आपल्या शास्त्र-पुराणात श्रवणभक्तीला विशेष महत्त्व आहे. मनातील प्रश्न, गोंधळ किंवा कोलाहलाची उत्तरे असंख्य वेळा संतविचारांच्या निरूपणाच्या श्रवणातच सापडतात. श्रवणासाठी उपासनकेंद्राची, आध्यात्मिक बैठकीची आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ८ ऑक्टोबर १९४३ रोजी पहिल्या बैठकीची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईतील गोरेगाव भागात सुरू झालेल्या या बैठकीच्या रोपाने पुढे एका वटवृक्षाचा आकार घेतला. बैठकीच्या संकल्पनेविषयी...
येथे न कोणाची जात पाहिली जाते न कोणाचा धर्म. ना कुणाची प्रतिष्ठा ना कुणाचा पैसा. इथे पाहिली जाते तुमच्या अंतरीची परमात्म्याची भक्ती, तुमच्या मनातील समर्पण आणि सेवाभाव. या भावनेने सामूहिक उपासनेसाठी जोडला जाणारा प्रत्येक व्यक्ती हा या आध्यात्मिक बैठकीचा सदस्य होतो! या बैठकीची कुठेही जाहिरात नाही, होर्डिंग्ज नाहीत की सोशल मीडियावर भपका नाही.
तरी लाखो लोकं स्वयंप्रेरणेने आठवड्यातला अडीच तास काढून या बैठकीचे सदस्य होतात. ही आहे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेली, श्रवण-मनन-निजध्यास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गेली ७८ वर्ष अविरतपणे सुरू असणारी आणि आपल्यातील परमेश्वरी अंशाची जाणीव करून आध्यात्मिक उपासनेकडे घेऊन जाणारी समाजपरिवर्तनाची दासबोध निरूपण ‘बैठक.’
आपल्या शास्त्र, पुराणात श्रवणभक्तीला विशेष महत्त्व आहे. मनातील प्रश्न, गोंधळ किंवा कोलाहलाची उत्तरे असंख्य वेळा संत विचारांच्या निरूपणाच्या श्रवणातच सापडतात. श्रवणातूनच माणूस घडतो, त्याच्या विचारांचे परिवर्तन होते. या श्रवणासाठी उपासनकेंद्राची, आध्यात्मिक बैठकीची आवश्यकता आहे, ही बाब लक्षात घेऊन नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ८ ऑक्टोबर १९४३ रोजी पहिल्या बैठकीची मुहूर्तमेढ रोवली.
मुंबईतील गोरेगाव भागात सुरू झालेल्या या बैठकीच्या रोपाने पुढे एका वटवृक्षाचा आकार घेतला. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रचंड कष्ट करून, हालअपेष्टा सहन करून या बैठकांचे बीज महाराष्ट्रभरात रुजवले! समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला अलौकिक ग्रंथ म्हणजे दासबोध... या दासबोध निरूपणाच्या आधारावर त्यांनी निरूपणाला सुरुवात केली. सद्विचारांच्या या यज्ञात समर्पित सदस्य जोडले जाऊ लागले आणि बघता बघता या बैठकांचे जाळे महाराष्ट्रभर पसरले.
प्रवाहाला महासागराचे रूप
बैठकीच्या या प्रवाहाला महासागराचे स्वरूप दिले ते नानासाहेब यांचे चिरंजीव डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी! महाराष्ट्रभरात सुरू असणाऱ्या या बैठका तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक अशा राज्यांसहित आता परदेशातही जोमाने सुरू आहेत. बैठकांचा मुख्य उद्देश मनुष्य परिवर्तनासोबतच त्याला त्याच्याच अंगी असणाऱ्या परमेश्वराची जाणीव करून देण्याचा आहे.
दैनंदिन प्रापंचिक अडचणीत खचलेल्या, निराश झालेल्या मनुष्याला त्याच्या अस्तित्वाची, समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे महत्कार्य बैठकांमधून होत आहे. व्यसनाधीन व्यक्ती सन्मार्गाला लागतो, त्याची केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक प्रगतीदेखील होते. आध्यात्मिक प्रगतीसोबतच त्याची भौतिक प्रगतीदेखील तो साध्य करतो.
घरातील महिलेचा सन्मान, वडीलधाऱ्यांप्रती कृतज्ञता, व्यसनमुक्ती, देशसेवा हे संस्कार जेव्हा घरातील कर्तापुरुष आत्मसात करतो, तेव्हा त्या घराचे सोने होते. बैठकीला येण्यासाठी कोणालाही आग्रह करावा लागत नाही. ज्याला सामूहिक उपासनेने स्वतःचा आणि राष्ट्राचा उद्धार साधायचा आहे असा व्यक्ती बैठकीला स्वयंस्फूर्तीने जातो.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या बैठकांच्या कार्यात अधिक सुसूत्रता आणि व्यापकता आली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शहरांत, गावात बांधल्या जाणाऱ्या सभागृहात जमणारे १५०० ते २००० श्रीसदस्य जेव्हा शांतचित्ताने दासबोधाचे वाचन करतात, तेव्हा तो श्रीसदस्यांचा समूह पाहण्यासारखा असतो.
आप्पासाहेबांनी मार्गदर्शन केलेले निरूपणकार दासबोधाचे दूत बनून जागोजागी असणाऱ्या बैठकांत निरूपण करतात. यातील कोणीही वक्ता नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही, कधी व्यासपीठावर बोलण्याचा अनुभव नाही, अशा निष्ठावंत श्रद्धाळू श्री सदस्यांना जेव्हा आप्पासाहेब नावाच्या परिसाचा स्पर्श होतो तेव्हा हे निरूपणकार समोर बसलेल्या हजारोच्या समूहाला आपल्या वाणीने केवळ खिळवूनच ठेवत नाहीत, तर त्यांच्यात परिवर्तनही घडवतात.
विशेष म्हणजे, जगभरात सुरू असणाऱ्या या हजारो बैठकांचे नियोजन आप्पासाहेब रेवदंड्यातून कसे करतात, हा आश्चर्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. बैठकीतील सदस्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी स्वतः मार्गदर्शन करतात. ठरलेल्या दिवशी, कुठल्याही देणगीशिवाय, जाहिरातींशिवाय हजारो लोकांच्या उपस्थितीत अतिशय शिस्तीत चालणाऱ्या या बैठका म्हणजे ‘मॅनेजमेंट’चे एक उत्तम आणि आदर्शवत उदाहरण आहे.
आठवड्यातून एकदा चालणाऱ्या स्वतंत्र बैठकांमधून महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. आपले घर, संसार आणि मुलाबाळांना सांभाळून ही मातृशक्ती या कुटुंबनिर्माणाच्या कार्यात स्वतःला झोकून देते. बैठकीतच बालसंस्कार केंद्र, प्रौढ साक्षरता वर्गाच्या माध्यमातूनदेखील कुटुंब जोडले जाते. निरूपणातून मनात तयार झालेल्या मानवतेचा सामाजिक दृष्टिकोन श्री सदस्यांना स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन असे उपक्रम करण्यास प्रवृत्त करतो.
नानासाहेबांनी सुरू केलेले कार्य आज त्यांची तिसरी पिढी समर्थपणे केवळ सांभाळतच नाही, तर वाढवतही आहे. मानवतेसाठी आणि राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाने वयाच्या पंचाहत्तरीतही अखंड कार्यरत असणारे आधुनिक भारताचे दधिची ऋषी आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यास आणि त्यांनी उभ्या केलेल्या या बैठकीच्या महासागरास दंडवत!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.