Biden-Putin news sakal
Blog | ब्लॉग

रशिया आणि अमेरिका संघर्षाच्या उंबरठ्यावर?

- विजय नाईक

युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया व अमेरिका यांच्यातील शाब्दिक संघर्ष टिपेला पोहोचला आहे. त्याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात होणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. मार्च 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा लचका तोडून क्रिमिया गिळंकृत केला, तेव्हापासून युक्रेनची गळचेपी करीत त्यावर आक्रमण करण्याची तयारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन करीत आहेत. आठ वर्षानंतर युक्रेन सीमेवर गेल्या काही महिन्यापासून ऱशियाचे एक लाखापेक्ष अधिक सैन्य युद्धाच्या पवित्र्यात उभे असून, युक्रेनच्या दिशेने केव्हाही जाण्याची शक्यता आहे.

पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघापासून अलग झाल्यानंतरही त्यावरील रशियाचा राजकीय प्रभाव कमी झाला नाही. उलट, कशा प्रकारे युक्रेनची कोंडी करता येईल, याचे अनेक आराखडे पुतिन यांनी गेल्या काही वर्षात आखले. सोव्हिएत महासंघापासून अलग व स्वतंत्र झाल्यापासून अनेक देश नाटोचे (नॉर्थ एटलँटिक अलायन्स ऑर्गनायझेशन) सदस्य झाले, त्यामुळे त्यांना संघटनेचे अभय मिळाले. तथापि, युक्रेन अद्याप सदस्य झालेला नाही व कोणत्याही परिस्थितीत तो सदस्य होऊ नये, असे पुतिन यांचे प्रयत्न आहेत. कारण, नाटोच्या सदस्यांपैकी कोणत्याही सदस्य राष्ट्रावर आक्रमण झाल्यास ते नाटोवरील आक्रमण समजून आक्रमण करणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करण्याचा अधिकार नाटोने राखून ठेवलेला आहे. ती वेळ येण्याआधीच पुतिन यांना क्रिमिया प्रमाणे युक्रेनला गिळंकृत करायचे आहे. पुतिन यांच्या या खेळीला रशिया धार्जिण्या बेलारूसचा पाठिंबा आहे.

जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीतील प्रा.टेलर कॉवेन म्हणतात, की पुतिन गेली 22 वर्षे सत्तेत आहेत. याचा अर्थ, त्यांना सत्तेची चटक लागली आहे व सहजासहजी ती ते सोडणार नाही. युक्रेनवर ताबा मिळविला की राष्ट्रीयत्वाच्या भावना निर्माण करून अंतर्गत आर्थिक व सामाजिक अस्थिरतेकडे ते दुर्लक्ष करू शकतात व स्वतःविरूद्ध वाढणाऱ्या असंतोषालाही अप्रयत्यक्ष उत्तर देऊ शकतात.

ऱशियाच्या प्रभाव क्षेत्राकडे पाहिल्यास असे दिसते, की क्युबा व व्हेनेझुएलासह आफ्रिकेतील माली, बुर्किना फासो, सुदान, इथिओपिया आदी देशातील हुकुमशहांची सत्ता टिकविण्यास व प्रस्थापित सरकारविरोधी लष्करी उठाव करणाऱ्या बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवून तेथे रशिया पाय रोवू पाहात आहे. तेथे अमेरिका, फ्रान्स आदी देशाचे वर्चस्व कमी करण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे.

काल (26 जानेवारी) अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी, ``ऱशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील व त्यामुळे कदाचित जगही बदलेल,’’ असा स्पष्ट व जाहीर इशारा दिला. ``केवळ रशियाच नव्हे, तऱ पुतिन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध लादण्यात येतील.’’ असे म्हटले आहे. क्रिमियावरील आक्रमणानंतर रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. त्यापेक्षा यावेळी अत्यंत जाचक निर्बंध लादण्यात येणार आहेत. त्यात पुतिन यांच्या प्रचंड गुपित मालमत्तेचाही समावेश असेल. बायडेन यांच्या इशाऱ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉनसन व फ्रान्स चे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. मॅक्रॉन हे पुतिन यांच्याबरोबर संपर्क साधून आहेत. तथापि, त्यातून फारसे काही साध्य होण्याची शक्यता नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे, दहशतवादाला संपुष्टात आणण्यासाठी तालिबान व अल कैदा यांच्याविरूद्ध 20 वर्ष युद्ध करूनही काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानातून घेतलेली माघार, हे आहे. बायडन यांचे नेतृत्व कमकुवत असून अन्य राष्ट्रावर आक्रमण करण्याची अमेरिकेची ताकद कमी झाली आहे, असे पुतिन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना वाटते, त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी प्रभावक्षेत्र वाढविण्यासाठी शेजारी राष्ट्राविरूद्ध आक्रमक पावले टाकण्याची तयारी केली आहे. करोनाच्या मॅक्रॉन साथीमुळे पश्चिम युरोपातील अऩेक देश त्रस्त असून, त्याचा सामना करण्यात ते व्यस्त असल्याने ब्रिटन व फ्रान्स व्यतिरिक्त जर्मनी अथवा अन्य राष्ट्र युक्रेनवरील हस्तक्षेप करणार नाही, याबाबत पुतिन यांना खात्री वाटते. जर्मनीने युक्रेनला शस्त्रास्त्रे पाठविण्यास नकार दिला आहे, ही पुतिन यांच्या जमेची बाजू.

युक्रेनवरील हल्ल्यात हस्तक्षेप करण्यासाठी नाटोच्या दिमतीस 8500 सैन्य पाठविण्याच्या अमेरिकेने केलेल्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी रशियन सेनेच्या 6 हजार सैनिकांचे युद्ध सराव युक्रेन नजिक क्रिमियाच्या सीमेवर सुरू झाले. त्यात लढाऊ विमाने, बाँबर्स, युदध नौका, जहाजे यांचा समावेश आहे. अमेरिकेने बेलारूसलाही इशारा दिला असून, ``संघर्षात पडला, तर तत्काळ कारवाई केली जाईल,’’ असे म्हटले आहे.

रशियाने लाख सव्वा लाख सैन्य युक्रेन सीमेवर दीर्घ काळ ठेवल्यास तितकेच मोठे सैन्य नाटो ठेऊ शकेल काय? पुतिन यांच्यापुढचा आणखी एक पर्याय म्हणजे, युक्रेनमधील बंडखोरांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा चालू ठेवून युक्रेनला राजकीय दृष्ट्या खिळखिळे करायचे व मोका साधून आक्रमण करायचे. त्यासाठी काही महिने लागू शकतात. तिसरा पर्याय म्हणजे, युक्रेनवर आक्रमण करून त्यावर ताबा करून होणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे. अर्थात त्यामुळे अमेरिका व रशियात युद्ध भडकले, तर त्याचे काय परिणाम होतील, आणखी कोणती राष्ट्रे त्यात सहभागी होतील, याचा अंदाज यावेळी करता येणार नाही.

आज उर्जा व इंधनाच्या 40 टक्के गरजेसाठी युरोपातील अऩेक राष्ट्रांना रशियावर अवलंबून राहावे लागते. त्याचे स्त्रोत रशियाने बंद केले, तर युरोपपुढे अयैन हिवाळ्यात अनपेक्षित संकट उभे राहू शकते. त्याची कल्पना असल्याने बायडन कतारचे अमीर शेख तामिम बिन हमाद अल थानी यांच्याबरोबर 31 जानेवारी रोजी बोलणी करणार आहेत. कतारकडे गॅस व पेट्रोलियमचे मोठे साठे आहेत, त्यांचा संभाव्य युद्धात उपयोग होऊ शकेल. दरम्यान, अमेरिका व रशिया यांच्या दरम्यान पॅरिस येथे शिष्टाईचे सारे मार्ग हाताळले जात आहेत. त्यात काही यश येणार काय, यावर पुढील घटना अवलंबून राहातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT