celebrity social media Independence 
Blog | ब्लॉग

Blog: सोशल मीडिया.. सेलिब्रिटी.. स्वातंत्र्य

मुलाखत झाल्यानंतर तो पब्लिश करण्यापूर्वी अभिनेत्रीने मला फोन केला आणि..

स्वाती वेमूल

स्वातंत्र्य या शब्दाला आपण पाडू तेवढे पैलू आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य.. निमित्त जरी स्वातंत्र्यदिनाचं असलं तरी या शब्दाला असलेल्या एका वेगळ्या पैलूबाबत मी आज लिहितेय. सध्याच्या काळात व्यक्त होण्याचं सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या या विशाल जाळ्याने आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय खरं, पण याच सोशल मीडियावरील स्वातंत्र्य काहींसाठी हरवत चालल्याचं दिसतंय. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, त्यावर आपली अधिक शक्ती खर्च का करावी, हा स्वाभाविक मानवी विचार आहे. म्हणूनच आपल्याला खटकणाऱ्या गोष्टींपासून लांब जाणंच आपण पसंत करतो. गेल्या काही काळापासून अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडियावरील हरवत चाललेलं स्वातंत्र्य. आनंद, दु:ख, राग, द्वेष, तिरस्कार, तक्रार या सर्व भावभावना विविध रुपांमध्ये (फोटो, व्हिडीओ, पोस्ट) व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हा अत्यंत प्रभावी प्लॅटफॉर्म असला तरी त्यावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी या कलाकारांना दहा वेळा विचार करावा लागतोय, हे नक्की. कारण 'ट्रोलिंग' नावाचा एक मोठा राक्षस या सेलिब्रिटींमागे लागला आहे.

ट्रोलिंगला न जुमानता, सडेतोड उत्तर देत मुक्तपणे सोशल मीडियावर वावरणारेही कलाकार आहेत. मात्र ट्रोलिंगची भीती म्हणा किंवा त्यामुळे मनात निर्माण होणारी नकारात्मकता, यामुळे त्यापासून लांब जाणारेही अनेकजण आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाखतीचा योग आला. इथे मी जाणीवपूर्वक संबंधित अभिनेत्रीचं नाव घेणं टाळत आहे. मुलाखत झाल्यानंतर तो पब्लिश करण्यापूर्वी त्या अभिनेत्रीने मला फोन केला. मुलाखतीत ओघाओघाने म्हटलेलं एक वाक्य त्यातून काढण्याची विनंती तिने केली होती. त्यामागील कारण विचारलं असता, "त्या एका वाक्यामुळे पुढील दोन-महिने मी ट्रोल होईन", असं तिने सांगितलं. ट्रोलिंग होण्यासाठी ते काही वादग्रस्त विधान किंवा एखादा मोठा खुलासा होता, अशीही काही बाब नव्हती. हे उदाहरण सांगण्यामागचं कारण एवढंच की, या ट्रोलिंगरुपी राक्षसने आपली ही दहशत अनेकांमध्ये पसरवली आहे. एकविसाव्या शतकात सोशल मीडियावर व्यक्त होतानाही शंभर वेळा विचार करावा लागणं, व्यक्त झाल्यानंतर ट्रोलिंगसारख्या नकारात्मक गोष्टींना सामोरं जाणं यांसारख्या गोष्टी घडत असतील तर मग खरंच आपण स्वातंत्र्यात आहोत का, असा प्रश्न पडतो.

दुसरं उदाहरण आहे अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकरचं. गरोदरपणातील काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. उर्मिलाने गरोदरपणातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावर अनेकांनी तिला 'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का? एवढं काय हिचं प्रेग्नंसीचं कौतुक? कोणाला काय पोट येत नाही का?' अशा कमेंट्स पाठवल्या होत्या. बरं या कमेंट्स करणाऱ्याही स्त्रियाच. जर उर्मिला ही अभिनेत्री किंवा युट्युबर नसती, एखाद्या कंपनीत काम करणारी सामान्य महिला असती. तर तिच्या गरोदरपणाविषयी तिच्या मित्रमैत्रिणींना, एकत्र काम करणाऱ्या सहकाऱ्यांना, नातेवाईकांनाच माहित असतं. युट्युबरला दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ बनवून टाकण्याचे पैसे मिळतात. मग अशा वेळी शूटिंग करताना किंवा फोटोशूट करताना फक्त चेहरा दाखवणं आणि वाढलेलं पोट लपवणं शक्यच नाही. मुळात कारणाशिवाय ते गरजेचंही नाही. सेलिब्रिटींच्या फोटोंवरून विनाकारण होणारं ट्रोलिंग हे आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय. एखाद्या गरोदर असलेल्या स्त्रिला तिच्या गरोदरपणातील फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य असू नये का?

एखाद्या मराठी सेलिब्रिटीने हिंदी भाषेत जाहिरात केली तरी नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. अभिनेत्री प्रिया बापटने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या जाहिरातीत प्रिया आणि उमेश कामत हिंदीत का बोलत आहेत, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आणि ट्रोल करण्यात सुरुवात केली. यावर प्रियानेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. 'घर काय फक्त मराठी माणसंच घेतात का ? माझी मातृभाषा मराठी आहे म्हणजे भारतात फक्त मराठीच बोलतात का? मग तुम्ही हिंदी चित्रपट, इंग्रजी वेब सीरिज का बघता? एकीकडे मराठी कलाकारांना सतत विचारायचं की तुम्ही हिंदीत काम का करत नाही आणि जर सर्वांना समजेल अशा भाषेत जाहिरात केली तर असे टोमणे मारायचे. तुमच्या दुटप्पीपणाचं दु:ख वाटतं,' असं सडेतोड उत्तर प्रियाने दिलं. अभिनेत्री अभिज्ञा भावेला तिच्या दुसऱ्या लग्नावरून ट्रोल केलं गेलं. तर अभिनेत्री नेहा पेंडसेवरही घटस्फोटिताशी लग्न केल्यावरून टीका केली गेली. चुकत असेल तर खुशाल टीका करा, पण भाषेचे आणि शब्दांचे तारतम्य सोडू नका, अशी विनंती अभिनेता उमेश कामतने ट्रोलर्सना केली.

विनाकारण होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून आजवर बॉलिवूडपासून मराठी इंडस्ट्रीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाला रामराम केला तर काहींनी काही काळासाठी ब्रेक घेतला. सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, झहीर इक्बाल, स्नेहा उल्ला, निर्माता शशांक खैतान, गायिका नेहा भसीन, दिग्दर्शक मिलाप झवेरी, सुबोध भावे, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, अदिती सारंगधर अशी अनेक नावं आहेत. हॉलिवूडमध्येही अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियावरील अकाऊंट बंद केलं. 'स्ट्रेंजर थिंग्स' फेम अभिनेत्री मिली बॉबी, कायली मायरी, केनये व्हेस्ट, मेगन मार्कल, कार्डी बी, पेटे डेव्हिडसन यांनी सोशल मीडियावरील आपले अकाऊंट बंद केल्याची उदाहरणे आहेत.

ट्रोलिंगविषयी सहसा तक्रार केली जात नाही. कारण परदेशाप्रमाणे आपल्या देशात ट्रोलिंगविषयी कायदा अस्तित्वात नाही. माहिती-तंत्रज्ञान कायद्यामध्ये ट्रोलिंगविषयी विशेष तरतूद केल्यास सेलिब्रिटींसह सामान्यांनाही सोशल मीडिया वापरताना नकारात्मकतेचं दडपण येणार नाही.

(लेखाविषयी तुमच्या प्रतिक्रिया या ई-मेल आयडीवर कळवा- swati.om28@gmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT