अनेक पाश्चात्य देशांत कोरोना थैमान घालत असताना भारतातील त्याच्या प्रादुर्भावाची गती रोखण्यात आपण आतापर्यंत यशस्वी ठरलो असलो तरी अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार येते दोन आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. या आठवड्यांत आपण प्रादुर्भावाची ही गती मर्यादित ठेवू शकलो तर कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण नक्की जिंकू. इटली, अमेरिकेतील प्रादुर्भावाच्या झटक्यात वर गेलेल्या आलेखाची-ग्राफची पुनरावृत्ती भारतात होता कामा नये आणि ते आपल्या सगळ्यांच्याच एकीवर अवलंबून असेल.
कोरोना कसा आला आणि कसा वाढला हे सांगणारा एक सरकारी अहवाल प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 27 मार्चला सादर केलेल्या या अहवालामध्ये अनेक वस्तुनिष्ठ बाबींवर प्रकाश पडतो. कोरोनाच्या लागणीला सुरूवात झाल्यानंतरच्या पहिल्या तीन आठवड्यात केवळ चीन आणि इराणमध्ये त्याचा प्रादुर्भाव वेगाने होत होता. चौथ्या आठवड्यापासून इटली आणि पाचव्या आठवड्यापासून भारतातील त्याचा प्रादुर्भाव वाढत गेला. चौथ्या आठवड्यात भारतातील लागण झालेल्या व्यक्तींची संख्या तीन होती तर इटलीतील 400, इराणमधील 11,364, चीनमधील 70,635.
पाचवा आठवडा - भारत 35, अमेरिका 53, फ्रान्स 38, इटली 3089, जपान 144, इराण 11,364 आणि चीन 77,262.
सहावा आठवडा - भारत 74, अमेरिका 108, फ्रान्स 420, इटली - 12,462, जपान - 254, इराण - 24,811, स्पेन 2965 आणि चीन 80,174.
सातवा आठवडा - भारत 168, अमेरिका 696, फ्रान्स 2860, इटली 17,660, जपान 488, स्पेन 4,231 आणि चीन 80,904.
आठवा आठवडा - भारत 728, अमेरिका 1678, फ्रान्स 4640, इटली 47,021, जपान 716, स्पेन 39,673 आणि चीन 81,021.
... आता आपण अकराव्या आठवड्यात आहोत. जगातील एकूण बाधितांची संख्या गेलीये 7 लाख 87 हजारांवर. इटलीतील बळींचा आकडा 11,591 तर बाधितांची संख्या गेली आहे एक लाख एक हजारावर. अमेरिकेने इटलीला बाधितांच्या संख्येत मागे टाकले असून त्या देशात 1 लाख 64,620 बाधित आहेत. स्पेनमधील बाधित आहेत 87,956 तर चीनमधील 92,240. जगात एकूण 37 हजार 820 जण आतापर्यंत मरण पावले असून त्यात एकट्या इटलीतील 11,591, स्पेनमधील 7,716 तर चीनमधील 3,187 जण आहेत. आपल्या भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 1252 आहे आणि मृत्यू झाले आहेत 31. कोरोना प्रादुर्भाव झालेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चाळिसावा आहे.
गेल्या काही दिवसांगणिक भारतात होणाऱ्या प्रादुर्भावाची गती पाहूया. 22 मार्चपासून 31 मार्चपर्यंतच्या दिवसांतील भारतातील प्रादुर्भावाच्या वाढीची रोजची टक्केवारी होती 39 टक्के, 18 टक्के, 23 टक्के, 13 टक्के, 11 टक्के, 12 टक्के, 5 टक्के, 15 टक्के, 10 टक्के आणि 15 टक्के.
जगाच्या मानाने भारतातील आकडे कमी दिसत असले तरी यापुढील काळात मात्र ते वाढता कामा नयेत आणि त्यासाठी लॉकडाऊनला आपण पुढील पंधरवडा पूर्ण सहकार्य द्यायला हवे. तर आणि तरच आपला प्रादुर्भाव वाढीचा आलेख आणखी वेग पकडू शकणार नाही.
... प्रत्यक्षात काय दिसते ? बाजारात रोजच सकाळी नागरिक गर्दी करताना दिसतात. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केलीच पाहिजे हे मान्य, पण दिवाळीला जशी खरेदी होते तशी खरेदी होते आहे आणि त्यासाठी एकाच वेळी दुकानांत-ठिकठिकाणच्या मंडयांमध्ये गर्दी होते आहे. महिनाभराचा किराणा घेण्यासाठी महिन्यातून एकदा, आठवडाभराची भाजी भरून ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तर दूध घेण्यासाठी एक किंवा दोन दिवसांतून एकदा अगदी एकाच व्यक्तीने बाहेर पडले तर ही गर्दी टळेल. चिकन-मटणाची दुकानेही बंद करण्याचा आदेश असताना या रविवारी चिकन-मटणासाठी दुकानांपुढे अनेक जण जमले होते. पोलिस येऊन दुकानं बंद करेपर्यंत ही दुकानंही चालूच होती. ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. घरात पिठलं-भाकरी खाऊ, डाळी-कडधान्यं खाऊ, आठवड्यातून एकदा भाजी भरण्यासाठी बाहेर पडू असं आपण ठरवलं तर कोरोना पसरणार नाही.
आपण एकमेकांपासून पुढचे पंधरा दिवस लांब राहिलो नाही तर लॉकडाऊन मे महिन्याच्या शेवटापर्यंत वाढवावा लागेल आणि त्यातही आपण असेच वागत राहिलो तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हातावर पोट असणारा वर्ग हालात आहे आणि तो आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यासाठी तो चक्क पायी हजार-पाचशे किलोमीटरचे अंतर कापायला निघालाय. या जमावांना आहे तिथंच थांबवून त्यांच्यासाठी छावण्या उभ्या करण्याचं काम सुरू आहे. ते वेगानं झालं तर कोरोना देशभर पसरणार नाही. नोकरदारांनी मात्र आपल्या सगळ्यांच्याच अस्तित्त्वासाठी पुढचा पंधरवडा घरात काढूयात. पटतयं ना ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.