urfi javed bjp chitra wagh controversy over nudity and fashion and crime state women commission  
Blog | ब्लॉग

Urfi Javed Controversy : 'अनफॉलो' हा ऑप्शन असतोच की… उर्फीचे कपडे अन् राजकारणाचा नंगानाच

रोहित कणसे

मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही 'अति भडक' कपडे घालणारी मॉडेल सोशल मीडिया अन् 'मेन स्ट्रीम' मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. याला कारण देखील तसंच आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या मॉडेल विरोधात मोहिम उघडली आहे. अगदी भेटली तर थोबडावीन असा आक्रमक पवित्रा चित्राताईंनी घेतला आहे. सहाजिकपणे त्यांना विरोध म्हणून इतरही राजकारणी याविषयावर बोलायला लागले आहेत. यातून उर्फीचा प्रसिद्धी मिळवणं हा उद्देश मात्र साध्य होतोय...

कसं? तर उर्फी जावेद हे नाव फक्त आणि फक्त तिनं घातलेल्या चित्र-विचित्र कपड्यांमुळं लोकांच्या परिचयाचं झालंय. याव्यतिरीक्त कुठलंच उल्लेखणीय काम तीनं केलेलं नाही. तरीही ती आज सगळ्यांना माहिती झालीय आणि राजकारणी देखील तिची दखल घेत आहेत.

आता हा वाद कपड्यांवरून पेटलाय म्हणून सांगावसं वाटतं की, भारतातच नव्हे तर जगभर बायकांच्या कपड्यांबाबत लोक फार जागरूक आहेत. नको तितके म्हटलं तरी हरकत नाही. इराणमध्ये हिजाब घाला म्हणून बंधनं, इकडे आपल्या मायदेशात हिजाब घालू नका म्हणून... महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलेच्या कपड्यावरून राजकारण केलं जात आहे.

फक्त आत्ताच नाही उर्फी जावेद ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तिच्या कपड्यांच्या निवडीवरून मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिने केलेल्या कुठल्याही सोशल मीडिया पोस्टवर लाखो लोक प्रतिक्रिया देतात. मीडीयामध्ये बातम्या होतात. कित्येक जण तीला ट्रोल देखील करतात. तीच्या पोस्ट्सवर अश्लील कमेंटची संख्याही अफाट आहे.

बरं सोशल मीडियावर हे असलं सगळं करणारी उर्फी एकटी आहे का? तर नाही. अशी शेकडो खाती इंस्टाग्रामवर सापडतील. पण त्यामध्ये उर्फी 'ब्लू टीक' असलेली अन् सगळ्यात प्रसिद्ध आहे. आता उर्फीला ट्रोल करणाऱ्यात चित्रा वाघ यांची देखील भर पडलीय इतकंच.

फरक एवढाच आहे की, त्यांच्याकडून होत असलेलं ट्रोलींग हे सगळ्या माध्यमांसमोर होतंय. ज्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळतेय. सध्या माध्यामांनी देखील हा मुद्दा चांगलाच उचलून धरल्याचं दिसतंय.

चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित केला त्यानंतर उर्फीच्या सोशल मीडियावर पोस्ट्सना तुफान एंगेजमेंट मिळाली असणार. कारण आज सगळीकडं तिच्या बातम्या सुरू आहेत. फक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली उर्फी आज घराघरात पोहचली याचं पहिलं श्रेय जातं माध्यमांना. तिच्या करिअर ग्रोथमध्ये माध्यमांचा वाटा सिंहाचा आहेच. तसंच यात आता चित्रा वाघ यांचं योगदान ही मान्य करावं लागेल.

नंगानाच काय असतो?

चित्रा वाघ म्हणतात विचित्र कपडे घालणारी उर्फी नंगानाच करते. नंगानाच म्हणजे कमी कपडे घालून फोटो काढणं? की तु्म्ही कधीच घालणार नाहीत असे कपडे घालून फोटो काढणं? कमी कपड्यात फोटो काढणाऱ्यांची (स्त्री-पुरूष) संख्या खूप मोठी आहे. तेही सगळे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठीच हे करतात. मग टार्गेट एकालाच का केलं जातंय? अशा वेळी योग्य-अयोग्य याची व्याख्या कुणी करावी, तुम्ही? हे सांगतील तेच बरोबर असं कसं चालेल.

