swallowing the sun novel sakal
Blog | ब्लॉग

'स्वालोइंग द सन’- मराठी मातीशी एकरूप झालेली कादंबरी

कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व 20 व्या शतकाच्या प्रांरभीचा. व तिची सांगता होते, ती स्वातंत्र्य मिळते तेव्हा. पहिली दोन पाने वाचताना आठवण होते, ती आमीर खानच्या `दंगल’ या चित्रपटाची.

विजय नाईक

'स्वालोइंग द सन’ ही मराठी माती व संस्कृतीशी एकरूप झालेली इंग्रजी कादंबरी आहे. लेखिका आहेत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी साह्यक महासचिव (असिस्टंट सेक्रेटरी जनरल) व नामवंत राजदूत लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी. कादंबरीचे प्रकाशन येत्या 21 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होत आहे.

गेल्या वर्षी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली अन् मला पाहाताच त्या म्हणाल्या, `मी कादंबरी लिहितेय `मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी’ हा संत मुक्ताबाईचा हा अभंग. काहीस चकित होऊन मी विचारलं, 'मराठी कादंबरी का?’ त्यावर त्या `हो’ म्हणाल्या. पण, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हाती पडली ती त्यांची `स्वालोइंग द सन’ ही इंग्रजी कादंबरी.

ती वाचताना त्यातील ओघवत्या भाषेची झालर शब्दाशब्दातून दिसत होती. पानोपानी जाणवत होते, ते त्यातील प्रकरणातून त्यांचे मराठीवर असलेले प्रेम, साहित्य, संगीत, नाट्य, गायकी, स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थांचा आदर्श, पुरोगामी विचाराने भारलेले कुटुंब, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार आदी अनेक छटा दिसत होत्या.

कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व 20 व्या शतकाच्या प्रांरभीचा. व तिची सांगता होते, ती स्वातंत्र्य मिळते तेव्हा. पहिली दोन पाने वाचताना आठवण होते, ती आमीर खानच्या `दंगल’ या चित्रपटाची. रत्नागिरी जिल्ह्यातील देसाईखेडा या गावातील मालती, कमला व सुरेखा या तिन्ही मुलींना कुस्तीचे धडे देत पुरूषांची बरोबरी करायला शिकविणारे त्यांचे वडील.

त्यातील मालती व कमला यांची जोडी कादंबरीच्या शेवटापर्यंत तुमची साथ सोडीत नाही. त्यांच्या शालेय जीवनापासून ते उच्चशिक्षण, जोडीदारांचा होणारा शोध, त्यातून जीवनात होणारे चढउतार, ब्रिटिशांविरूद्ध त्याच काळात सुरू असलेला संघर्ष, क्रांतिकारी विचारांची होणारी पेरणी, महात्मा गांधींची अहिंसा व सत्याग्रह ही तत्वे एकीकडे, तर वीर सावरकर व अन्य क्रांतिकारकांरकांचा ब्रिटिशांविरूदध सशस्त्र संघर्ष करण्याचा निर्धार यातील वैचारिक द्वंद लेखिकेने मोठ्या प्रभावी पद्धतीने रेखाटले आहे.

तब्बल साठ प्रकरणे असलेली ही कादंबरी वाचताना उत्सुकता क्षणाक्षणाला वाढते. प्रसंगाप्रसंगातून मराठी संत-कविंचे अभंग, काव्य कादंबरीला समृद्ध करतात, तसंच देसाईखेडातून मध्यप्रदेशातील सरदार विलासराव यांचं वैशाली संस्थान, गुणा, इंदूर असा झालेला पात्रांचा प्रवास, विलासरावांची द्वितीय भार्या म्हणून मालतीची बहीण सुरेखा हिने केलेला स्वीकार, त्यातून तिचं बदलेलं जीवन व काही वर्षानंतर सुरेखाचा अचानक झालेला शेवट, अशा चढउतारातून कादंबरी वाटचाल करते.

कादंबरी वळण घेते आईच्या अकाली मृत्यूनंतर वडील हयात असूनही केवळ त्यांच्या आग्रहास्तव इंदूरमधील अहिल्यादेवी अनाथ महिला विद्यालयात मालती व कमला यांनी घेतलेल्या प्रवेशाने. अन्य अनाथ विद्यार्थीनींबरोबर त्यांचा होणारा शैक्षणिक प्रवास, महिला प्राचार्यांकडून मिळालेला बहुमोल सल्ला, इंग्रजी शिक्षणाचे महत्व, त्यातून आलेला धीटपणा व वैयक्तिक न्यूनगंड दूर सारण्याचे मानसिक धाडस याची प्रचिती येते.

लक्षात राहाण्यासारखा प्रसंग घडतो, तो मालती व कमला रेल्वेने घरी परतताना चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीवर केलेला हल्ला व त्यातून मोठ्या खुबी व धैर्यांने सहीसलामत सुटलेले हे कुटुंब. नंतरच्या काळात याच दरोडेखोरांबरोबर झालेली चकमक, कालांतराने काही दरोडेखोरांचे शस्त्रसमर्पण हे प्रसंग जयप्रकाश नारायण व विनोबा भावेंच्या आवाहनाने दरोडेखोरांची झालेल्या शरणागतीच्या घटनेची याद करून देते.

मालतीच्या शालेय शिक्षणानंतर पुढच्या आयुष्याची सुरूवात मुंबईच्या एल्फ्न्सिटन कॉलेजमधील अध्यापनापासून होते. तिचं शालेय शिक्षण इंग्रजी भाषेत झालेलं, तल्लख बुद्धी व विलक्षण स्मरणशक्ती यामुळं शालेय, कॉलेज जीवनात ती झळकलेली असल्यानं कॉलेजचं वातावरण ब्रिटिश असूनही तिला बुजायला होत नाही. उलट ती सहकाऱ्यांबरोबर उत्तमपणे मिसळते.

मुंबईतील सांस्कृतिक जीवन तिला व कमलाला आकर्षित करतं, तसंच स्वातंत्र्य लढ्याकडेही ती आकर्षिक होते. कॉलेजचे नियम मोडून स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या तरूणांना पोलिसांच्या मागापासून स्वतःच्या घरी दडवून ठेवते. त्याच दिवसात तिचा संपर्क येतो तो महात्मा गांधी, एनी बिझंट, जिडू कृष्णमूर्ती, जहांगीर पेटीट या महान व्यक्तींशी.

ज्या घरात ती व कमला पेइंग गेस्ट म्हणून राहातात त्या सावरकरवादी मोहनकाका व हेमाकाकी यांच्याकडे राहताना वैचारिक मतभेद होतात. तथापि, तिच्या मनाचा कल असतो गांधीवादी स्वातंत्र्य लढ्याकडे. त्यातील अहिंसा व सत्याग्रह या तत्वांकडे. मोहनकाकाच्या धाकामुळे गायकी विसरून गेलेल्या हेमाकाकीला तिची गायकी पुन्हा मिळवून देण्यास सफल होणाऱ्या मालतीचा पुरूषप्रधान समाजाबरोबर होणारा संघर्ष निरनिराळ्या प्रकरणातून पुढे येतो.

गुरूला आपला साथीदार निवडताना मनात झालेली चलबिचल, मालतीबरोबर विवाह करण्यास गुरूच्या घरचा असलेला विरोध व शेवटपर्यंत होणारे चढउतार लेखिकेने उच्चम पणे टिपलेत. मालती मराठा समाजातील व गुरू सारस्वत ब्राह्मण हा जातीचा तिढा बराच काळ सतावणारा ठरतो. मुंबईच्या वास्तव्यात मालती, कमला, शाम व गुरू हे साहित्य, संगीतात रमतात.

तो अल्हाददायक काळ तसेच मामा, वरेरकर यांच्या `सत्तेचे गुलाम’ या नाटकाचे प्रयोग व त्याला मिळणारा प्रतिसाद, दुसरीकडे बालगंधर्वांचा अप्रतिम अभिनय, यामुळे त्यावेळच्या समाजाला पडलेली मोहिनी, असे एकामागून एक प्रसंग कादंबरीत सहजपणे गुफलेले आहेत.

ज्येष्ठ राजदूत म्हणून देशाबाहेर तब्बल 20 वर्ष राहूनही लक्ष्मी पुरी यांचं मराठी भाषेचं प्रेम, संत साहित्य, मराठी नाट्यभूमी, रंगमंच गाजविणारे अभिनेते आदींचं आकलन व त्यांच्याबाबत असलेला आदर आपल्याल पदोपदी जाणवतो. एका छोट्या खेड्यातून आलेली, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हान स्वीकारणारी मालती नावाची `मुंगी’ आकाशी उडताना दिसते.

गुरूशी अनेकदा मतभेद, गैरसमज होऊनही भारतीय संस्कृती व परंपरेतील पत्नीची भूमिका ती बजावते, ते अखेरपर्यंत. अनेकदा मालतीपेक्षा गुरूचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार व प्रगल्भ करण्याकडे लेखिकेचा प्रयत्न दिसतो.

स्वातंत्र्य चळवळीचे, तसेच स्त्री स्वातंत्र्याकरता चाललेल्या सामाजिक चळवळीचे, त्या काळातील इंग्रजी व मराठी साहित्याचे, राजकारणातील प्रवाहाचे, तरल श्रृंगाराचे अतिशय छान ओघवत्या भाषेतील कथानकामुळे कादंबरी वाचनीय झाली आहे. तिचे मराठी भाषांतर झाल्यास असंख्य मराठी वाचकांना तिचा आस्वाद घेता येईल.

कादंबरी – स्वालोइंग द सन,

लेखिका – लक्ष्मी मुर्डेश्रवर पुरी

पृष्ठ संख्या – 412 किंमत – 899 रू.

प्रकाशक – अलेफ बुक कंपनी, दिल्ली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT