Sambhaji Bhide controversy  esakal
Blog | ब्लॉग

भिडे, सुप्रिया सुळे अन् आता रामदेवबाबा, संस्कृती जपायच्या वेळी बाईच का आठवते ?

अजूनही आपण आदिमानवच आहोत का? की, आपली बुध्दी, विचारांची झेप अजूनही तिथेच खुंट्याशी बांधलेली आहे.

धनश्री भावसार-बगाडे

प. पू. भिडेबाबा म्हणतात टिकली लाव तरच बोलेन, सुळे ताई म्हणतात तुमच्या संस्कृतीचा पोषाख आहे, कामाच्या ठिकाणी साडीच नेसा, रामदेव बाबा म्हणतात माझ्या नजरेतून बघाल तर कपडे घातलेले असो वा नसो बाई सुंदरच दिसते... अरे काय लावलंय...?

किती दिवस अजून आपण बाईच्या शरीराभोवती अन् तिने काय घातलंय, काय नाही, कशी दिसते या आणि इथंपर्यंतच राहणार आहोत. अजूनही आपण आदिमानवच आहोत का? की, आपली बुध्दी, विचारांची झेप अजूनही तिथेच खुंट्याशी बांधलेली आहे. स्वतःला आधुनिक काळाचे नेते म्हणवतो ना...? अजूनही या बेसिक्समध्येच अडकलेलो का?

बाईने काय घालायचं, कसं दिसायचं, सुंदर दिसावं की, नाही हे ठरवू द्या ना तिला. तुम्ही कोण आहात ठरवणारे...? आता काही समाजसुधारक उठतील आणि म्हणतील असं कसं, असं कसं... याने तर संस्कृती लयाला जाईल, प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असायलाच हव्यात... वगैरे वगैरे... मान्य आहे. बाई साडीत सुंदर, शालीन दिसते मान्य आहे. पण जर ती त्यात कंफरटेबल नसेल तर? आणि असली तरी तिला नाही वाटलं आज साडी नेसावी तर तुम्ही कोण ठरवणारे तिने साडी नेसावी असं? तिचं तिला ठरवू द्या की.

चार चौघात वावरण्याचे काही समाज नियम असतात, ज्यामुळे समाज सुरळीत चालण्यास मदत होते ते पाळायलाच हवे या मताची मी पण आहे. पण म्हणून त्या मुलभूत सामान्य चौकटींच्यावर तुमच्या मनाला येतील त्या चौकट तुम्ही एकावर एक लावत बाईला आत आत कोंडणारे कोण?

अजूनही आपण बाईने आंतरवस्त्र घालावं की, नाही, बाह्यवस्त्र काय घालवं, कसं दिसावं या गोष्टींवर चर्चा करत तिला वस्तूच बनवून ठेवलं आहे असं नाही का वाटत? त्या तुम्हाला केवळ वस्तू म्हणून दिसणाऱ्या बाईच्या शरीराच्या आतही तुमच्यासारखंच एक मन, बुध्दी, उर्मी आहे. त्यापर्यंत आपण कधी पोहचणार आहोत का? जिथे चंद्रावर पहिली महिला उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहे तिथे आजही फक्त तिच्या शरीराभोवतीच वाद घातले जाणार आहेत.

संस्कृती जपण्याचा विषय आला की, बाई आठवते आणि बाईचा विषय निघाला की संस्कृती रक्षणाचे पोवाडे गात तिला जखडायचे. पण संस्कृती रक्षणाचा मक्ता काय फक्त स्त्रियांनीच घेतला आहे का? सरसकट जस सर्व स्त्रियांनी कुंकू लावा असं फर्मान काढला जातो, तस मग किती पुरूष कपाळावर टिळा लावतात? ती पण आपली संस्कृती आहे. आपले पूर्वज ते करत होते. आजही बाईने कामावर साडी नेसून जावं असा सरसकट सांगितलं जातं किती पुरुष धोतर नेसून वावरणार आहेत?

अरे किती लहान लहान गोष्टींवर अजून आपला स्ट्रगल सुरू आहे. कोणाला फ्रॉकमधली चिमुकली असो, बुरखा किंवा अंगभर कपडे घालणारी बाईसुध्दा नागडी दिसते तर कोणी नागड्या बाईचं सौंदर्य सांगतो. नागडपण झाकण्याची क्षमता त्या बाईच्या कपड्यात नाही हे तर यातून उघडच आहे ना. कारण बाईला तिचे कपडे नाही तर तुमचे विचार आणि त्यातून तयार होणारी तुमची नजर नागडी करते.

त्या विचारांवर, त्या नजरेवर, त्यांच्या मुळांवर आपण कधी घाव घालणार आहोत की, नाही. इथे मुलींचा या ना त्या कारणाने कत्लेआम सुरू आहे, महिला हिंसाचार निर्मुलन दिवस, स्त्री भ्रूण हत्या जनजागृती दिवस, महिला दिवस, मुलगी दिवस असे एक ना अनेक दिवस आपण फक्त साजरे करतो आणि त्यात अजून अशाच एखाद्या दिवसाची भर घालतो. पण हे दिवसच साजरे करण्याची गरज भासणार नाही असा एक दिवस उगवावा असे प्रयत्न का करत नाही?

समाजाचे नेते समाजात सलोखा कसा राहणार नाही याची पुर्ण काळजी घेतात. कधी धार्मिक, जातीवाचक बोलून तर कधी स्त्रियांच्या कपड्यांवर बोलून. आजही आपली बुध्दी ही स्त्रीचं 'शील' या एका गोष्टीवर येऊन थांबते. कोणाचं खच्चीकरण करायचं तर त्याच्या शील रक्षणाचा विषय काढा नाहीतर चारित्र्य हनन करा. एवढीच आपली बौध्दिक झेप आहे. यापुढचं जग आपण कधी गाठूच शकत नाही.

मला आपल्या सो कॉल्ड नेत्यांना विचारायचं आहे, विशेषतः महिला प्रतिनिधी म्हणवणाऱ्या नेत्यांना, बाईच्या मानसिक, भावनिक, बौध्दिक गरजांविषयी आपण कधी बोलणार आहोत का? तिच्या बेसिक अडचणी तरी दूर करण्यासाठी कृती तर सोडाच पण विचार तरी करणार आहोत का? की, फक्त वैयक्तीक प्रगतीसाठी वरिष्ठांची हांजी हांजी करण्यात आणि मतं मिळवण्यासाठी बेताल बडबडच करत राहणार आहोत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT