काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकली आहे. या यात्रेदरम्यान पार पडलेल्या एका सभेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यासह देशभरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व वादात राजू परुळेकर यांचा एक जुना ब्लॉग पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यात प्रबोधनकार ठाकरे यांनी सावरकरांवर नेमकं काय म्हटलं होतं यावर भाष्य करण्यात आले आहे. परूळेकरांचा05-01-2020 ब्लॉग खास सकाळच्या वाचकांसाठी आहे त्या शब्दांत.
विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल लिहिताना आणि बोलताना दोन ऐतिहासिक चुका सुधारल्या पाहिजेत. त्यातली पहिली चूक म्हणजे त्यांच्या हालअपेष्टांचे उदात्तीकरण. या हालअपेष्टांचे उदात्तीकरण करण्याचे कारण नाही, कारण सावरकरांनी हा मार्ग स्वत:च चोखाळला होता आणि त्यांच्याप्रमाणेच इतर सर्वच क्रांतिकारकांनीही. एकदा आपल्या आयुष्यातल्या पर्यायांची निवड आपण केली की त्याला आपणच जबाबदार असतो, ह्याची जाणीव सावरकरांना असणारच आणि त्यामुळे आपणही ती जाणीव ठेवण्याची गरज आहे. सावरकरांना कुणी साधं आयुष्य स्वीकारल्यामुळे अंदमानात पाठवले नव्हते. ना लोकांनी ना ब्रिटिश सरकारने. त्यांनी स्वीकारलेल्या आयुष्याचा तो अपरिहार्य भाग होता.
सावरकरांच्या मूल्यमापनातील दुसरी चूक आपण टाळली पाहिजे, ती म्हणजे सावरकरांची तुलना आपण त्यांच्या समकालीन किंवा आजच्या कोणत्याही साधेसरळ आयुष्य जगणाऱ्या माणसांशी करता कामा नये. तसे न करता त्यांच्याप्रमाणेच ज्यांनी क्रांतिकारी आयुष्य निवडले होते, त्यांच्याशीच त्यांची तुलना करायला हवी. एखाद्या क्रांतिकारकाची तुलना त्याच्यासारखेच क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसैनिकाचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीशी होऊ शकते, एअर कंडिशनमध्ये बसून लिहिणाऱ्या व्यक्तीशी नव्हे. या बाबतीत अश्या तुलनेने नंतर सावरकरांना फारसे गुण देता येत नाहीत, हेच खरे सत्य आहे.जरी त्यांच्या भक्तांना आवडलं नाही तरीही. सर्वसाधारणपणे सावरकरभक्त मुद्दाम सावरकरांची तुलना तुलनेने शांत जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी करतात.
वास्तवात, सावरकरांच्या सोबत, अगोदर आणि नंतरही शेकडो स्वातंत्र्यसैनिक अंदमानातील सेल्युलर तुरुंगात मारले गेलेत, अनेकांचे छळ झाले. यातले बहुतेक बंगाल प्रेसिडन्सी आणि बंगाल प्रांतातील होते. समकालीन तिथे दहदंडाने गेले त्यांची संख्या साधारणपणे 173 होती. इतर हजारो शिक्षा भोगत मेले. संन्यालसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना तर दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इतरही अनेकांचा अपरिमीत छळ झाला. परंतु त्यातल्या कोणीही ब्रिटिशांकडे माफी मागितली नाही, त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाही आणि यातल्या कोणाचीही सुटका झाली नाही.
1,हृषीकेश कांजीलाल 2.बरेंद्र घोष 3. नंद गोपाळ 4. विनायक सावरकर 5. सुधीरकुमार सरकार या क्रांतिकारकांनी 1913 मध्ये दया याचिका केली होती. सावरकरांची ही दुसरी दया याचिका होती. (ज्या याचिकेत 1911 साली अंदमानमध्ये आल्यावर अवघ्या सहा महिन्यात सावरकरांनी केलेल्या दया याचिकेचा उल्लेख आहे.) वरील पाच कैद्यांपैकी फक्त सावरकर आणि बरेंद्र घोष यांनी आपला क्रांतिकारक भूतकाळ पुसून टाकण्याची विनंती केली. इतर तिघांनी फक्त मानवतावादी वागणूक मिळावी अशी मागणी केली. त्यातही फक्त सावरकरांनी पुढे संपूर्ण आत्मसमर्पण केलं. याचे सारे रेकॉर्ड्स ब्रिटिशांनी स्वातंत्र्यानंतर खूप काळाने हळुहळु खुले केलेत.
याचा एक सरळ परिणाम असा झाला की, यातल्या असंख्य ब्रिटिशांसमोर माफी न मागणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणीही स्वत:च्या छळाच्या कहाण्या बोलून किंवा लिहून सांगू शकले नाहीत. स्वातंत्र्यासाठी खरेखुरे बलिदान दिलेले अनेक जण अनाम राहिले त्याचे हेही कारण होते. सावरकरांपेक्षा अनन्वित छळ सहन करणारे इतर सर्व क्रांतिकारक तुरुंगात होते, पण त्यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागून आपली सुटका करून घेतली नाही आणि परत येऊन ते स्वत: आपले चरित्र, स्वत:चे ‘काळे पाणी’ लिहू शकले नाहीत. ना त्यांना तिकडे कुणी चरित्रकार भेटला. त्यामुळे संन्याल असो किंवा इतर कोणताही राजबंदी; ज्यांनी ५० -५० वर्षं छळ सोसला, त्यांची बलिदानकथा आपल्यापर्यंत पोहोचूच शकली नाही.
आता यावरही एक असा मुद्दा सावरकरभक्तांकडून पुढे केला जातो, की ‘माफी मागणे’ हा सावरकरांचा गनिमी कावा होता. मुळात, गनिमी काव्यासाठी कुणी पाच वेळा माफी मागत नाही. सावरकरभक्त नेहमी खुबीने सावरकरांचा ब्रिटनमधला एकच माफीनामा पुढे करतात, पण सावरकरांनी प्रत्यक्षात पाच माफीनामे दिले होते.त्यातला पहिला १९११ साली (ज्याची प्रत नष्ट झाली आहे, पण ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत), दुसरा १९१३ साली ज्यात पहिल्या माफ़ीनाम्याचा स्वतः उल्लेख केलाय, तिसरा १९१४ साली (ज्यामध्ये सावरकरांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली होती.), चौथा १९१९ साली, तर शेवटचा आणि पाचवा माफीनामा सावरकरांनी मार्च १९२० मध्ये दिला.
सावरकरांच्या या पाच माफीनाम्यानंतर सहावा माफीनामा त्यांची पत्नी यमुनाबाई यांनी १८ एप्रिल १९२१ रोजी दिला. ज्या साऱ्याची दखल घेऊन शेवटी ब्रिटिशांनी सावरकरांची सुटका केली. ज्यामुळे ब्रिटिश सरकारचीही अखेर सावरकरांच्या माफीनाम्यांच्या सिलसिल्यापासून सुटका झाली.माफी मागण्याचा हा तथाकथित गनिमी कावा म्हणजे सावरकर बाहेर आल्यावर पुन्हा क्रांतिकारकांच्या किंवा स्वातंत्र्याच्या कार्यात गुंतले असते तर त्याला गनिमी कावा म्हणणे कदाचित योग्य ठरले असते. पण सावरकरांनी बाहेर आल्यावर ना ब्रिटिशविरोधी कोणत्याही कृतीत आपला सहभाग नोंदवला, ना अशा कृतीला उत्तेजन दिले. उलट भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिशांनाच सहकार्य केले.
सावरकरांनी बाहेर येण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण केले होते.एवढेच नव्हे, ब्रिटिश राजवटीचे प्रेम,आदर,आणि परस्पर मदतीचे संबंध प्रस्थापित करण्याचे नम्र प्रयत्न करण्याचे लेखी दिले.“Such an empire as is foreshadowed in the proclamation wins my hearty adherence” म्हणजे “उद्घोषणेत पूर्वचित्रित अशा या साम्राज्याचे मी मनापासून पालन करतो” या शब्दात सावरकरांनी संपूर्ण आत्मसमर्पण केलंय.
पुढे तर ब्रिटिशांना हवी तशी द्विराष्ट्रवादाची संकल्पना जिनांच्या कितीतरी अगोदर सावरकरांनी १९३५ च्या हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनात मांडली आणि अखंड भारताच्या विभाजनाचा मार्ग ब्रिटिशांना मोकळा करून देण्यास मदतच केली. त्यामुळे सावरकरांच्या माफीनाम्याचा सिलसिला हा गनिमी कावा अजिबातच नव्हता.ते संपूर्ण कळवळून केलेलं आत्मसमर्पण होतं. इतर शिक्षा भोगत असणाऱ्या क्रांतिकारी सहप्रवाशांशी प्रतारणाच ती.
सावरकरभक्त सावरकरांचे उदात्तीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेत नाही. ती म्हणजे सावरकरांचे सहकारी क्रांतिकारक माफी न मागितल्यामुळे बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे आपला छळ ते मांडू शकले नाहीत, सांगू शकले नाहीत. त्यांच्या झालेल्या या छळावर सावरकरांच्या माफीनाम्यांने मिळवलेला हा “विजय” आहे.
सावरकर तुरुंगातून बाहेर आल्यावर १९२६ मध्ये सावरकरांचे उदात्त चरित्र (आत्मचरित्र नव्हे!)‘द लाइफ ऑफ वीर सावरकर’ हे पहिल्यांदा बाजारात आले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. अनेक वर्षांनंतर उघड झाले, की या चरित्राचा मूळ लेखक चित्रगुप्त हे दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सावरकरच होते. सावरकरांबरोबर तुरुंगात असणारे पण बाहेर न येऊ शकणारे इतर क्रांतिकारक आपली कथा कसे सांगू शकणार किंवा आपले चरित्र कसे लिहू शकणार?हे चरित्र वाचावे असेच आहे. वीर चित्रगुप्त!सावरकरांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदूराष्ट्रा’ची एक नवीन फुटीर कल्पना उभी केली, ज्यामध्ये भारतीय मुस्लिमांना सावरकरांनी खलनायक म्हणून रंगवले.
वास्तवात, भारतीय मुसलमानांनी एकंदरीत स्वातंत्र्ययुद्धात कित्येकदा सावरकरांपेक्षा अधिक बलिदान करून हातभार लावला होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत मृत्यू पावलेल्या राजबंदींची नावे वाचतानाही आपल्या हे सहज लक्षात येते. परंतु ब्रिटिशांना मदत करताना हिंदू उच्चवर्णवादाचा झेंडा फडकवत ठेवणारी संघटना उभी करणे, हे सावरकरांना क्रमप्राप्त झाले होते. सावरकरांना ते नेमके कशा पद्धतीने साध्य करायचे होते, हे १९४८ मध्ये तत्कालीन लेखक आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा) यांनी आपल्या लेखामध्ये लिहून ठेवले असल्याचे सदानंदराव मोरे यांनी लिहिलेले आहे. मोरे यांनी आपल्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात केशव सीताराम ठाकरे यांचे उतारे सुयोग्य स्पष्टीकरणासह दिलेले आहेत…
प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ‘‘मराठी क्रांतिकारक तात्याराव सावरकर यांनी सन १९०८ मध्ये (म्हणजे ऐतिहासिक सत्याला मुरड घालून इतिहासाची चैतन्यप्रेरक कादंबरी किंवा काव्य बनवण्याचे आणि हिंदवी अथवा ब्राह्मण वीरवीरांगनांच्या अंगी असतील-नसतील ते सारे सद्गुण चिकटवून, त्यांना ‘अप टु डेट’ राजकारणी जाणिवेचे देशभक्त बनवण्याचे युग चालू असताना) लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाच्या कालपरवाच्या पुनर्जन्मापासून तर तो प्रकार पुन्हा बेगुमान नाचू लागला आहे.’’
ठाकरे यांचा कटाक्ष सावरकरांनी राष्ट्रीय इतिहासाच्या लेखनातून केलेल्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या उदात्तीकरणावर आहे, हे वेगळे सांगायला नको. या देशभक्तांच्या बलिदानाबद्दल ठाकरे आदर व्यक्त करतात. पण त्यांचा लोकसत्ताक राज्य स्थापण्याचा इरादा होता, अशा अनैतिहासिक मांडणीवर ते आक्षेप घेतात. हाच आक्षेप ते वासुदेव बळवंत व खुद्द सावरकरांच्या ‘अभिनव भारत संस्थे’वरही घेतात.
आणखी एक मौज म्हणजे सावरकरांनी आपल्या या ग्रंथात रंगो बापूजी या चांद्रसेनीय कायस्थ प्रभूला ब्राह्मण बनवला. त्याचाही समाचार ठाकरे घेतात. सावरकरांनी ही गोष्ट नजरचुकीने झाल्याचा खुलासा केला, हा भाग वेगळा. पण तरीही त्यांचे खाजगी चिटणीस दामले यांनी, ‘यापूर्वी ठाण्याच्या आठवले यांनी ही चूक निदर्शनास आणली होती, परंतु पुढे छापखान्यात मजकूर गेल्यावर काय भानगड झाली न कळे!’ असे ठाकरे यांना कळवले. त्यावर ठाकरे यांची प्रतिक्रिया, ‘सगळ्याच भानगडी! त्यात या भानगडीचे काय एवढेसे?’
ठाकरे यांच्या मते ‘‘आम्ही सांगू तोच खरा इतिहास, ठरवू तोच प्राणी देशभक्त, आमचेच पंचांग लोकमान्य, स्वदेशाभिमान काय तो आम्हांला ठावा, आम्हीच तो गावा नि इतरांना सांगावा, ब्राह्मणेतर कधीच गेले नाहीत त्या गावा, असा जो कांगावा या दांभिक हिंदुत्वनिष्ठांच्या ‘राष्ट्रीय’ ठणठणाटात दिसून येतो, त्यात सत्याभिमान, इतिहासभक्ती, साहित्यसेवा, हिंदूंचा उद्धार, लोकशाहीची विवंचना वगैरे काहीही नसून मयत पेशवाईच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुनरुद्धाराचा दुर्दम्य अट्टहास मात्र दिसून येतो.’’
पूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि गांधींच्या चळवळीत काय भेद आहे, हे स्पष्ट करताना ठाकरे लिहितात, ‘‘वासुदेव बळवंतांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय, अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय, एकजात सारे ब्राह्मणच होते. खरा हिंदुस्थान शहरात नसून खेड्यापाड्यांत आहे. तो शेतकरी, कामकऱ्यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय या शहरी शहाण्यांच्या पोशाखी चळवळी फुकट आहेत, हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनवण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरदस्त शक्ती कशी बनली, हा इतिहास तुमच्या-आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही.
”सावरकरांच्या कल्पनेतेले हिंदू राष्ट्र हे वरवर पाहता चार्तुवर्णविहीन वाटले, तरी पूर्णत: ब्राह्मणवादप्रधान हिंदू राष्ट्र होते, कारण सावरकरांनी नेहमीच डार्विनच्या ‘बलिष्ठ तोच टिकेल’ या सिद्धांताला समाजशास्त्राच्या दृष्टीने बरोबर मानले होते आणि हिंदूराष्ट्राला ते लागू केले होते. इटलीमध्ये फॅसिझम, जर्मनीमध्ये नाझीझम, भारतात रा. स्व.संघ आणि सावरकरांची हिंदू महासभा या डार्विनच्या जीवशास्त्रीय सिद्धांताला समाजशास्त्रीयदृष्ट्या लागू करणाऱ्या संघटना. अशा वेळेला हिंदू राष्ट्रामध्ये बलिष्ठ म्हणजे टिकला पाहिजे म्हणजे ब्राह्मणवादी उच्चवर्णीय तोच टिकेल. कारण यात ‘इक्विटी’ आणि ‘इक्वॅलिटी’ला वावच नाही. बहुजन आणि दलित कसा टिकेल? एवढेच नव्हे, तर यात मानवतेलाही वाव नाही. किंबहुना ‘Urban Brahmanism’ स्थापन करणे, हाच त्यांचा खरा उद्देश होता.
हिंसा त्या तत्वज्ञानात वर्ज्य नव्हती. परंतु, सावरकरांनी जे हेरले आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे उचलले व राबवले ते फार भयंकर होते.भारतात हूण, शक यांच्यापासून ते बौद्ध धर्मापर्यंत आलेल्या सर्व धर्मांना हिंदू ब्राह्मणवादाने आपल्या पंखाखाली घेतले आणि स्वतःत जिरवून टाकले. आपल्या जातिवादाच्या उतरंडीत त्यांचा नाश करून टाकला. परंतु, प्रथमच ‘Abrahmanic Religions’ने ब्राह्मणवादी हिंदू नेतृत्वाची गोची करून टाकली होती. सुरुवातीला मुस्लिम धर्माने आणि नंतर ख्रिश्चन धर्माने. पैकी ख्रिश्चॅनिटी हा ब्रिटिशांचा धर्म असल्यामुळे सावरकरांना त्याविरोधी काही करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुस्लिमविरोधी बोलणे, करणे हेच सोयीचे होते, उपयुक्त होते आणि ब्रिटिशांच्या सेवेचे साधनही होते (ज्यातून ब्रिटिशांना हवी होती ती द्विराष्ट्रवादाची संकल्पना जोपासणे शक्य होते).
आज आरएसएस-भाजप सरकारचे नेमके हेच झाले आहे. हिंदू ब्राह्मणवादाची सत्ता स्थापन करण्याकरिता ख्रिश्चॅनिटी आणि मुस्लिम धर्म हेच दोन अडथळे तेव्हाप्रमाणेच आजही आहेत. अमेरिका आणि बहुतेक पाश्चिमात्त्य देशांचा धर्म ख्रिश्चॅनिटी असल्यामुळेच फक्त मुस्लिमांना ‘सॉफ्ट टार्गेट’ करणे हेच आज भारतात सुरू आहे.
सावरकरांच्या काळात सावरकरांनी जातीभेदविरहीत हिंदू समाज निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला ती त्यांची ऐतिहासिक अपरिहार्यता होती, तीच अपरिहार्यता आरएसएसची आजही आहे. कारण अगोदर हूण, शक यांच्यापासून ते बौद्धधर्म आपल्यामध्ये रिचवण्याची ताकद हिंदू ब्राह्मणवादाने निर्माण केली आहे ती ताकद एक पवित्र पुस्तक, एक प्रेषित असलेल्या आणि एकसंध असलेल्या ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामपुढे तोकडी पडली. याचे एक कारण म्हणजे हिंदू धर्मातील जातीयवादाची उतरंड हा एक मोठा कमकुवतपणा होता.शिवाय हिंदू धर्मात एक प्रेषित व एक पवित्र पुस्तक असे काही नाही. किंबहुना तो एकसंध धर्मच नाही. चार वेद, दहा उपनिषदे व भगवत गीता अशी पुस्तके आणि चर्वाक ते अष्टावक्रपर्यंत अनेक प्रेषित पुरुष हे एकीकडे सनातन सौंदर्य होते. त्याचा हिंदू धर्म होताना मनुस्मृतीरचित जीवनपद्धतीच्या आखणीमध्ये जातीयवादाची अमानुषता त्यात शिरली.
जातीयवादात हिंदू धर्म हा ब्राह्मणवर्चस्ववाद मानणारा पुरुषप्रधान धर्म बनला. बौद्ध धर्माचे आव्हान जेव्हा त्याच्यासमोर उभे राहिले, तेव्हा ब्राह्मणांनी आपल्या जीवनपद्धतीत अनेक बदल केले. ते अगोदर मांसाहारी होते, जे नंतर शाकाहारी झाले. बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला आणि बौद्ध धर्माला रिचवून टाकला. सावरकरांच्या लिखाणात बौद्ध धर्म विरोधाच्या खुणा दिसतात, ज्याचे कारण मुळात बौद्ध धर्माने हिंदू धर्मातल्या ब्राह्मणवादाला या भूमीत दिलेले आव्हान हेच होय. त्याचे तपशील सावरकरांनी हिंसा-अहिंसा असे काहीही दिलेले असो. त्यानंतर सावरकरांनी समोरासमोरचा शत्रू मानला, तो इस्लामला. सावरकरांची जातिभेदाच्या निर्मूलनाची गरज ही फक्त उपयुक्ततावादी होती. यामागे कोणतीही मूलगामी प्रेरणा त्यांना खुणावत नव्हती. त्यामुळे दलितांसाठी मंदिर बांधणे किंवा तत्सम बाबी, त्यांनी केलेल्या सुधारण ह्या मूलगामी सुधारणा नसून त्यात केवळ उपयुक्ततावाद होता.
१९४८ साली प्रबोधनकार ठाकरे यांनी सावरकरांबद्दल जे वर लिहिलेले आहे, त्यामध्ये १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहिण्यापासून हिंदू धर्मातील ब्राह्मण्यवादाचे उदात्तीकरण करणे हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्याहीपलिकडे जाऊन सावरकरांच्या संपूर्ण राजकीय लेखनात आणि वर्तनात जो साध्यशुचितेचाही अभाव दिसतो तोही निव्वळ उपयुक्ततावादी आहे. उदा. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात सावरकर सरळ सरळ शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचे समर्थन करतात आणि तसे आपल्या शत्रूंच्या बाबत न केल्याबद्दल आणि शत्रूच्या गोटातील स्त्रियांना सन्मानाने वागविल्याबद्दल ते चक्क छत्रपती शिवाजी महाराजांना दोषही देतात. कल्याणच्या सुभेदाराच्या ज्या सुनेला शिवाजी महाराजांनी परत पाठवले, तिच्याबद्दल सावरकरांनी असा उल्लेख केलेला आहे.
शत्रूच्या स्त्रियांना पळवणे आणि त्यांच्यावर बलात्कार करणे हा परोधर्म आहे, असे सावरकर रावणाचा दाखला देत नमूद करतात. त्यामुळे सावरकरांना स्त्रियांवरील बलात्कारापासून रावणापर्यंत साध्य म्हणून काहीही चालत असे. त्यांच्या लिखाणात त्यांनी हे खुलेपणाने लिहिलेले आहे. त्यांनी स्वत:चेच चरित्र टोपणनावाने लिहिले, हाही त्याचाच एक भाग होय. साध्यसाधनशुचिताही त्यांनी कस्पटासमान मानली. त्यांचे साध्य काय होते? तथाकथित हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे कोणाचे राष्ट्र तर बलवानांचे राष्ट्र. साधा तर्क जरी बांधला तरी हिंदूंमधील सर्वात बलवान कोण? तर स्वाभाविकपणे ब्राह्मण. ब्राह्मणांनी वेळोवेळी स्वत:मध्ये बदल करून इतरांना रिचवले त्याचप्रमाणे आताही तेच करावे आणि न जिरवता येणाऱ्या इस्लामला आपला शत्रू मानावे, हे सावरकरांचे तत्वज्ञान. साधन म्हणून विज्ञाननिष्ठता, हिंसा, बलात्कार हे सर्व सावरकरांना मान्य होते, जे सावरकरांनी स्वत: लिहून ठेवलेले आहे.
हिंदू धर्मातील जाती निर्मूलन हे सावरकरांचे उपयुक्ततावादी साधन होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मानवतावादी साध्य नव्हते, हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजे आज आरएसएस आणि भाजप ‘सावरकर-सावरकर’ का करते, ते आपल्या लक्षात येईल. सावरकरांच्या लेखनातील आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेतील झेपणार नाहीत, अशा गोष्टी बाजूला काढून आरएसएस आणि भाजपने ‘उपयुक्त सावरकर’ आपले अंतिम मार्गदर्शक म्हणून निवडलेले आहेत.
आरएसएस आणि भाजपला हिंदू ब्राह्मणवादी राष्ट्र बनवायचे आहे आणि त्याच वेळेस कोणत्याही प्रकारची साध्यसाधनशुचिता किंवा विवेक बाळगायचा नाही, हे सावरकरांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला साजेसे आहे. सावरकरांप्रमाणे आपण जातिभेद पाळत नाही, असे आरएसएस म्हणते पण वास्तव काय आहे, ते आपण सारेच जाणून आहोत. शत्रूच्या क्रमामध्ये ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्राच्या निर्दालन निकड तक्त्यामध्ये प्रथम मुस्लिम येतात, नंतर दलित, त्यानंतर बहुजन येतात. या सर्वांना साध्यसाधनशुचिता न बाळगता गावकुसाबाहेर ढकलणे, हे हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे थोडक्यात सार आहे. ज्याचे प्रॅक्टिकल सावरकर स्वत: कधी करू शकले नाही, ते आज चालू आहे.
एकीकडे आत्ता भाजपाला जो सावरकरांचा पुळका आलेला आहे, तो संधीसाधूपणाचा आहे. हा संधीसाधूपणा स्वत: सावरकरांच्या संधीसाधूपणाएवढाच बेमालूम आहे.वास्तवात सावरकर हयात असताना संघाने, तत्कालिन जनसंघाने (आताच भाजप) त्यांचा छुपा द्वेष केला, त्यांच्या लेखनाची आजतगायत हेटाळणी केली आहे. आताचे देशातील सरकार, आताचा मोदीकाळ, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांचा सावरकरांशी तसा वरवर पाहता अर्थाअर्थी संबंध नाही. पण आंतरिक संबंध अत्यंत घट्ट आहे. केवळ हिंदुत्व म्हटले म्हणजे सावरकर नव्हे. सावरकर हे “विज्ञाननिष्ठ हिंदुत्त्ववादी” असल्याचा त्यांचा स्वत:चा दावा होता.
सावरकरांचा गोमूत्र, गाड्या शेणाने सारवणे, भगवे कपडे घालून मंदिरात पूजा करणे, ढोंगी बुवाबावांना पदावर बसवणे, कोणालाही साधु-साध्वीची उपमा देणे ह्याचा तिटकारा होता, भले तो उपयुक्ततावादी असेल. गायीला तर सावरकरांनी कधीच माता मानले नाही. अंधश्रद्धेने जखडलेल्या सनातन धर्माला आणि चार्तुर्वणाला सावरकरांनी कधीच आपलेसे मानले नाही. याचे मुख्य कारण साधनांच्या दृष्टीने सावरकरांना अशा हिंदू धर्माची उपयुक्तता वाटत नव्हती. याउलट, गर्दी गोळा करण्याकरिता अशा भ्रामक धर्माच्या अफूची उपयुक्तता जास्त आहे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी राहिलेली आहे.
संख्यात्मक हिंदू हा कर्मकांडाने गोळा करता येतो, तथाकथित विज्ञाननिष्ठा तिथे उपयोगाची नाही हे संघाने सावरकरांच्या हयातीतच ओळखले. त्यामुळे सावरकरांच्या तत्वज्ञानातली निष्ठुरता आणि वर्णवर्चस्ववादातील छुपी संकल्पना संघ आणि भाजपने उचलली, जी आज त्यांना “हिंदूराष्ट्रा”च्या उभारणीसाठी उपयुक्त आहे. सावरकरांनी अंदमानोत्तर आयुष्यात हिंदूंमधील चार्तुवर्णाला विरोध केला.
परंतु, त्यांच्या लेखनातील निष्ठुरता, पुरुषप्रधानता, साध्यसाधनशुचितेला नाकारणे या साऱ्या गोष्टी हिंदू वर्णवर्चस्ववादी म्हणजेच ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्राकडेच नेणाऱ्या आहेत. त्याला समतेची दिशा नाहीच. शिवाय, सावरकरांची विज्ञाननिष्ठता ही मूल्याधिष्ठीत नसल्यामुळे आधुनिक जगामध्ये आणि मानवी अधिकारांमध्ये तिचे अस्तित्व अत्यंत धोकादायक बनते.
सावरकरांना आज भारतात राज्य करणाऱ्या नेत्यांप्रमाणेच (स्वतःच्या वगळता)मानवी अधिकारांबाबत कोणत्याही प्रकारची जाणीव नव्हती. त्यांच्या संपूर्ण लेखनात ते दिसून येत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावरकर हे मराठीतील लेखक होते, कवी होते आणि नाटककारही होते. परंतु, करुणा नसल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातील लेखन हे जड व शुष्क होते. त्यांच्या कवितांना गीते म्हणून मान्यता मिळाली, ते मंगेशकर कुटुंबीयांचा परिसस्पर्श झाला त्यामुळेच.त्यातील शुष्कता मंगेशकरांच्या संगीतरसाने ओथंबून गेली.
आज वास्तवात आपल्या डोळ्यासमोर पुरुषप्रधान, इस्लामविरोधी, उच्चवर्णवर्चस्ववादी कायदे आणि त्याची विवेकहीन अंमलबजावणी सुरू आहे. तो सावरकरांच्याच तत्वज्ञानाचाच एक भाग आहे. हेच सावरकरांचं स्वप्न होतं.सावरकरांच्या आयुष्यामध्ये दया, क्षमा, करुणा, शांती आणि अहिंसा या मूलभूत मानवी मूल्यांना शून्य स्थान होते. याउलट, छद्म, कपट, बळ, हिंसा आणि निष्ठुरता यांचा त्यांनी वारंवार गौरव केलेला आढळतो. मग आज संघाला आणि भाजपला ते आपले जवळचे वाटले, तर ते आश्चर्य काय? म्हणूनच सावरकर आज भाजप व आरएसएसला हवे आहेत.
सावरकरांनी अंदमानातून सुटून आल्यावर ब्रिटिशांना कायम सहकार्य केले (त्यावरून ब्रिटिशांची पाच वेळा माफी मागणे हे गनिमी कावा नव्हते, हे सिद्ध होते). एवढेच नव्हे, तर भारताच्या फाळणीला बॅ. महमद अली जीना यांच्याएवढाच हातभार लावला. जे सावरकरभक्त आज गांधीजींची हेटाळणी करतात, त्या गांधीजींनी फाळणीला खरे तर विरोध केला आणि दया, क्षमा, करुणा, शांती आणि अहिंसा या मानवी मूल्यांना भारतीयांच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान मिळवून दिले.
गांधीजींनी मानवी आयुष्यामध्ये उच्च दर्जाच्या साध्याकरिता साधनेही महत्त्वाची असतात, साध्यसाधनशुचितेएवढे काहीच पवित्र नाही, हे शिकविले त्या गांधीजींची हत्या सावरकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि दिगंबर बडगे वगैरेंनी केली. स्वत: सावरकर नंतर सुटले असले, तरी ते गांधीहत्येत आरोपी होते. सर्व हिंदुत्ववादी शक्तींचे गुणअवगुणांचे मूळ पुरुष सावरकरच होत. सावरकर आणि त्यांचे हे सर्व सहकारी, संघातील सर्व समविचारी हे उच्चवर्णीय, उच्चशिक्षित हिंदू होते.
आपण काय करत आहोत, याची पूर्ण जाणीव त्यांना होती (जशी बाबरी मशिद पाडणाऱ्यांना होती!). त्या अर्थाने गेली ७० वर्षे भारतात राज्य करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांनी, विचारांनी, नेत्यांनी सावरकर आणि संघविचाराबद्दल एकंदरीत भयंकर भोळसटपणा दाखवला, त्यामुळे आज देश संघाच्या राज्यात (संघराज्यात नव्हे!) आणि सावरकरांच्या छायेत बेभरवशाचे आयुष्य जगत आहे.
( सौजन्य- प्र. ग. )
राजू परुळेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.