राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संकल्पक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज या कुशल राज्यकर्त्याच्या मागे आई जिजाऊ नावाचा भक्कम स्तंभ उभा होता. जिजाऊंनी बाल शिवाजीला रामायण, महाभारतातील शौर्यकथा ऐकवल्या अन् थेट रायरेश्वरावर शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला. जिजाऊंच्या शिवरायांवरच्या संस्कारा बद्दलचा इथपर्यंतचा सामान्यजनांचा सार्वत्रिक समज वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. परंतु शिवरायांची आई जिजाऊ
हेच एक वैचारिक, राजकीय, पुरोगामी, आधुनिक विचारांनी परिपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं; हा दृष्टीकोन इतिहासाच्या पुस्तकात धुसर राहिलेला दिसतो. महाराष्ट्रजणांच्या मनात जिजाऊंच्या सर्वांगी व्यक्तिमत्वाची ही धुसरता दुर होण्याचं काम राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.प्रकाश पवार यांनी लिहिलेल्या 'राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार' या पुस्तकाच्या निमित्ताने होत आहे. सकाळ प्रकाशनाकडून नुकताच हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला आला आहे.
मध्ययुगीन मराठा इतिहासात जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाची मांडणी अनेक ठिकाणी कथा कथात्मक स्वरुपात झालेली आढळते. डॉ.प्रकाश पवार यांनी मात्र जिजाऊंचा एकरेषीय जीवनपट न मांडता मुक्त अवकाशात जिजाऊंचे चरित्र या संशोधन लेखनातून उलगडले आहे. हा चरित्र ग्रंथ जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाच्या विविध छटांचा एकत्रित मिलाप आहे. जिजाऊंना मातृरुपातून बाहेर काढून तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी घडत असताना जिजाऊ विवेकी, वैचारिक, तर्कशुद्ध आधारांवर कशा पद्धतीने मार्गक्रमण करत गेल्या; हे डॉ.पवार यांनी ग्रंथात नोंदवले आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने चरित्रलेखनाचे नवे प्रारुप डॉ.पवार यांनी विकसित केले आहे.
लेखकाने या चरित्र ग्रंथाची विभागणी एकुण सहा विभागात केली आहे. भुमिका, पूर्वसूरी, जडणघडण, समतेच्या मूल्यांची पेरणी, स्वराज्य जडणघडण आणि स्थापना, चिरंतन प्रेरणा : जिजाऊ अशा सहा विभागात जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा डॉ.पवार यांनी घेतला आहे. जिजाऊंना वडील लखुजी जाधव यांच्याकडून मिळालेला वारसा, सासू उमाबाई यांनी जिजाऊंची केलेली जडणघडण स्पष्ट करत लेखक स्वराज्याच संकल्पनेची मुळे कुठपर्यंत असल्याचे वाचकाला दिशादर्शन करतात.
ग्रंथात प्रथमतः जिजाऊंच्या 'सर्वसमावेशक स्वराज्य' या संकल्पनेच्या प्रेरणांचा धांडोळा लेखक घेताना दिसतात. नैतिक अधिष्ठान असलेलं, समाजाभिमुख, पुरोगामी विचारांच, गतिशील, मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या स्वराज्य निर्मितीचा अट्टाहास पुर्ण करण्यासाठी जिजाऊंनी दिलेल्या योगदानाची चर्चा हे या पुस्तकाचं महत्वाचं वैशिष्ट्य दिसतं.
जिजाऊंचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग, त्यांच्यातील राजकीय नेतृत्वासाठीची पात्रता तसेच जिजाऊंच्या अंगी असणारे कुशल प्रशासकाचे गुण शहाजीराजांनी हेरुन जिजाऊंच्या या व्यक्तिमत्वास त्यांनी अधिमान्यता देत पाठिंबा दर्शवल्याचे लेखक नमुद करतात. शहाजीराजे व जिजाऊं मध्ये मानवी प्रेमा सह एकमेकां बद्दलचा आदर भाव व्यक्त करणारी सखा-सखी ही संकल्पना डॉ.पवार अनोख्या पद्धतीने ग्रंथात व्यक्त करतात.
जिजाऊंनी सती प्रथा, अंधश्रद्धा, कालबाह्य परंपरांना आपल्या विवेक बुद्धीने नाकारल्या. हिंदवी स्वराज्यात सामाजिक पुनर्रचनेचा अनोखा प्रयोग जिजाऊं साकारला. याच मूलगामी कार्य कृती वर प्रकाश टाकण्याची नव दृष्टी डॉ.पवार या चरित्रातून देतात. जिजाऊं या सृजनशील होत्या. कृषीजन संस्कृतीला व्यापक करण्याचे विविध प्रयत्न जिजाऊंनी केल्याच्या नोंदी या ग्रंथात नमुद आहेत. जिजाऊंच्या 'जगदंब' या भक्ती संकल्पनेचा मार्मिक अर्थ न्याय, आत्मबळाची उदात्त चेतना लेखक अधोरेखित करतात. जिजाऊंची भक्ती परंपरां शंकर महादेवशी, वारकरी परंपरेशी कशी निगडित आहे, याचा शोध आणि बोध डॉ.पवार प्रस्तुत चरित्रात घेतात.
जिजाऊंचे कार्य हिंदुत्वाच्या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. या चौकटीच्या बाहेर जावून विवेचन करण्याचा प्रयत्न या ग्रंथात दिसतो. भाषा, धर्म, जातिसंस्था इत्यादी संदर्भात जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा असल्याची अनेक उदाहरणे डॉ.पवार नोंदवतात. सर्व धर्म समभाव, धर्म स्वातंत्र्याचा पुरस्कार करत जिजाऊंनी हिंदू - मुस्लिम सलोख्याला अग्रक्रम दिला. जिजाऊंच्या धारणेत हिंदवी समाजाचा मुख्य आधार हा सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता असल्याचे डॅा.पवार अधोरेखित करतात. जिजाऊ, शिवराय या दोघांनीही धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मान्य होता. त्यांनी सर्व धर्मांचा दर्जा सारखा मानला असल्याचे निरिक्षण लेखक नोंदवतात.
पाण्यावर सर्व जाती धर्माच्या लोकांचा सामाईक व समान अधिकार देवून जिजाऊंनी पाण्याचे न्याय वाटप करुन समतेचा क्रांतिकारी संदेश लेखकांनी समोर आणला आहे. जिजाऊंनी सर्वांना सोबत घेत सकलजनवादी स्वराज्याचा पाया रचला. इतिहासात झाकोळलेल्या अनेक संदर्भाचा आश्चर्यकारक धांडोळा लेखकाने घेतला आहे. पितृसत्तात्मक लेखन पद्धतीच्या पलिकडे जात जिजाऊंचे आदर्श प्रारुप, वैचारिक जीवनपट मांडण्याचा प्रयत्न डॉ.प्रकाश पवार यांनी या चरित्र लेखनातून केला आहे.
स्वराज्याचे सार्वभौमत्व, स्वराज्याला अधिमान्यता, प्रजेचे कल्याण, स्वातंत्र्य, स्वशासन, समता, न्याय, सहिष्णुता, सामाजिक सलोखा या सकलजनवादी मूल्यांचा वारसा जिजाऊंनी दिलेला आहे. हा वारसा समजून घेण्यासाठी प्रा.डॅा. प्रकाश पवार लिखित ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ हा ग्रंथ महत्वाचा ठरेल.
( लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे संशोधक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.