Pegasus Book Authors Laurent Richard Sandrine Rigaud esakal
Blog | ब्लॉग

Pegasus Book : विरोध दडपण्यासाठी पाळतीचे अस्त्र

खादिया अशी पत्रकार आहे की जी सरकारविरोधात, नेत्यांच्या राष्ट्रप्रमुखाच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात आपली लेखणी निर्भयपणे चालवायची.

सकाळ डिजिटल टीम

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दमन, दडपशाहीसाठी कसा केला जातो, याची कल्पना हे पुस्तक वाचताना येते आणि ती कहाणी आपल्याला अस्वस्थही करते.

-प्राची कुलकर्णी

'तुमच्याकडे दोन फोन असतात. एक सगळ्यांना माहीत असलेला आणि एक अगदी खासगी निवडक लोकांना कल्पना असलेला.. हा फोन सुरक्षित म्हणून तुम्ही वापरत असता. नेमका हाच फोन असतो सरकारकडच्या हेरगिरी करण्यासाठी निवडल्या गेलेल्या यादीत.

खादिया इस्लामियोवा या अझरबैजानमधल्या (Azerbaijan) पत्रकाराच्या बाबतीत हेच झालं. ज्या फोनवरुन ती अगदी विश्वासातल्या लोकांशी बोलायची संपर्क ठेवायची, तोच फोन 'पेगॅसस'च्या यादीत होता. खादिया अशी पत्रकार आहे की जी सरकारविरोधात, नेत्यांच्या राष्ट्रप्रमुखाच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात आपली लेखणी निर्भयपणे चालवायची. अनेकदा धमक्या आल्यानंतरही तिने लिहिणे थांबवले नाही.

पण, हे सगळं प्रकरण धमक्यांपुरतंच मर्यादित नव्हतं. आवाज दडपण्यासाठी अनेक मार्ग वापरले जातात. अचानक खादिया हिला तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा 'खासगी क्षण' रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाठवला गेला. त्यानंतर तिने घरातले कॅमेरे शोधून काढून टाकले. असल्या प्रकारांना ती भीक घालत नाही आणि बघत नाही, हे पाहून हा व्हिडिओ थेट काही वेबसाइटवरुन प्रसारित करण्यात आला. तरीही खादिया नमली नाही. तेव्हा तिच्यावर पाळत ठेवली गेली ती थेट पेगॅसस सॉफ्टवेअर वापरून. अगदी ती सरकारच्या नजरकैदेत असतानाही ही पाळत सुरू होती.

जमाल खशोगी या पत्रकारावरही अशाच प्रकारची पाळत होती. त्यांची पुढे हत्याही झाली. खादिया इस्लामियोवावरचे संकट किती गंभीर होते हे यावरून स्पष्ट व्हावे. ही सगळी कहाणी पुढे आली ती पॅरिसमधल्या 'फॉविंडन स्टोरीज'च्या शोधपत्रकारितेतून. मेक्सिकोमधल्या ड्रग व्यवसाय आणि त्यातल्या हितसंबंधांवर काम करत असताना 'फॉविंडन स्टोरीज'च्या संस्थापक लॉरेन आणि सॅण्ड्रीन यांच्याकडे एक यादी आली.

'पेगॅसस' वापरून ज्यांच्यावर पाळत ठेवली जाते आहे, अशा लोकांची ही यादी होती. यात जगभरातल्या अनेक महत्वाच्या लोकांचे संपर्क क्रमांक होते. यादीत पत्रकार, मानवी हक्क संरक्षण कार्यकर्ते तर होतेच; पण त्याचबरोबर महत्त्वाच्या देशातले नेत्यांचेही क्रमांक या यादीत होते.

'फॉविंडन स्टोरीज'च्या या दोन पत्रकारांनी मग या विषयावर काम करायचं ठरवलं. साथीला 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल' सोबत काम करणारे दोन सायबर तज्ज्ञ आले. त्यांच्या मदतीने असे मोबाईल फोन ज्यांचे क्रमांक या यादीत आहेत, अशा लोकांशी संपर्क साधून त्याचं न्यायवैद्यक विश्लेषण (फॉरेन्सिक अॅनेलिसिस) करण्यात आलं.

अनियंत्रित पाळत

या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी होती की त्यासाठी 'वॉशिंग्टन पोस्ट', " 'गार्डियन' यासारख्या मोठ्या वृत्तसमूहापासून भारतातल्या 'वायर' सारख्या पोर्टलपर्यंत जगभरात काम करणारे पत्रकार एकत्र आले. अनेक महिने अडथळ्यांची शर्यत पार पडली आणि मग 'पनामा पेपर्स नंतरच्या जगभरातल्या पत्रकारांनी एकत्र येत केलेल्या शोधपत्रकारितेतून उघड झाली ती 'पेगॅसस'च्या माध्यमातून होणाऱ्या अनिर्बंध पाळतीची, हेरगिरीची कहाणी.

ही संपूर्ण गोष्ट, अगदी यादी मिळण्यापासून ते जगभरात एकाच वेळी ही 'पेगॅसस स्टोरी' प्रकाशित होण्यापर्यंतची गोष्ट, लॉरेन्ट आणि सॅण्ड्रीनने प्रस्तुत पुस्तकाच्या रुपाने समोर आणली आहे. विस्ताराने विवेचन केलेल्या 'पेगॅसस' या पुस्तकातून ही शोधपत्रकारिता कशी झाली ते तर आपल्याला वाचायला मिळतंच; पण ज्या कहाण्या प्रकाशित होऊ नये, असं त्या त्या सरकारांना वाटत असतं. तिथं काम करणाऱ्या पत्रकारांना कोणत्या अग्निदिव्यांना सामोरं जावं लागतं, याचीही मांडणी या पुस्तकात केलेली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दमन, दडपशाहीसाठी कसा केला जातो, याची कल्पना हे पुस्तक वाचताना येते आणि ती कहाणी आपल्याला अस्वस्थही करते. याबरोबरच 'पेगॅसस' निर्माण करणाऱ्या 'एनएसओ' या कंपनीचीही गोष्ट यात वाचायला मिळते. 'पेगॅसस'ची ही कहाणी आपल्या दृष्टीने महत्त्वाची यासाठी, की यातल्या ज्या देशांमध्ये 'पेगॅसस'च्या वापराचे आरोप झाले त्यात भारतही होता.

  • पुस्तक : पेगॅसस

  • लेखक : लॉरेंट रिचर्ड, सेंड्रिन रिगौड

  • प्रकाशक : मॅकमिलन पब्लिशर्स

  • पृष्ठसंख्या : ३३६

  • किंमत : ७५० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT