परवा एक हत्ती ऐटीत रस्त्यावरून जाताना दिसला. त्याला कसलीच त्या कोरोनाची भीती नव्हती. पण, इतका हुशार मानव प्राणी आता गुडघे टेकतोय. मला तर हेवाच वाटला त्या हत्तीचा. पण, त्यामागे जाता हत्तीने गवत खाण्याचा आपला अन्नधर्म सोडला नाही, हेही महत्त्वाचेच.
अहो, बघता बघता कोरोना टीचरच झाला की. कोरोनाने पहिला धडा जो शिकवला तो म्हणजे सूक्ष्मात अधिक सामर्थ्य असते. म्हणूनच सूक्ष्माला कमी समजू नये. आपल्याकडे अनेक प्रकारची संहारक शक्ती असली तरी ती कोरोनाला मारण्यासाठी उपयोगी नाही, हेच सिद्ध झालंय. तर त्याचाच दुसरा अर्थ गुण्यागोविंदाने नांदा. असाच दुसरा धडा कोरोनाने शिकवलाय तो म्हणजे निरोगीपणाचा. आधुनिक वैद्यकशास्त्र पुढारलेले असले तरी, एकही औषध नाही. एकूणच त्याचा प्रसार पाहता आपली आधुनिकता कोरोनाच्या वेगापेक्षा फारच कमी की हो. याच कोरोनाने तिसरा धडा दिलाय तो आपल्या घराचा. घरात राहावे, खावे, प्यावे, घर स्वच्छ ठेवावे. आता घरी आहे तर समजतेय की घरीसुध्दा चांगले जगता येते. इतक्या मोठ्या गरजांची आवश्यकता नाही. कोरोनाने दिलेला चौथा धडा म्हणजे समायोजन करूनच राहावे लागते. आपल्या क्षमतेनुसारच राहावे.
पाचवा धडा आहे, भविष्याची दृष्टी. आज मानव जातीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या आधी अग्नितत्त्व व जलतत्त्वाच्या तांडव नृत्याने सिग्नल दिले. शहरे सुजली. सुविधा देऊ असे राज्यकर्तेही म्हणेनात. लोकांचे लोंढे सतत बकाल शहरांकडे वळू लागलेत. तेव्हा महापूर यायला लागले. कष्टाने मिळविलेली भौतिक साधने स्वाहा होऊ लागली. त्यामुळेच आता भविष्यातील प्लॅनिंग करावे लागणार, चांगले जगण्यासाठी. सहावा धडा म्हणजे अतिलोकसंख्या. अनियंत्रित व वर्षानुवर्षे वाढणारे दुखणे. श्वासनलिका आकुंचित झाल्या तरी शहर सोडायचे नाही. धर्म, अंधश्रद्धा, अर्थकारण, राजकारण, मतपेटी या सर्वांच्या मागे असणाऱ्या संकुचित व स्वार्थी दृष्टीला कोरोना राक्षसाने मोठा संदेश दिलाय, आवरा आता. नाहीतर सगळेच आवरावे लागेल. तर कोरोनाने दिलेला सातवा धडा असा की, रोगांपुढे, संकटांपुढे सर्व समान. गरीब, श्रीमंत, लहान, थोर सगळे त्याला सारखे. खरा समाजवाद तोच पाळतोय. हा कोरोनाचा सप्तपदी धडा. तेव्हा काळजी घ्या. स्वतःची, इतरांची. चांगले मानव व्हा. आताच्या व पुढील पिढीसाठी.
कोरोनाने दिलेली सप्तपदी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.