पुढे या चर्चेत महत्वाचा मुद्दा पुढे आला तो समाजातील विकृतीचा. महिला-मुली विकृतीचा शिकार ठरतात आणि याला उत्तेजन देणारे कपडे घालून उर्फी फिरते असं चित्रा वाघ यांनी बोलून दाखवलं. हा गंभीर मुद्दा आहे. महिलांवर होणारे आत्याचार थांबायला हवेत. समाजातील विकृती रोखण्यासाठी व्यापक विचार झाला पाहिजे. त्यासाठी कितीतरी सामाजिक बदल करावे लागतील.

विचित्र कपड्यांवरून एका महिलेल्या जेलमध्ये पाठवून हे होणार आहे का? पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचाराला पुन्हा महिलेला जबाबदार धरलं जाणं पुरेसं आहे का? न्यूडीटी सोशल मीडिया, यूट्यूब, वेब सीरीज, चित्रपट यामध्ये ओसंडून वाहतेय, त्याचं काय करणार तेही कोणीतरी सांगावं.

अत्याचाराचा बळी ठरलेल्या एका नऊ वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने मला उर्फीचा एक व्हिडीओ पाठवला. ज्यामध्ये ती नगण्य कपडे घालून फिरताना दिसली, असे चित्राताई म्हणाल्या. मग महिलांवर होणाऱ्या आत्याचारांचं कारण महिलांनी घातलेले कपडे किंवा न्यूडीटी (नंगानाच) असते असं म्हणायचं का? एका राजकीय नेत्याची समज यापेक्षा आणखी खोल हवी असं वाटतं. अशा वेळी उर्फी आणि यांच्या सारख्या इतरांना मोठं करणाऱ्यांना आधी प्रश्न विचारले जावेत.

'अनफॉलो' हा ऑप्शन असतोच की…

सोशल मीडियावर नग्नतेसारख्या गोष्टींना बरीच बंधनं असतात. हे प्लॅटफॉर्म काही नग्नता यासारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही उपाय करतात. पण हे सर्वस्वी बंद होणं कठीण आहे. पण तुमच्याकडे पर्याय असतो. सोशल मीडियावर तुम्हाला न रुचणारा कंटेंट झाकता येतो. तो पु्न्हा कधीच दिसणार नाही यासाठी देखील पर्याय आहेत. ते वापरणं बेस्ट. अनफॉलो करणं, ब्लॉक करणं हा ऑप्शन तर असतोच की..

पण तिच्या बातम्या देणाऱ्या मेन स्ट्रीम माध्यमांना कसं रोखणार हा प्रश्न आहे. असल्या प्रकरणांची माध्यमांसमोर येऊन त्याची आणखी वाच्यता करणं हे पेटलेल्या आगीत पेट्रोल ओतण्याचा प्रकार आहे. यातून उर्फीला विकृत समाजाच्या टार्गेटवर आणून ठेवणं योग्य नाही.

उर्फीचं काय करता येईल?

उर्फीच्या कपड्यांवर कायद्याच्या कक्षेत राहुन काही बंधनं घालणं कठीण आहे. तिला देखील संविधानाने काही अधिकार दिलेत. महिला आयोगाने देखील उर्फीबाबत काही करता येणार नाही अशीच भूमिका घेतलीय. मग फारतर तिला विनंती/अवाहन करता येईल. तिच्या विवेकाला जागं करण्याचा प्रयत्न चित्राताई करू शकतात. मारहाणीच्या धमक्या देऊन उपयोग नाही.

तसेच चित्रा वाघ यांच्या पोलिस तक्रारीवरून जर कायदा वापरून तिला रोखलं, तर सोशल मीडियावर ज्यांना रोखलं पाहिजे असे अमाप आहेत त्यांच्यावरही बंधनं यायला हवीत. अन्यथा हा उर्फीवर अन्याय ठरेल, नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT