणित झाले होते, ते माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या 2005 मध्ये झालेल्या भेटीत व त्या दरम्यान नागरी अणुउर्जा निर्मितीच्या संदर्भात झालेल्या अयतिहासिक समझोत्यामुळे.
त्यानंतर, अध्यक्ष बराक ओबामा, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत मैत्री वाढत गेली. त्यापूर्वी अमेरिकेचा `बगलबच्चा’ असलेल्या पाकिस्तानच्या मैत्रीचे केव्हाच शत्रूत रूपांतर झाले होते.
विशेषतः एबटाबाद येथे लपून बसलेला व पाकिस्तानने आश्रय दिलेला तालिबानचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने यमसदनी पाठविल्यानंतर संबध अधिक दुरावले. पाकिस्तानला मिळणारी आर्थिक व शस्त्रास्त्र पातळीवर मिळणारी मदत जवळजवळ संपुष्टात आली.
अमेरिका व भारत यातील सर्वात मोठे साम्य म्हणजे दोन्ही राष्ट्रात असलेली लोकशाही प्रणाली व दोघांनाही आव्हान देणारा चीन. चीन भारताचा शेजारी, अमेरिकेपासून हजारो मैल दूर. चीनचे जागतिक वर्चस्व कमी करावयाचे असेल,
तर अमेरिकेला आशियातील दोन मित्र राष्ट्रांवर प्रामुख्याने अवलंबून राहावे लागेल, ते होत जपान व भारत. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे भारतातील दीड कोटी लोकसंख्येची बाजारपेठ. अमेरिका व भारत आज बऱ्याच अर्थी व्यापाराबाबत चीनवर अवलंबून असले,
तरी भविष्यात ते प्रमाण कमी करण्यासाठी मोदी यांच्या भेटीचा लाभ होणार आहे. भारताला वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने विकास करायचा असेल, तर अमेरिकेचे फार मोठे साह्य मिळणार आहे.
मोदी यांच्या भेटीत मस्क यांनी भारतात टेस्ला मोटारींचे उत्पादन करण्याचा व्यक्त केलेला मनोदय, मॅक्रॉन कंपनीने संगणक चीप्स निर्मितीसाठी गुजरातमध्ये 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे केलेले वक्तव्य, संरक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची अमेरिकन उद्योगपतींनी दिलेली आश्वासने,
एच-1 बी व्हीसा व स्थलांतर (इमिग्रेशन) च्या संदर्भात अमेरिकेने घेतलेले सकारात्मक निर्णय, भारतीय अंतराळवीराला अवकाशात पाठविण्याची अमेरिकेने दाखविलेली तयारी, आदी लाभ नमूद करावे लागतील.
बायडन यांनी खाजगी भेटीत मोदी यांच्याबरोबर भारतात होणारे मानवी हक्कांचे हनन, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आदीं विषय उपस्थित केले की नाही, याची स्पष्टता अमेरिकेकडून झालेली नाही.
गेल्या अनेक वर्षांच्या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाकडे पाहिले, की अमेरिकेने लोकशाहीला पाठिंबा देण्याअयवजी सातत्याने हुकूमशहा, लष्करशहा यांना पाठिंबा दिल्याचे दिसते उदा. पाकिस्तानमधील लष्करी हुकूमशहा झियाउल हक,
फिलीपीन्समधील फर्डिनांड मार्कोस, पनामातील इमॅन्यूएल नोरिएगा, इराणमधील महंमद रझा पेहलवी, इंडोनेशियातील सुहार्तो, इत्यादी. या सर्वावर मात केली ती डोनाल्ड ट्रम्प यांनी. त्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या गळ्यात गळा घातला व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना थेट अमेरिकेच्या अंतर्गत व्यवहारात व निवडणुकात हस्तक्षेप करण्याची संधि दिली.
यावरून असे दिसते, की मोदी यांनी भारतात लोकशाहीची कितीही गळचेपी केली, ,हिंदुत्वाच्या नावाखाली दडपशाही केली, तरी `आपले राष्ट्रहित’ साधण्यासाठी अमेरिका मोदी यांना पाठिंबा देईल. या पाठिंब्याला अधिक झालर चढेल, ती 2024 मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले की. त्यानंतर जो बायडन यांची भारतभेट होईल व पुन्हा अलिंगने, गळ्यात गळे, `चाय पे चर्चा’ होईल.
मोदींच्या दौऱ्यात अमेरिकेने आणखी एका गोष्टीकडे कानाडोळा केलाय. तो म्हणजे, रशियाकडून भारत खरेदी करीत असलेल्या खनिज तेलाबाबत.
अमेरिका व रशिया हे बायडन यांच्या काळात पुन्हा एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेत. परंतु, भारताशी मैत्री राखायची असेल, तर भारताच्या खनिज तेलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यावर बंधने लादता येणार नाही, याचीही जाणीव अमेरिकेला झाली आहे.
इराणकडून खनिज तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने बंधने लादली होती व भारताने ती काही प्रमाणात पाळली होती. परंतु, भारताच्या आर्थिक प्रगतीत वाटा घ्यावयाचा असेल, तर जगातील खनिज तेलाचा पुरवठा सतत राखावा लागेल. म्हणूनच, भारत असो वा युरोपातील काही राष्ट्रे असोत, त्यांच्यावर अमेरिकेने बंधने लादली नाही.
मोदी यांच्या भेटीदरम्यान झालेल्या समझोत्यात भारतात सेमी कन्डक्टर निर्मिती करण्याची एप्लाइड मटेरियल्स कंपनीने केलेली घोषणा, जागतिक व्यापार संघटनेत दोन्ही बाजूंतर्फे करण्यात आलेले सहा दावे माघारी घेण्याचा अमेरिकेने केलेला निर्णय, उर्जा क्षेत्रात लागणारे
आवश्यक धातू भारताला पुरविण्याबाबत अमेरिकेने दिलेले आश्वासन, सौर उर्जा, लढाऊ विमाने, ड्रोन्स उपादनाच्या संदर्भात अमेरिकेची होणारी गुंतवणूक, कृत्रिम बुद्दिमत्ता क्षेत्रात साह्याची तयारी आदी मोदी यांच्या भेटीतील भारतोपयोगी गोष्टी आहेत.
येत्या सप्टेंबरात भारतात होणाऱ्या जी-20 च्या शिखर परिषदेत मोदींना या दौऱ्याचा लाभ होणार आहे. जो बायडन अर्थातच या बैठकीला उपस्थित राहातील. परंतु, 2024 मध्ये अथवा त्यानंतर होणारी त्यांची औपचारिक भेट महत्वाची असेल.
दरम्यान, `द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध नियकालिकाने 17 ते 23 जून या सप्ताहासाठी प्रसिद्ध केलेल्या अंकाच्या मुखपृष्ठ बरेच काही सांगून जाते. त्यात वाघाशेजारी बसलेले मोदींचे गॉगल घातलेले चित्र व त्यासोबत ``अमेरिकाज न्यू बेस्ट फ्रेन्ड- व्हाय इंडिया इज इन्डिस्पेन्सिबल,’’ असा मथळा आहे. त्यात संपादकीयासह भारताविषयी चार लेख आहेत. ते वाचून ज्याने त्याने आपापले मत बनवायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.