पर्जन्‍य राजाचा दरबार 
Blog | ब्लॉग

पर्जन्‍य राजाचा दरबार...

- सुमेधा कुलकर्णी (फलटण, जि. सातारा)

घन घन माला, नभी दाटल्या कोसळती धारा या गीताला साजेसं असं बाहेरचं वातावरण झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्याही मनात अशाच पर्जन्याच्या आठवणींच्या सरीवर सरी झरझर बरसू लागलेल्या आहेत. पाऊस आणि कोकण यांचं किती घट्ट नातं आहे हे कुणाला वेगळं सांगायला नको. ओल्याचिंब, हिरव्यागार, समृद्ध, निसर्गरम्य, नयनमनोहर अशा कोकणामध्ये माझं बालपण गेलं. चिपळूण तालुक्‍यातील कोयना जलविद्युत केंद्र असलेले पोफळी हे माझं माहेर. 

कोयनेतून कुंभार्ली घाट उतरून खाली आलं की पोफळी हे गाव लागतं. आमचं गाव म्हणजे डोंगर उतारावरून खाली दरीपर्यंत घरांची उतरंड. गावाच्या चारही बाजूला रखवालदार असल्यासारखे उभे असलेले मोठाले डोंगर, भरगच्च वनराई, आंबे- फणसाची, नारळ पोफळीची झाडं, करवंदाच्या जाळ्या, पेरूची, जांभळाची झाडं, बाजूने वाहणारी नदी, सरपटणारे प्राणी आणि या सर्वांच्या राज्यामध्ये घुसखोरी करून राहणारे "आम्ही पोफळीकर'. आमच्या इथे वर्षातील जवळजवळ चार-पाच महिने तरी तुफान पाऊस होत असे. कधी कधी तर चार चार दिवस पण सूर्यदर्शन घडत नसे. शब्दशः एखाद्या मुसळाच्या आकाराची धार असलेला असा मुसळधार पाऊस पडत असे. पाणी साचून राहणे हा प्रकार मात्र मी तिथे कधी पाहिला नाही. एक तर आमचे गाव हे उतारावर वसलेले होते आणि प्रत्येक घर उतरत्या छपराचे होते. त्यामुळे पाणी वाहून जाऊन त्याचा निचरा होत असे. गावात पावसाळ्यात अनेक ठिकाणी नवनवीन ओहोळ, ओढे, झरे उगम पावत असत. तिथल्या मातीचा रंग लाल असल्याने जणूकाही चहाचे पाट सगळीकडे वहात आहेत असे दृश्‍य दिसे. गावात चहाचे पाट तर आजूबाजूच्या डोंगरांवर पांढरेशुभ्र फेसाळते दुधाचे झरे... हिरव्यागार डोंगरांच्या पार्श्‍वभूमीवर ते शुभ्र झरे अगदी मनमोहक दिसत. ओलेता निसर्ग अगदी हवाहवासा वाटे. 

नुकत्याच न्हालेल्या ललनेचा केशसंभार जसा मोहक आणि ओलाचिंब दिसतो; तसाच आजूबाजूचा परिसर दिसत असे. न्हालेले केस झटकल्यावर जसे जलतुषार उडतात, तसेच पाऊस थांबल्यावर झाडांच्या फांद्या हलवल्या की टप टप थेंब पडत असत. खूपच धमाल येई हे सर्व करताना... जांभळाच्या झाडांवर काळी तुकतुकीत जांभळे लगडलेली असायची. तर जाईच्या वेलीवर पांढऱ्याशुभ्र नाजूक अशा फुलांची दाटीवाटी झालेली असे. फुलांचा मंद सुगंध सगळीकडे गच्च भरलेला असे. लेकुरवाळा फणस त्याच्या अंगाखांद्यावरती असलेला भार कमी झाल्यामुळे थोडासा सुटा दिसत असे. पावसाळ्यात हमखास सगळीकडे फुलणारी फुले म्हणजे पांढरा आणि पिवळा सोनटक्का तसेच मोठाल्या आकाराची पांढरी फुले असणारा आणि धुंद सुवास पसरवणारा अनंत... मोगरा, बटमोगरा, गुलाब, कर्दळ, कण्हेर, गोकर्ण, अबोली, कवठी चाफा अशी नावे घ्यावी तरी किती?  "नेमेचि येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या या आठवणी वर्षानुवर्षे पुरतील एवढ्या आहेत माझ्या मनाच्या पोतडीमध्ये..!! कोणती सांगू अन्‌ कोणती नाही? 

पावसामुळे मैदानी खेळ जवळजवळ बंदच झालेले असत तरीही आम्ही मुले कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडण्याचा खेळ खेळत असू. लहानपणी आम्ही मुले चिखलात लोखंडाचा छोटा गज रूतवत पुढे पुढे जाण्याचा एक मजेशीर खेळ खेळत असू. ज्याच्यावर राज्य असेल त्याने तो गज लांबवर फेकून उभा किंवा तिरपा असा चिखलात रूतवत पुढे पुढे जायचे. गज खाली पडला की त्याचे राज्य केले. असा तो खेळ होता. खूप मजा यायची या खेळामध्ये आणि चांगलीच पायपीट पण आपोआप होत असे. मला आठवतंय आम्ही जेव्हा एसटीने पोफळीहून चिपळूणला जायचो तेव्हा अतिपावसाने बस सुद्धा गळक्‍या झालेल्या असत. आम्ही सर्व प्रवासी तेव्हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एसटीच्या आत सुद्धा छत्र्या उघडून बसत असू. काय मजेशीर दृश्‍य असे ते..!! अजूनही आठवलं तरी हसू येतं. 

पावसाळा म्हटलं की घरातल्या प्रत्येक सदस्याकडे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे स्वतःची छत्री तसेच रेनकोट असे. एखाद्यावेळी छत्री तुटली बिघडली तरी जणूकाही आपण पांगळेच झालेलो आहोत अशी भावना निर्माण होई. कारण घरातील प्रत्येकालाच छत्री, रेनकोट, गम बूट, टोपी असा जामानिमा करून शाळेत, दुकानात, गावात, मंडईत जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागे. एकंदरीत काय प्रत्येकाला डोक्‍यावर छत्र धरावेच लागे. जमिनीवर जागोजागी उगवलेल्या कुत्र्याच्या छत्र्या पाहून मनात असा विचार येई की भूमातेने पण आपल्या संरक्षणासाठी या छत्र्या स्वतःच्या डोक्‍यावर घेतलेल्या आहेत की काय? फक्त माणसांना अडचण येऊ नये म्हणून छोट्या छोट्या छत्र्यांचे आच्छादन तिने आपल्यावरती करून घेतले आहे की काय? एकंदरीत काय पर्जन्यराजाचा अगदी एकछत्री अंमल आमच्या गावावर असे. 

पावसाळ्यात शाळेमध्ये एक वेगळीच गंमत होत असे. बऱ्याचदा असे होत असे की शिक्षकांचे शिकवणे अगदी भरात आलेले असताना इतका धुवॉंधार पाऊस कोसळे की वर्गाच्या छतावर ढोल-ताशांच्या सारखा आवाज येऊ लागे. एकतर पत्र्याचे छत आणि त्यावर ताडताड आवाज करत कोसळणाऱ्या पावसाच्या धारा... मग काय जे शिक्षक आमचा आवाज बंद करत असत त्यांचाच आवाज आपोआप बंद होत असे. अशावेळी हा पाऊस आम्हाला जिवलग मित्र वाटत असे. परंतु पावसाला पर्जन्यराजा असं का बरं म्हणत असतील असा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता हे लक्षात येतंय की त्यावेळी खरंतर तो स्वत:चा दरबारच भरवत असे. हे पहा ना, त्याच्या स्वागताला जलधारांचा ढोल- ताशांचा आवाज, त्याला रिझवण्यासाठी बिजली नृत्य, काळया मेघांनी फुंकलेले रणशिंग, सोसाट्याच्या वाऱ्याने त्याच्यावर ढाळलेल्या चवऱ्या, मातीच्या सुवासाचे त्याला लावलेले उंची अत्तर असा एकंदरीत त्याचा राजेशाही थाट असे. त्यावेळी या लोकप्रिय आणि रुबाबदार पर्जन्य राजाने धरणीवर सगळीकडे आपला साम्राज्यविस्तार केलेला असे आणि त्याचा एक छत्री दरबार भरलेला असे. 

सध्या मी सातारा जिल्ह्यातील फलटण सारख्या दुष्काळी प्रदेशात मोडणाऱ्या तालुक्‍याच्या ठिकाणी रहाते. आमच्या इथे कोकणाच्या मानाने तसा खूपच कमी पाऊस होतो. परंतु इकडेही जेव्हा केव्हा वर्षा ऋतूमध्ये जाईचा सुगंध दरवळतो, पांढरा पिवळा सोनटक्का नजरेस पडतो, शुभ्र अनंत फुललेला दिसतो, कधीतरी मंडईत आंब्या- फणसाचा घमघमाट येतो, करवंदाचे जांभळाचे 'वाटे' साद घालतात, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट कानी पडतो, घरावर धारानृत्य चालू होते तेव्हा मला कोकणातल्या त्या अनुभवलेल्या आठवणीतल्या पर्जन्य राजाची अगदी मनापासून आठवण येते हे मात्र नक्की... 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे; संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या आमदाराची खोचक टीका

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result : 'ईव्हीएम'विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - डॉ. हुलगेश चलवादी

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचा निकाल अनपेक्षित, कारण वास्तविकता वेगळी होती- जितेंद्र आव्हाड

SCROLL FOR NEXT